ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाला घेऊन ओबीसीचे निवेदन
गोंदिया - इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ३६ मुलींसाठी ब ३६ मुलांसाठी असे एकूण ७२ वसतिगृह सुरू करण्यात यावे, या मागणीचे निवेदन ओबीसी अधिकार मंच, ओबीसी सर्व समाज मंच, स्टुडंटस राईटस असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने आज (ता.३०) उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री, बहुजन कल्याण मंत्री व पालकमंत्री यांना देण्यात आले.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या इतर मागासवर्ग कल्याण समितीच्या ५ ऑक्टोबर २०१५ रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत, जिल्हास्तरावर इमाब, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील मुला-मुलींसाठी नवीन शासकीय वसतिगृहे सुरू करण्याची व त्यांची देखभाल करण्याची सूचना राज्य शासनास केलेली होती. ३० जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार १५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, जिल्ह्याच्या ठिकाणी ३६ वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. महायुती च्या फडणवीस सरकारने २२ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णय द्वारे नागपूर, अहमदनगर, वाशिम आणि यवतमाळ या चार जिल्ह्यामध्ये इमाब, विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी प्रशासकिय मान्यता दिली होती.
आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून ३६ वस्तीगुहांऐवजी ७२ वसतिगृहे (प्रत्येक जिल्ह्यात २) बांधली जातील अशी स्वागतार्ह घोषणा केली होती. मात्र अद्यापही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. जागेअभावी वसतिगृहे बांधायला अडचण येत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यात खाजगी इमारतीत वसतिगृहे सुरू करण्यासंबंधी कार्यवाही सुरू करण्यात आली होती. परंतु बरील बाबींवर ठोस अशे एकही पाऊल उचलले गेले नाही. ओबीसी संघटनांनी सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीबर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार सुरू करावी अशी मागणी आपल्या सरकारकडे केली होती. इतर मागास विद्यार्थ्यांना स्वाधार मिळेल असेही सुतोवाच आपल्या सरकारमधील बऱ्याच मंत्रांनी केले होते. परंतु आजतायागत वरील एकही प्रकारच्या पद्धतीचा अवलंब केला गेला नाही. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एकही वसतिगृह बांधला गेला नाही.
महाराष्ट्रील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी प्रत्येकी १०० जागेचे स्वतंत्र वसतिगृह व सहाही विभागीय स्तरावर ५००-५०० जागेचे स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात यावेत. तोपर्यंत भाड्याच्या इमारतीत विद्यार्थ्यांची सोय करावी व अन्यथा महाराष्ट्रभर इमाव विजाभज, विमाप्र विद्यार्थी व समाजाकडून तीव्र आंदोलने करण्यात येतील यास सर्वस्वी शासन जबाबदार असणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी तिर्थराज उके, खेमेंद्र कटरे, कैलाश भेलाबे, एस.यु.बंजारी, सुनिल भोंगाडे, संतोष डोंगरे, जितेश राणे, प्रमोद बघेले, दिनेश फरकुंडे, संतोष बनकर, अनिल शरणागत, बिबेक चित्रीब, रवी प्रितमवार, चेतनलाल पटले, एस.बी.गोस्वामी, राजेश साटवणे उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan