परड्या अन् कवड्यांच्या माळा जाळून लातुरात आंदोलन.
लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली धम्मदिक्षा दिली असली तरी बहुजन समाजात आजही रुढी परंपरा कायम आहेत. त्यामुळेच आराध्यांच्या घरात आराधीच जन्माला येण्याची प्रथा आजही कायम आहे. ही प्रथा मोडीत काढली तरच आराध्यांच्या घरातही जिल्हाधिकारी जन्माला येतील, असा विचार मांडत लहुजी साळवे कर्मचारी मंडळाच्या (लसाकम) वतीने लातूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायथ्याशी परड्यांचे दहण करण्यात आले.
लातूर शहरात लसाकम संघटनेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुक्रवारी ( दि. १५ ) सायंकाळी बार्शी रोडवरील संविधान चौकातून व आण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून दोन रॅली काढण्यात आल्या. या दोन्ही रॅलीत महिला आणि पुरुषांनी हातात जोगवा मागण्याच्या परड्या आणि कवड्याच्या माळा घेऊन महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. दोन्ही रॅली टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोचल्यानंतर या परड्यांचे आणि कवड्यांच्या माळांचे दहण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहण करून १९५६ साली धम्म दिक्षा घेतली. परंतू, आजही बहुजन समाजातील रुढी परंपरा दूर झालेल्या नाहित. त्यामुळे, आमच्या विकासाला खिळ बसली असली आहे. या रुढी परंपरा बहुजन समाजाने झुगारुन द्याव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे लसाकमचे जिल्हा सचिव मधुकर दुवे यांनी सांगीतले. आंदोलनात लसाकमचे राज्य नियोजक नरसिंग घोडके, प्रदेश सचिव राजकुमार नामवाड, सत्यशोधक महासंघाचे राज्याध्यक्ष डी. एस. नरसिंगे, महिला प्रतिनिधी अनुसया हजारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी सहभाग घेतला होता.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan