मुक्ती कोन पथे ?
Mukti Kon Pathe book writer Dr B R Ambedkar
मुक्ती कोन पथे ? लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हिंदु धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय ?
दरेक नागरिकाला जेवढे कायद्याने व्यवसाय स्वातंत्र्य आहे, तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हाला ही आहे, दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्ति स्वातंत्र्य आहे. तेवढे व्यक्ति स्वातंत्र्य लुम्हाला ही आहे. असे काही लोक म्हणतील परंतु या म्हणण्यात खरोखर काही अर्थ आहे काय ? तो याचा खोल विचार तुम्ही करायला पाहिजे. ज्याला जन्म जात धंद्या शिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही, त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे असे सांगण्यात काय हासिल आहे ? ज्याला संपत्ती मिळविण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही, तुझा संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस हे असे सांगण्यात काय सत्य आहे? ज़न्म जात अपवित्रतेमुळे ज्याचा नोकरीत प्रवेश होऊ शकत नाही, ज्याच्या हाताखाली नोकरी करण्याचा इतर लोकांना अपमान वाटतो अशा माणसात कोणत्याही नोकरीवर हक्क सांगण्याचे तुला स्वातंत्र्य आहे, असे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे आहे. कायद्याने पुष्कळ हक्क दिले असतील पण समाज त्यांचा उपयोग करू देईल तरच ते खरे हक्क आहेत, असे म्हणता येईल. अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे, असा हक्क कायद्याने दिला आहे. पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग ? अस्पृश्याना तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज अस्पृश्याना धातूची भांडी वापरु देत नाहीत तर त्या हक्काचा काय उपयोग ? अस्पृश्यांनी आपल्या घरावर कौल घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज त्यास कौल घालू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग ? अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. परंतु सारांश हा कि समाज उपभोगू देईल तर आपला हक्क असे म्हणता येईल. ज्या हक्काला समाजाचा आइ काठी आहे, हरकत आहे तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाहीं अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे. सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यत्त तुम्हाला प्राप्त झाले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने किती ही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे असे काही लोक सांगतील. तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते कायद्याचा मनाई नसेल त्या प्रकारे बोलता येते हे खरे परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे ? मनुष्यमात्राला जसे शरीर आहे तसेच मन ही आहे. जितकी शारारिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकाच मानसिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. नुसत्या शरीरिक स्वातंत्र्याला काही उपयोग नाही महत्व आहे ते मानसिक स्वातंत्र्याला आहे. खरे म्हटले असता शरीर स्वातंत्र्य कशा करिता असते? ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याच करता आहे. केद्याच्या पायातील बेड्या काडून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय ? हेतू एवढाच की त्याने बाहय जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा म्हणून. परंतु ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असल्या बाहयात्कारी स्वातंत्र्याचा काय उपयोग ? मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे, ज्याचे मन स्वातंत्र्य नाहीं तो जरी तो कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य हा जिवंतपणाची साक्ष आहे. परंतु मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याचा जाणीव करून घेतो त्याला मी स्वातंत्र्य म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही जो परिस्थितीला आपल्या कयात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो रुढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचारांचा ज्योत विझली नाहीं तो स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्य कारणभाव ध्यानात घेतल्या शिवाय कशावर विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असताना त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो. जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे, तोच माणूस स्वातंत्र्य आहे, असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो. सारांश जो सर्वस्व स्वाधीन आहे, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.