मुख्य मजकूराकडे जा

मुक्‍ती कोन पथे ?

Mukti Kon Pathe book writer Dr B R Ambedkar

Page 9 of 15
19 नोव्हेंबर 2021
Book
5,1,7,3,,

मुक्‍ती कोन पथे ?  लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

नामांतर आणि धर्मातर

     येथपर्यत धर्मातराचा कारणमीमांसा तुमच्यापुढे मी मांडली आहे. हि कारणमीमांसा तुम्हाला विचार प्रवर्तक होईल अशा मला आशा आहे. हि कारणमीमांसा ज्यांना खोल आणि गहन अशा वाटत असेल त्यांना या विषयाचा सहज समज पडावा म्हणून मी काही साधे बालबोध विचार तुमच्या पुढे मांडणार आहे. या धर्मांतराच्या प्रश्नात नवे असे काय आहे? खरे म्हटले असता हिंदूंचा आणि तुमचा सामाजिक संबंध काय आहे? जितके मुसलमान लोक हिंदूपासून भिन्न आहेत तितकेच तुम्ही हि हिंदूपासून भिन्न आहात. खिस्ती समाज हिंदूपासून जितका भिन्न आहे तितकेच तुम्हीही हिंदूपासून भिन्न आहात. ख्रिस्ती व मुसलमान यांच्याशी जसा हिंदूंचा रोटी बेटी व्यवहार होत नाही, तसा तुमच्याशी हि होत नाही. तुमचा आणि हिंदूंचा समाज हे आता सुद्धा निरनिराळे, वेगवेगळे दोन समाज आहेत. धर्मातर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले, असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही व कोणालाही तसे वाटावयाचे नाही. आज़ जर तुम्ही निराळे आहात तसेच धर्मातर केल्यामुळे निराळे होणार आहात. धर्मातराने नवे असे काही होणार नाही हे जर खरे आहे तर धर्मातराचा बाऊ कोणाला कां वाटावा हे मला समजत नाही. दुसरे असे की धर्मातराचे महत्त्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्त्व तुम्हा सर्वाना पटले आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तर तो चोखामेळा हरिजन वेगैर सांगतो. पण महार हे नाव सांगत नाही. नामांतर करण्याचा जरुरी पडल्या शिवाय कोणीही नामांतर करणार नाही. अशा प्रकारचे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे. अपरिचित अशा माणसाला अस्पृश्य कोण व स्पृश्य कोण हे सांगता येणार नाही आणि म्हणून जोपर्यंत जात कळली नाही तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारचा दूषित भावना उत्पन्न होत नाही. प्रवासात अपरिचित अस्पृश्य व स्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात. एकमेकांपासून विडीपान घेतात. फळफळावळ घेतात. परंतु त्याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याचा जात कळली व त्याची जात अस्पृश्य आहे असे समजले की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होते, त्याला तिडीक येते; व आपल्याला फसवले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात ज़डलेल्या मैत्रीचे पर्यवसान शिवीगाळीत व मारामारीत होते हा अनुभव पुष्कळांना असेल, अशी माझी खात्री आहे. हा असा प्रकार का होतो, तें तुम्हा सर्वास अवंगतआहे. तुम्हाला जी ही जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतका दुर्गधी लागलेली आहे कि त्यांचा उच्चार केला असताना देखील स्पृश्य लोकांना मळमळून येते. आणि म्हणूनच तुम्ही स्वत:ला महार न म्हणता, चोखामेळा म्हणुन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता, परंतु त्याने लोक फसत नाहीत याचा ही तुम्हाला अनुभव आहेच. कारण चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय जे समजावयाचे ते समजतातच. तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनेच तुम्ही सिद्ध केले आहे. मला तुम्हाला एवढेच विचारावयाचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला अवश्य वाटते तर मग तुम्हाला धर्मांतर करण्यास काय हरकत असावी तो धर्मांतर हे एका दृष्टीने नामांतरच आहे. धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला जास्त फायदेशीर पडेल. मुसलमान म्हणवून घेणे, खिस्ती म्हणवून घेणे, बौद्ध म्हणवून घेणे, शीख म्हणवून घेणे हे धर्मांतर आहेच पण नामांतर ही आहे, ते खरे नामांतर आहे. या नामांतराला दुर्गधी नाही. हे नामांतर आमूलाग्र आहे त्याचा शोध कोणी करू शकणार नाही. परंतु चोखामेळा, हरिजन या जुन्या नावाची घाण लागल्या शिवाय राहणार नाही. जोपर्यत तुम्ही हिंदु धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला या नामांतरापासून काही अर्थ नाही. नव्या नावाला नामांतर करावेच लागेल. कारण नुसते हिंदू म्हणवून चालणार नाही. हिंदू हा कोणी मनुष्य प्राणी आहे असे कोणीच ओळखीत नाही. महार अमे सांगून भागणार नाही कारण त्या नावाचा उच्चार केल्या बरोबर कोणी जवळ येणार नाही. असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा आज़ हे नाव, उद्या ते नाव, असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही कां करू नये, असा तुम्हाला माझा प्रश्न आहे.

