भारतातील जाती त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार
Bhartatil Jati Tyanchi Ghadan Utpatti Aani Prasar book by Dr. B. R. Ambedkar
लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जे वर्ग आपली प्रवेशद्वारे बंद करण्यास असमर्थ होते त्यांची कथा येथे संपते. इतरांनी प्रवेश बंद केल्यामुळे काही वर्गाची द्वारे आपोआपच कशी बंद झाली हे आता आपण पाहू या. याला जातींच्या घडणीची यांत्रिक प्रक्रिया असे मी म्हणतो. ही यांत्रिक आहे कारण ही अटळ प्रक्रिया आहे. मानसशास्त्रीय मार्गाप्रमाणेच हा मार्गही माझ्या आधीच्या विचारवंताच्या नजरेतून निसटला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी प्रत्येक जात ही एकांडी व पूर्णतः पृथक संस्था आहे अशी समजूत करून घेतली असून जाती व्यवस्थेतील एक दुवा या दृष्टीने तिचा विचार केला नाही. या नजरचुकीचा किंवा अंध दृष्टीचा परिणाम विषय योग्यपणे समजून घेण्याबाबत मोठा अपायकारक ठरला आहे व म्हणूनच स्पष्टीकरणातही घोटाळा निर्माण झाला. म्हणून पुढील अभिप्राय तुम्ही सतत लक्षात ठेवावा अशी आपणास प्रथम विनंती करून नंतरच मी माझे स्पष्टीकरण देण्याची वाटचाल सुरू करणारे आहे. तो अभिप्राय असाः जात ही तिच्या एकवचनी रूपात केवळ एक थाप होय. 'जाती' नेहमीच केवळ अनेकवचनी रूपातच अस्तित्वात असतात. नेहमी 'जाती' अस्तित्वात असतात. 'एकटी जात' अशी वस्तू कधीच नसते. मला अभिप्रेत असलेला अर्थ असाः ब्राम्हण वर्ग स्वतःला जातीचे रूप देत असतानाच त्यांनी परिणामतः अब्राम्हणंची एक जात निर्माण केली किंवा माझ्या पद्धतीने सांगायचे म्हणजेः स्वतःला एका मर्यादेत बंदिस्त करीत असतांनाच ब्राम्हणांनी बाकीच्यांना आपल्या मर्यादेच्या बाहेर बंद केले. दुसऱ्या तऱ्हेने स्पष्टीकरण करून मी माझा मुद्दा स्पष्ट करतो. हिंदु, मुसलमान, ज्यू, ख्रिश्चन व पारशी इ. वेगवेगळया धर्मानी तयार झालेल्या गटासहित संपूर्ण भारताची कल्पना करा. आता हिंदू भोवती अडसर घातली तर बाकीचे जातिरहित लोक उरतात. तथापि परस्परांच्या बाबतीत त्यासुद्धा जातीच ठरतात. आणखी जर पहिल्या चार धर्मातील लोकांनी आपापल्या वर्गाची दारे बंद करून घेतली तर पारशांनी जरी प्रत्यक्षपणे स्वतःला मर्यादा घालन घेतली नसली तरी अप्रत्यक्षपणे ते सुद्धा आपोआप बंदिस्त होतात. प्रतिमांच्या भाषेत सांगायचे म्हणजे अ वर्गाला स्ववर्गांतर्गत विवाह पद्धती पाळणारा वर्ग रहावयाचे असेल तर परिस्थितीच्या दुर्दम्य दबावामुळे व वर्गाला तसे होणे भाग पडते. आता हाच तर्क हिंदु समाजाला लावून पाहा म्हणजे जातीच्या ठिसूळ स्वभावाचे तुम्हाला आणखी एक स्पष्टीकरण मिळेल. कारण जाती व्यवस्थेतच हा दुहेरीपणा अंतर्भूत आहे. जातीपद्धतीच्या सामाजिक, धार्मिक व आर्थिक नियमांना धोका संभवणारी कोणतीही नवी प्रथा बहुधा जात चालू देत नाही. त्यामुळे जातीतील बंडखोर सभासदांना जातीबाहेर हाकलल्या जाण्याचा धोका असतो. या सभासदांना दुसऱ्या जातीने सामावन न घेतल्यामुळे व मूळच्या जातीतही परतता येत नसल्यामुळे त्यांचे भवितव्य त्यांच्याच हाती राहते. जातीत नियम अभेद्य असून लहानमोठ्या गुन्हामध्ये ती फारसा फरक करण्यासाठी अडून बसत नाही. नवी प्रथा कोणत्याही प्रकारची असो सर्वाना एकच दंड देण्यात येतो. विचाराच्या नव्या पद्धतीमुळेही एक नवी जात निर्माण होईल ! कारण