गडहिंग्लज, सप्टेंबर २०२५: राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाला केवळ मतपेटीतील साधन म्हणून वापरले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांचे आरक्षण संपवण्याचा डाव खेळला, असा थेट आरोप ओबीसी जनमोर्चाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी केला. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या राजकीय पक्षांपासून सावध राहण्याचे आणि अशा पक्षांना मतदान न करण्याचे आवाहन त्यांनी गडहिंग्लज येथील सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्ता मेळाव्यात केले. अक्क्रमादेवी मंटप येथे आयोजित या मेळाव्यात ओबीसी समाजाच्या संवैधानिक हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचा संकल्प घेण्यात आला.

मेळाव्याची सुरुवात बिंदू चौक येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीने झाली. यावेळी दोन महत्त्वाचे ठराव मंजूर झाले: पहिला, कुणबी दाखले असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा; आणि दुसरा, खऱ्या ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे न करणाऱ्या राजकीय पक्षांना मत न देण्याचा. लोहार यांनी सांगितले की, जर राजकीय पक्षांनी खरे ओबीसी उमेदवार उभे न केले आणि त्याऐवजी कुणबी दाखले असलेल्या उमेदवारांना पाठिंबा दिला, तर ओबीसी समाजाने अशा उमेदवारांना मतदान करू नये.
मेळाव्यात रणजीत पोवार, संतोष माळी, मारुती टिपुगडे, संभाजी पोवार, आणि संदीप कुंभार यांनी ओबीसी आरक्षणातील घुसखोरी सहन न करण्याची ठाम भूमिका मांडली. ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर यांनी स्वागत केले, तर अर्चना गुरव, महेश यादव, सचिन सुतार, माजी नगरसेवक प्रकाश कुंभार सावर्डेकर, मुस्लिम ओबीसी संघटनेचे मुसा पटवेगार, ओबीसी बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, वंचितचे अरुण सोनवणे, धनगर समाज संघटनेचे संजय वाघमोडे, यशवंत शेळके, विद्या बनसोडे, आणि सिताराम चौगुले यांनी ओबीसी हक्कांचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सुतार आणि काशिनाथ माळी यांनी केले, तर ओबीसी बहुजन आघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष पंडित परीट यांनी आभार मानले. कृष्णात कुंभार, चंद्रकांत कोवळे, सुनील महाडेश्वर, किशोर लिमकर, मोहन हजारे, अमर कुंभार, नारायण सुतार, धनाजी परीट, आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
फुले - शाहू - आंबेडकर