दौंड, दि. २०२५: भिगवण येथे अखिल भारतीय आदिम महासंघ, शेवराई सामाजिक संस्था पुणे, आणि आदिवासी पारधी समाजाच्या विविध संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेले दोन दिवसीय राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरसता संमेलन उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाले. या संमेलनात पारधी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, न्याय, स्वाभिमान, आणि सर्वांगीण विकासासाठी ठोस धोरणे निश्चित करण्यात आली. हजारो पारधी बांधवांनी एकत्र येऊन आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी शक्तिशाली आवाज उठवला आणि समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने लढण्याचा संकल्प व्यक्त केला.

संमेलनाला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम, अखिल भारतीय आदिम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रुपसंगभाई भरभिडिया, नीति आयोगाचे सदस्य पद्मश्री दादासाहेब ईदाते, पोलीस महानिरीक्षक यम. के. भोसले, आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, बबनराव गोरामन, परमेश्वर काळे, ऑड. बबीता काळे, ऑड. विशाल भोसले, लक्ष्मण आकुळ काळे, आणि राजेंद्र काळे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. या संमेलनात पारधी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर झाले, ज्यात आदिवासी पारधी समाजाला आदिम जमातीचा दर्जा देणे, “क्रांतिवीर समशेरसिंह पारधी विकास महामंडळ” स्थापन करून १०० कोटींचा निधी उपलब्ध करणे, प्रत्येक पारधी वस्तीला महसुली गावाचा दर्जा देणे, गायरान आणि वनजमिनींचे नवीकरण करणे, “छत्रपती शिवाजी महाराज जनस्वराज्य अभियान” राबवणे, अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी, स्वाभिमान सबलीकरण योजना सुरू करणे, आणि महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोगावर पारधी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नियुक्ती यांचा समावेश आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संमेलनात आश्वासन दिले की, पारधी समाजाच्या सर्व मागण्या आणि ठराव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून सकारात्मक निर्णयासाठी वैयक्तिक पाठपुरावा केला जाईल. संमेलनादरम्यान शासनाच्या कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. पुणे जिल्ह्यातील १० पिढीत कुटुंबांना घरकुल योजनेंतर्गत घरे मंजूर झाली, तर अनेकांना जातीचे दाखले आणि रेशनिंग कार्ड वितरित करण्यात आले. याशिवाय, ६८ कुटुंबांना आर्थिक स्वावलंबनासाठी कुक्कुटपालन, शेळीपालन, पिठ गिरणी, आणि लघुउद्योगांसाठी निधी मंजूर झाला, जो थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. संमेलनात हजारो पारधी बांधवांनी उपस्थिती लावून समाजाच्या एकजुटीचे आणि विकासाच्या दिशेने टाकलेल्या पावलांचे दर्शन घडवले.
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
फुले - शाहू - आंबेडकर