जुनी जात ती चाल देणार नाही ! बंडखोर विचार मांडणाऱ्याला आदराने गुरू मानण्यात येत असले तरी नीतीबाहय प्रेम करणाऱ्या पाप्याप्रमाणेच त्यालाही जात सारखीच शिक्षा देते. यापैकी बंडखोर विचारवंत धर्म संप्रदायाच्या स्वरूपाची जात निर्माण करतो व दुसरा संकरित जात निर्माण करतो. जातीचे नियम भंग करण्याचे धाडस करण्याऱ्या पापी माणसाठी जातीजवळ दया माया नसते. बहिष्कार हा त्याला दंड असतो व त्याचा परिणाम म्हणून नवी जात निर्माण होते. जातीबहिष्कृत लोक नवी जात निर्माण करतात, याला कारण हिंदू मनच तसे आहे हे नव्हे. या उलट जर दुसऱ्या जातीचे लोक त्यांचा समावेश करून घेण्यास तयार असले तर बहुधा हे लोक एखाद्या जातीचे (वरचा दर्जाची) नम्र सदसत्व पत्करण्यास तयार असतात. परंतु जाती या द्वारे बंद असलेल्या संस्था असून त्यांचे परस्परात जाणीव पूर्वक संगनमत असते. त्यामुळे बहिष्कृतांना नवी जात बनविणे भाग पडते. या बलात्कारी परिस्थतीचा न्याय निर्दययांचा असतो. तिच्या शिरजोरीसमोर मान वाकविल्यामुळे काही दुर्देवी वर्गाना आपली कोंडी झाल्याचे दिसून येते. कारण इतरांनी स्वतःला आत कोंडून घेऊन यांना बाहेर कोंडलेले असते. याचा परिणाम असा होतो की नव नवीन वर्ग-जातीच्या चौकटीला आव्हान देणारे कोणत्याही पायावर आधारलेले वर्ग - यांत्रिक प्रक्रियेने सतत जातीमध्ये रूपांतरित होत जातात व जातीची संख्या चळ लागल्याप्रमाणे फुगत जाते. भारतातील जातीच्या निर्मितीची ही दुसरी कथा इति संपूर्ण !
आता माझ्या उत्पत्तीच्या मुख्य मुद्यांचे सार सांगतो. माझ्या मते जातीने अनेक संशोधकांच्या मनात भ्रम निर्माण केल्यामुळे संशोधन कार्यात, बहुतेकांनी चुका केल्या आहेत. पाश्चात्य पंडितानी जातिव्यवस्थेत वर्णाला ( रंग ) अनाठाई महत्व दिले आहे. वर्णासंबंधी त्यांच्या मनात आधीच वर्ण द्वेषाची कल्पना असल्यामुळे जातीव्यवस्थेतही तोच प्रमुख दुवा असला पाहिजे अशी त्यांनी सहजच कल्पना करून घेतली. परंतु यापेक्षा अधिक खोटी गोष्ट असू शकत नाही. म्हणूनच डॉ. केतकरांचा आग्रह योग्य आहे. ते म्हणतात. "सर्वच राजेरजवाडे मग ते स्वतःला तथाकथित आर्य वंशाचे समजोत की द्रविड वंशाचे समजोत वस्तुतः आर्यच होते. जोपर्यंत पाश्चात्य विद्वान येथे येऊन त्यांनी आर्य व द्रविड यांच्यात भिन्नतेची रेषा काढावयास सुरवात केली नाही तोपर्यंत येथे एखादी टोळी किंवा कुटुंब वंशदृष्टया आर्य आहे की द्रविड आहे या प्रश्नाने लोकांना कधीच सतावले नाही.' चामडीच्या रंगाचे महत्व मानण्याचा कल फार काळापूर्वीच संपला आहे. यानंतर पुन्हा त्यांनी स्पष्टीकरणाच्या नावाने नुसते वर्णन केले. आणि जणू काही त्या जातीच्या उगमाच्या उत्पत्ती आहेत असे समजून त्यावरच ते झगडत बसले. धंदेवाईक, धार्मिक इत्यादी प्रकारच्या जाती आहेत ते खरे, परंतु कोणत्याही अर्थाने ते जातीच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण ठरू शकत नाही. धंदेवाईक वर्गाना 'जाती' का म्हणण्यात येते हे अजून आपणास शोधावयाचे आहे; पण हा प्रश्न कधीही उपस्थित करण्यात आला नाही. जाती संस्था ही एखाद्या फुंकरीने निर्माण होण्यासारखी वस्तू असावी त्या प्रमाणे त्यांनी जातीचा प्रश्न ढिलेपणाने हाताळला आहे. या उलट समजून घेण्यास अत्यंत बिकट असा प्रश्न आहे हे मी स्पष्ट केलेच आहे. कारण त्यामागे असणाऱ्या अडचणी अवाढव्य आहेत.
