सांगली - यंदाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती अंधश्रद्धा निर्मूलन प्रेरणा पुरस्कार सांगली येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती पुरस्कार निवड - समितीचे प्रमुख पद्मश्री पोपटराव पवार, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, भुषण देशमुख, अजित कुलकर्णी यांनी दिली. रोख रुपये ११ हजार, सन्मानपत्र, शाल, पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि. ६ एप्रिल रोजी हुतात्मा स्मारक, सोलापूर येथे जेष्ठ विचारवंत आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक प्राणीमित्र विलासभाई शिवलाल शहा यांनी स्थापन केलेल्या प्राणीमित्र विलास शिलाल सर्वोदय ट्रस्ट सोलापूर आणि स्नेहालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी समाजातील समर्पित व्यक्तिमत्त्वांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविले जाते.
गेल्या २३ वर्षांपासून समितीचे कार्य
थोरात हे गेल्या २३ वर्षापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. डॉ. दाभोलकर यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. त्यांनी भोंदू बुवा बाबांचा भांडाफोड, महिलांचे जटा निर्मूलन, आंतरजातीय विवाह, पुस्तक प्रकाशन या क्षेत्रात काम केले आहे. सध्या ते अनिसच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असंख्य कायदेशीर आणि सामाजिक अडचणींना तोंड देत आज अखेर चालू ठेवले आहे.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan