अंधश्रद्धेचं लांच्छनास्पद ओझं !

     भारत हा जगाचा अध्यात्मिक गुरू असल्याची शेखी धर्माचे ठेकेदार, पंडित, पुजारी मिरवीत असतात. राजकीय नेतही या बाबीला देशाचा गौरव म्हणून प्रस्तुत करतात. पण आपला समाज अंधश्रद्धामुक्त, कर्मकांडमुक्त बुद्धिप्रामाण्यवादी कधी होईल याची गरज विचारवंताशिवाय कुणालाच वाटत नाही ! त्यामुळेच आमची वाटचाल आज भौतिक प्रगती होऊनही अधोगतीकडे सुरू आहे.

    इथल्या व्यवस्थावादी समाजाला पुरोगामी, समतावादी विचार पचत नाही. विज्ञाननिष्ठ विवेक रूचत नाही आजही देशात मुलाचा जन्म झाल्यावर त्याच्या जन्माची नोंदणी करण्याऐवजी ज्योतिषाकडून त्याची कुंडली (जन्मपत्रिका) बनविली जाते. त्याच्या जीवनावरील बऱ्यावाईट ग्रहांचा शोध घेतला जातो. राहू-केतू, शनी, मंगळाला भारतीय ज्योतिषी शुभ मानत नाहीत. कारण शांतीच्या नावावर लोकांकडून दक्षिणा म्हणून पैसा लुबाडायचा असतो. पाश्चिमात्य लोकांचे मात्र या अशुभ ग्रहांमुळे काहीच अडत नाही. वास्तविक पाहाता कुठल्याच ग्रहाचा माणसाच्या जीवनावर अनुकूल वा प्रतिकूल परिणाम होत नाही.

     आजही समाज एखाद्या पोटार्थी साधूच्या, लफंग्या भोंदूच्या व चमत्कारी बाबाच्या भूलथापेवर अंधपणे विश्वास ठेवतो. तो तपासण्याची त्यावरचा कार्यकारणभाव शोधायची अनेकांना गरज वाटत नाही. त्यामुळेच कुंभमेळ्यातील घाणेरड्या प्रदूषीत पाण्यातील स्नानाला पवित्र शाहीस्नान म्हणून खोटं समाधान मानलं जातं. तीर्थक्षेत्रांतही हीच स्थिती असते. एखादी दुर्घटना घडल्यास तिचा संबंध अमंगल कृती झाल्याशी जोडला जातो. नाशिक येथील कुंभमेळ्याच्या वेळी चैनखोर जीवन जगणाऱ्या साधूंनी चांदीचे शिक्के उधळले. ते घ्यायला लोक एकमेकांना ढकलत पुढे सरसावले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. जवळपास ३३ निर्दोष लोकांना जीव मगवावा लागला, त्याचवेळी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ म्हणजे पाच कोटी सत्याशी लक्ष किलोमीटर्स अंतरावर आलेला होता. पण कुणीतर अफवा पसरवली की मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने चेंगराचेंगरीत लोक मेले म्हणजेच मंगळ ग्रह पृथ्वीजवह येण्याच्या भौगोलिक वास्तवाला अमंगल ठरवले गेले. त्यावर अनेकांनी बुद्धी , विवेक गहाण ठेवून विश्वास ठेवला. पण शिक्के उधळणाऱ्या ऐशखोर साधूंजवळ चांदीचे शिक्के कठून आले ? ते त्यांनी का उधळले याचा विचार कुणीही केला नाही.

    उत्तर प्रदेशात मायावती सरकार मंगळाच्या प्रकोपामुळे पडले, अशी हूल उठवण्यात आली. आपल्या डोके मोजण्याच्या लोकशाहीत ‘आयाराम' आला की बहुमत मिळते. 'गयाराम' गेला की सत्तापक्ष अल्पमतात येतो. हे आता अडाणी माणूसही सांगू शकतो. मंगळच्या कोपामुळे कुठलेही सरकार पडत नाही वा त्याच्या कृपेमुळे कुणाचेही सरकार तरत नाही . पण कर्मकांडवादी लोक अजूनही समाजातील लोकांना बुळे - बावळे समजून त्यांना मूर्ख बनवत आहेत ! समाजाने किमान सुशिक्षित म्हणणाऱ्यांनी अशा लोणकढी थापांपासून सावध राहिले पाहिजे ! अशा वृत्तीचा कडाडून विरोध केला पाहिजे.