विरोधकांची भूमिका

Mukti Kon Pathe book written by Dr B R Ambedkar

     धर्मांतराची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांना त्या चळवळीच्या विरुद्ध अनेक आक्षेप घेतलेले आहेत. त्या आक्षेपात किती सत्य आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. काही हिंदू लोक धार्मिकपणाचा मोठा आव आणून तुम्हाला अरे सांगत आहेत की "धर्म हा काही उगभोगाची वस्तू नव्हे. ज्याप्रमाणे आपण आज एक कोट घालतो, दुसऱ्या दिवशी दुसरा घालतो त्याचप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही. हिंदु धर्माला झुगारून देऊन तुम्ही परधर्मात जाता तर जे तुमचे पूर्वज इतके दिवस या हिंदु धर्मात राहिले ते मूर्ख होते कि काय?" हे असा प्रश्न काही शहाण्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या दृष्टीने या आक्षेपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. केवल पूर्वजांचा धर्म म्हणूनच त्याला चिटकून राहावे हे म्हणणे एखाद्या मूर्खाला शोभू शकेल. कोणीही शहाणा माणूस अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून धर्मांतर करू नये, असे म्हणण्याऱ्या लोकांनी इतिहास वाचला नसेल असेच म्हणणे प्राप्त आहे. पूर्वीचा आर्याचा धर्म, ज्याला वैदिक धर्म म्हणतात, त्यात गोमांस भक्षण करणे, दारु पिणे, स्वैर वर्तन करणे या तीन गोष्टीत मुख्यतः धर्म साठविला होता. तो धर्म हजारों वर्ष हिंदुस्थानातील लोकांनी पाळला व अजून हि काही ब्राहमण लोकांना त्या धर्माकडे जाण्याची हक्की येते. केवळ पूर्वजांचाच धर्म पाळायचा तर वैदिक धर्म सोडून हिंदुस्थानातील लोकांनी बौद्ध धर्म का नाकारला? तो वैदिक धर्म त्यांनी का नाकारला? या धर्मात आमचे पूर्वज राहिले हि गोष्ट खरी आहे. परंतु ते लोक स्वसंतोषाने स्वखुशीने राहिले असे मात्र माझ्याने म्हणवत नाही. या देशात अनेक कालपावेतो चातुर्वर्णयाची संख्या अव्याहत चालु होती या चातुर्वर्णयात ब्राहमणांनी विद्या शिकवी, क्षत्रियांनी लडाई करावी, वैश्यांनी पैसा मिळवावा व शूद्रानी सेवा करावी असा नियमबद्ध आयुष्यक्रम बांधलेला होता. या आयुष्यक्रमात शूद्र लोकांजवळ विद्या नव्हती, धन नव्हते आणि अन्न वस्त्र नव्हते. अशा विपत्र व निशस्त्र स्थितीत ज्या तुमच्या पूर्वजांना राहावे लागले त्यांना हा धर्म स्वसंतोषाने स्वीकारला असे कोणीही शहाण्या माणसास म्हणता येणार नाही. या तुमच्या पूर्वजांना या धर्मा विरुद्ध बंड करणे शक्य झाले असते काय? याचा विचार अवश्य करणे प्राप्त आहे. त्यांना बंड करता आले असते व त त्यांना केले नसते तर हा धर्म त्यांना स्वसंतोषाने पत्करला असे म्हणता आले असते. परंतु खरी वस्तुस्थिती पाहिली असताना त्यांचा निरुपाय झाल्यामुळेच या धर्मात त्यांना राहावे लागले, हा गोष्ट निर्विवाद आहे. या दृष्टीने पाहिले असताना हा हिंदू धर्म आमच्या पूर्वजांचा धर्म नसून, तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहै. त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती म्हणून त्यांना त्या गुलामगिरी विरुद्ध बंड करता आले नाही व गुलामगिरीतच राहावे लागले. याबद्दल त्यांना कोणी दूषण देणार नाही. कोणी झाली तरी त्याची किवच करील. परंतु हल्लीच्या पिढीवर तशा प्रकारची जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही. त्यांना सर्व बाबतीत स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर त्यांनी आपली स्वत:ची सुटका करून घेतली नाही तर त्यांच्या सारखेच नाच, त्यांच्या सारखे अधर्म व त्यांच्या सारखे परोपजीवी दुसरे कोणीच नाहीत, असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागेल.

