ओबीसींच्या हक्काच्या जागांवर डल्ला !

पुणे - पिंपरी - चिंचवड महापालिकेत मराठा समाजाने ५२ जागा बळकावल्या ?  – ओबीसी संघटनांचा गंभीर आरोप

     पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी राखीव असलेल्या जागांवर सत्ताधारी आणि प्रबळ मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात डल्ला मारला गेल्याचा गंभीर आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले असले तरी, बनावट कागदपत्रे आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या आडून मराठा उमेदवारांनी ओबीसींच्या हक्काच्या जागा हडपल्या, असा दावा ओबीसी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.

OBC_Reservation_Chi_Chori_Exposed_-_Pune_Pimpri_Chinchwad_Maratha_in_OBC_Reservation

     पुणे महापालिकेत ओबीसींसाठी ४४ जागा राखीव होत्या. त्यातील तब्बल २६ जागांवर मराठा उमेदवारांनी 'कुणबी' प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. यामध्ये भाजपचे १७ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ नगरसेवकांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२५ जागांपैकी ओबीसींसाठी ३४ जागा राखीव होत्या, पण त्यातील २६ जागांवर मराठा उमेदवारांनी कुणबी प्रमाणपत्र सादर करून डल्ला मारला. यात भाजपचे १७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आणि शिंदे गटाच्या सेनेचे २ नगरसेवक आहेत.

     ओबीसी संघटनांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकार केवळ आरक्षणाची चोरी नाही तर संविधानाने दिलेल्या हक्कांचे उल्लंघन आहे. बनावट कागदपत्रांद्वारे आरक्षित जागा बळकावणे हे गंभीर गुन्हेगारी कृत्य असून, याबाबत निवडणूक आयोगासह सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देण्याची तयारी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

     पत्रकार परिषदेला मृणाल ढोले पाटील, सुरेश गायकवाड, आनंदा कुदळे, नंदकुमार गोसावी आदी ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसी समाजाने एकजुटीने यासारख्या प्रकारांचा विरोध करावा आणि आपल्या हक्कांसाठी जागरूक राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

     हा प्रकार ओबीसी समाजातील असंतोष वाढवणारा असून, यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.