कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षित मतदारसंघातून कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवणाऱ्या कुणबी उमेदवारांना मतदान न करता त्यांची अनामत रक्कम जप्त करा, असे आवाहन ओबीसी नेते दिगंबर लोहार यांनी केले. करवीर तालुक्यातील कोपार्डे-सांगरूळ फाटा येथे करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा या तीन तालुक्यांतील प्रमुख ओबीसी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती भगवान परीट होते.
दिगंबर लोहार म्हणाले की, खऱ्या ओबीसींनी लढून मिळवलेले घटनात्मक हक्क, अधिकारांवर महाराष्ट्रातील प्रबळ आणि सबल समाज घुसखोरी करून ओबीसींचा सामाजिक न्याय डावलत आहे. ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कावर गदा आणत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ४५ वर्षे ओबीसींना राजकीय सत्तेत हिस्सेदारी मिळाली नव्हती. राजकीय पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याने १९९५ पासून मंडल आयोगामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अलुतेदार-बलुतेदार सेवाकरीवर्गाला राजकीय आरक्षण मिळाले; परंतु सत्तेसाठी हपापलेल्या प्रबळ समाजाने ओबीसींमध्ये घुसखोरी करण्यासाठी कुणबी जातीचे दाखले काढून ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व संपवण्याचा कुटील डाव सुरू आहे. हा डाव उलटवून टाकण्यासाठी ओबीसींनी कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवणाऱ्या ओबीसी उमेदवारास मतदान करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवाजीराव कुंभार, सागर सकपाळ, तुकाराम परीट, पांडुरंग कुंभार, सचिन सुतार, महादेव माळी, रघुनाथ भालकर, धोंडिराम कुंभार, संजय सुतार, संभाजी भोसले, नामदेव सुतार, ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, करवीर तालुकाध्यक्ष पंडित परीट, संजय सुतार, महावीर रोटे, गणेश माने, पंडित कुंभार, भगवान सुतार, सर्जेराव सुतार, शिवाजी माने, बाजीराव माने शशिकांत कुंभार, महादेव सुतार, चंद्रकांत जंगम, एकनाथ कुंभार, चंद्रकांत भोसले उपस्थित होते.