माणूस आणि पशूतील फरक

     केवल पूर्वजांचा म्हणूनच त्याला चिटकून राहावे, हे म्हणणे मूर्खाला शोभू शकते. कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. ज्या परिस्थितीत मनुष्य सापडला त्याच परिस्थितीत त्याने आज़न्म राहावे, हे सांगणे पशूना शोभेल माणसांना शोभू शकणार नाही. माणसात व पशूत कोणत्या प्रकारची तफावत असेल तर ती हीच की पशु आपली प्रगती करून घेऊ शकत नाही. माणूस अपली प्रगती करून घेऊ शकतो स्थित्यंतर केल्या शिवाय प्रगती होऊ शकत नाही धर्मातर हे एक प्रकारचे स्थित्यंतर आहे आणि जर धर्मातर केल्या शिवाय प्रगती होत नसेल तर धर्मातर करणे आवश्यक आहे. केवळ वडिलांचा धर्म ही बाब प्रगती प्रिय माणसाच्या आड येऊ शकत नाही. 

     धर्मातराच्या विरुद्ध आणखी ही एक मुद्दा सांगण्यात येतो. तो असा की, "धर्मातर हा एक प्रकारचा पळपुटेपणा आहे. आज हिंदुतील अनेक लोक हिंदु धर्माची सुधारणा करण्या करिता सिद्ध आहेत. त्यांच्या सहाय्याने जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करता येण्या सारखी आहे. अशा समयी धर्मातर करणे सर्वस्वी अयोग्य आहे. असे काहीचे म्हणणे आहे. हिंदूतील समाज सुधारकांबद्दल कोणाचे काय मत असेल ते असो. माझ्या मनात त्यांच्या बद्दल अत्यंत तिटकारा आहे. मला त्यांचा चांगला अनुभव आहे आणि या अर्धवट लोकांचा मला अगदी विट आला आहे. ज्या लोकांना आपल्या जातीत राहावयाचे आहे, आपल्या जातीत मरावयाचे आहे. आपल्या जातीत लग्न करावयाचे आहे, त्या लोकांना "आपण जातीभेद मोडणार आहोत" अली खोटी वल्गना करावी व त्या वल्गनेवर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून संतप्त व्हावे, हि गोष्ट मोठी आश्चर्याची आहे. या लोकांच्या वल्गना ऐकल्या म्हणजे अमेरिकेताल नियो लोकांच्या सुटकेकरिता ज्या गोऱ्या अमेरिकन लोकांना प्रयत्न केला, त्याची मला आठवण होते. एकेकाळी अमेरिकेतील नियो लोकांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गा प्रमाणेच होती. त्यांची गुलामगिरी कायद्याने प्रस्थापित केलेली होती. तुमची गुलामगिरी धर्माने प्रस्थापित कलेली आहे. एवढाच काय तो फरक आहे. या नियोंचा त्या गुलामगिरीतून सुटका करण्याकरिता अमेरिकेतील काही सुधारक प्रयत्न करीत होते. पण हिंदू समाज सुधारणकांची आणि नियोची सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोऱ्या सुधारकांची तुलना करता येईल काय? काळ्या शिद्दी लोकांनी गुलामगिरीतून सुटका व्हावा म्हणून आपल्याच रक्त मांसाच्या गोऱ्यांशी अमेरिकन सुधारणा वाद्यांनी तुंबळ युद्ध केले. त्यांना गुलामगिरीत ठेवावे असे म्हणणाऱ्या असंख्य गोऱ्या लोकांचे प्राण घेतले व आपल्या पैकी असंख्य लोकांच्या प्राणाची आहुती दिली. त्या प्रसंगाचे वर्णन इतिहासातून वाचले आणि आमच्या समाज सुधारकांचे चित्र डोळ्यांपुढे ठेवले म्हणजे 'कहा राजा कहा पोतराजा' असेच म्हणणे भाग पडते. सुधारक म्हणून म्हणविणाऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या कैवान्यांस असे विचारणे प्राप्त आहे की अमेरिकेतील गोऱ्या लोकांनी नियोच्या सुटकेकरिता जी आपआपसात यादवी केली तशी यादवी करण्यास तुम्ही सिद्ध आहात का? व सिद्ध नसाल तर सुधारणेच्या व्यर्थ वग्लना करण्यात काय हासिल आहे? हिंदू मधले फार मोठ्यातले मोठे अस्पृश्यतेच्या उन्नतीकरिता झटणारे म्हटले म्हणजे महात्मा गांधी त्यांची मजल किती लांब जाऊ शकते? इंग्रज़ सरकार विरुद्ध निःशस्त्र प्रतिकाराचा लढा लढविणारे महात्मा गांधी अस्पृश्य वर्गावर जुलूम करणाऱ्या हिंदूंच मन देखील दुखवावयाला तयार नाहीत. त्यांच्या विरुद्ध सत्याग्रह करावयाला तयार नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर इलाज करावयाला देखील तयार नाहीत. या सुधारकांचा काय उपयोग आहे, मला कळत नाही.