पुणे - पूर्वीच्या काळी तीन पावलांतून बळिराजाला पाताळात गाडण्यात आले, सद्यःस्थितीत शेतकरीविरोधी तीन कायदे करून बळिराजाला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र सुरूच आहे. आता बळिराजाने समता संघर्षासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या सेक्रेटरी प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले.
सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीने बलिप्रतिपदेच्या निमित्ताने शुक्रवारी ( ता. ५ ) कृषिसम्राट बळिराजाचा गौरव आणि मिरवणूक महात्मा फुले वाड्यात काढण्यात आली होती. या वेळी बळीपूजन आणि पानसुपारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. परदेशी, अंकल सोनावणे, सचिन बागडे, राजेंद्र शेलार, रोहिदास तोडकर यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध भाज्या आणि धान्य राशींचा प्रतीकात्मक बळिराजा उभारून त्याचे पूजन करण्यात आले. 'इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो', 'सत्य की जय हो' या घोषवाक्यांनी सजलेली भव्य रांगोळी लक्ष वेधून घेत होती. महात्मा फुले पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
विलास किरोते, महेश बनकर, नवनाथ लोंढे, नागेश भिसले, सुरेखा खरे, प्रा. शरद जावडेकर, वर्षाताई गुप्ते, प्राचार्य वृषाली रणधीर, गणेश मेरगू, अरुणचंद्र गवळी यांची उपस्थिती होती. रघुनाथ ढोक यांनी पारंपरिक बळिराजा, तर सम्यक शेलार याने महात्मा फुले यांची वेशभूषा साकारली तर आभार रोहिदास तोडकर यांनी मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar