अमरावती : नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तर्फे जिल्ह्यातील १४९ ओबीसी, विमुक्त जाती व भटके जमाती, विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांना शुक्रवारी मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाज्योतीचे संचालक तथा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार, अॅड.बाबूराव बेलसरे, डॉ.गणेश खारकर, प्रा. श्रीकृष्ण बन्सोड उपस्थित होते. यावेळी प्रा. दिवाकर गमे म्हणाले, महाज्योतीमार्फत जेईई, नीट व सीईटी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मोफत प्रशिक्षण सुरू आहे. त्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांकडून ऑनलाईन क्लास घेतले जात आहेत.
गतवर्षीच्या अकरावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज व नोंदणी महाज्योतीच्या संकेत स्थळावर केली होती. त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. अशा राज्यातील महाज्योतीकडे नोंदणी झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप सुरू आहे. या टॅबसोबतच विद्यार्थ्यांना दररोज सहा जीबी इंटरनेट डेटा टॅबमधील सीमच्या माध्यमातून नीटची परीक्षा होईपर्यंत मोफत दिला जाणार आहे. त्यानंतरसुद्धा हे टॅब विद्यार्थ्यांकडेच राहणार असून, त्यांचा पुढील शिक्षणासाठी उपयोग होऊ शकेल, अशा या योजनेत जिल्ह्यातील १४८ विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे ऑनलाईन नोंदणी केली. मोफत प्रशिक्षणात सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांना महाज्योतीच्यावतीने मोफत टॅबचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात समता परिषदेचे प्रभाकर वानखडे, प्रफुल्ल सानप, वसंतराव भडके, शिवचरण उमक, श्रीकृष्ण माहोरे, जयश्री कुबडे, डॉ. उज्वला मेहरे, राजेंद्र जोशी, सूरज लोखंडे, सुधाकर विरूळकर, राजेश गरूड, कपिल रामटेके, लक्ष्मण मेदरवाड, डॉ. अस्मिता बन्सोड, अक्षय ढोले, विजय हावरे, विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan