पुणे - ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी, अशी मागणी विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. मात्र त्यांच्या या मागणीला ब्राह्मण महासंघ आणि मराठा क्रांती ठोक मोचनि विरोध केला आहे. जनगणना करायची तर सर्वांची करा, अशी मागणी पत्रकार परिषदेत ब्राम्हण महासंघाने केली आहे. पुण्यात आज ब्राह्मण महासंघ आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे बोलताना म्हणाले की, जनगणना करायची तर सर्वांची करा. फक्त ओबीसी हा प्रवर्ग आहे जात नाही. घटनाबाह्य मागणी न करता घटनेत बसणारी मागणी सभागृहात नेत्यांनी करावी. जर ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना केली तर मराठा क्रांती ठोक मोर्चासह ब्राह्मण समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशाराच दवे यांनी दिला.