    एखादी घटना घडली की तिचा संबंध शुभ - अशुभ, मंगल - अमंगल अशा भ्रमक संकल्पनेशी जोडायचा व आपला धंदा सुरू ठेवायचा, असे हे कुटिल षड्यंत्र आहे . आणखी किती वर्षे आपण हे खपवून घेणर आहोत. हाच प्रश्न आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या चार राज्यातील निवडणुकीत भाजपाला मंगळ शुभ होता. काँग्रेसला अशुभ वा प्रतिकुल होता, असे ग्रहस्त लोक सांगायला कमी करणार नाहीत. मंगळ शुभ वा अनुकूल असल्याने भाजपाला मध्य प्रदेशात, छत्तीसगड व राजस्थान राज्यांत यश मिळाले याला कुठला ठोस आधार आहे ? तसे असेल तर मग नेमका दिल्लीत तो अशुभ कसा झाला ? मध्य प्रदेशात दोन तृतीयांश बहुमत मिळण्या इतपत तो अनुकूल कसा झाला याचे तर्कशुद्ध उत्तर मिळत नाही.

     आज विज्ञान, तंत्रज्ञान प्रगत झाले असली तरी चागल्या कामासाठी शुभ दिवस, शुभ मुहूर्त विचारणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. अंधार व उजेड सूर्यास्त व सर्योदयाशी निगडीत असतो. तरी अमावस्येला अशुभ मानण्याची मानसिकता अद्यापही का बदलत नाही ? पंचांग पाहून पाऊल उलणाऱ्यांची संख्या आजही कमी झालेली नाही. पत्रिकेत किती गुण जुळतात हे पाहुन लग्न जुळवले तरी समाजात हुंडाबळी , घटस्फोट यांसारख्या घटनांची संख्या कमी झालेली नाही. उलट त्यात वाढ होत आहे.असे का ? याचे पटणारे उत्तर कुठलाच भविष्यवेत्त देत नाही. पण आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण - कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव शोधायची सवय आम्ही लावून घेतलेली नाही. पंडित पुरोहिताने सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळतो असे म्हटले तरी त्याला विरोध केला जात नाही.

    "भगव्यांच्या शाळेमध्ये चला ज्योतिष शिकू भविष्याच्या नादी लागून वर्तमान विकू !” वर्तमान विकायला निघालेला माणूस भविष्य घडवू शकत नाही हे या ओळींतील मर्म समजून घ्यायला हवे !

    आजची पिढी ही अंधश्रद्धेचं शोषक ओझं घेऊन जगत आहे . हा काळाकुट्ट अंधार उजळून निघावा, सारा समाज विज्ञानवादी विचारांनी प्रकाशित व्हावा, असं कुणालाच वाटत नाही.

    चुकीच्या माणसांचा गौरव करायला, त्यांना थोरवीचे प्रमाणपत्र द्यायला आमच्या नेत्या प्रणेत्यांना जराही संकोच वाटत नाही. ज्या नरेंद्र स्वामी नावाच्या माणसाने स्वमहात्म वाढवण्यासाठी १९९९ मध्ये जगबुडी होणार. त्यांचे शिष्य मात्र तरणार, अशी वल्गना केली त्या माणासाचा नुकताच मुंबई येथे संसदेच्या उच्चपदी बसलेल्या नेत्यांनी भरभरून गौरव केला. त्यामुळे सर्वत्र चुकीचा संदेश गेला.

    कधीकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड्यात ग्रामसेवकाची नोकरी केली. आणि नको तो चमत्कार घडवण्याचं वार नरेंद्र सुर्वेच्या डोक्यात संचारलं, त्यांचा या भूतलावर जन (अ) कल्याणसाठी नरेंद्र महाराज म्हणून नवा जन्म झाला. अंनिसचे नरेंद्र दाभोळकर यांनी या बुवाबाजीचे बिंग पूर्वीच फोडले आहे. त्यांच्या चमत्काराने म्हणुन पुत्रप्राप्ती, धनलाभ होतो. टक्कलवर केसही येतात. त्यांनी जग बुडण्याची भिती दाखवत आपला शिष्य संप्रदाय वाढवला. शिष्य बुडणार नाहीत अशी भुलथाप देऊन शिष्य होण्याची अनेकांना गळ घातली. आज जग बुडालेले नाही. पण महाराज मात्र धनसंपन्न होऊन खूप वर गेले आहेत. त्यांच्या ट्रस्टच्यावतीने दोन लाखांचा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. जे लोकांचं जीवनगौरव पुरस्कार वाटत आहेत. पुरस्कार वितरणामुळे महाराजांचा उच्चपदी बसलेल्यांशी परिचय होत आहे. त्यांचे वलय वाढून धन संकलनाचा ओघ वाढलेला आहे ! प्रश्न आहे तो बुवाबाजीचे स्तोम वाढवणाऱ्यामहाराजांचा गौरव व्हावा की होऊ नये. आपले स्वातंत्र्य साठ वर्षांचे झाले आहे. पण नेत्यांच्या बालिश बौद्धिक क्षमतेमुळे ते परिपक्व झाले नाही. नव्या जोमदार पिढीने अंधश्रद्धेचं, कर्मकांडाचे लांच्छनास्पद ओझ भिरकावून द्यायला हवं!

डी.बी.जगत्पुरिया,   झुंबर

 

Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209