जात श्रद्धेवर आधारलेली आहे हे खरे; पण एखाद्या संस्थेचा आधार म्हणून श्रद्धा उदयास येण्यापूर्वी तिला बळकटी आणण्याची व सतत चालू ठेवण्याची आवश्यकता असते. जातीच्या माझ्या अभ्यासात चार मुद्दे अंतर्भूत आहेत :(१) हिंदुसमाजाची रचना संयुक्त स्वरूपाची असली तरीही तेथे गंभीर स्वरूपाचे सांस्कृतिक एैक्य आहे. (२) जात म्हणजे एका मोठया सांस्कृतिक एैक्य असलेल्या समाजाचा एक अंशात्मक तुकडा आहे. (३) जातीची सुरवात करणारी पहिली एक जात आहे. (४) अनुकरणाच्या व बहिष्काराच्या माध्यमाद्वारे वर्गाचे रूपांतर जातीमध्ये झाले.
ही कृत्रिम संस्था नष्ट करण्यासाठी अलिकडे मोठया चिकाटीने प्रयत्न केल्या जात असल्यामुळे या जातीच्या प्रश्नाला आज विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तथापि अशाप्रकारच्या सुधारणावादी प्रयत्नामुळे तिच्या उत्पत्ती संबंधी मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले. एखाद्या सर्वसत्ताधारी व्यक्तीने जाणीवपूर्वक आज्ञा देऊन ती निर्माण केली की एका विशिष्ट परिस्थितीमुळे मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ती आपोआप निर्माण झाली अशा वादाच्या बाजू आहेत. जे दुसऱ्या क्रमांकाची बाजू घेतात त्यांना माझ्या निबंधातील मद्यांमध्ये विचाराचे खाद्य सापडेल अशी मला आशा वाटते. याचा प्रत्यक्ष उपयोग होवो की न होवो परंतु हा जातीचा विषय सर्व समावेशक आहे, आणि त्याच्या तात्विक बैठकीबद्दल माझ्या मनात जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे माझे निष्कर्ष तुमच्यासमोर मांडण्याची मला इच्छा झाली. मला वाटते माझे निष्कर्ष योग्य पायावर आधारलेले असून खंबीरपणे उभारलेले आहेत. तथापि ते कोणत्याही दृष्टीने अंतिम स्वरूपाचे आहेत असे समजण्याइतका दुराग्रही मात्र मी नाही. उपकारक सत्य शोधण्यासाठी माझ्या मते संशोधनाचा एक योग्य असलेला मार्ग सुचवावा असा माझा प्राथमिक हेतू यामागे आहे. तथापि पुर्वग्रहदूषित होऊन या विषयाकडे जाण्यापासून आपण सावरले पाहिजे. भावनांना शास्त्राच्या कक्षेबाहेरच बंदी घातली पाहिजे व वस्तूंचे निरीक्षण वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातूनच केले पाहिजे. एखाद्या विषयावरील काही उत्पत्ती नेहमीसाठी वादग्रस्त होऊन बसत असतात. असे असले तरी जेथपर्यंत माझा संबंध आहे. तेथपर्यंत मी सांगू इच्छितो की एखाद्याचा बुध्दिवादी दृष्टीकोनातून माझ्याशी मतभेद झाला तर माझे विचार प्रत्यक्ष सोडून देण्यातही मला आनंदच होईल. सारांश, जातीची उत्पत्ती मांडण्याची माझी ज्याप्रमाणे आकांक्षा आहे त्याप्रमाणेच जर ती समर्थनीय नाही असे दाखवून दिले तर मी ती सोडून देण्यासही तयार आहे.