भारतातील जाती त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार
Bhartatil Jati Tyanchi Ghadan Utpatti Aani Prasar book by Dr. B. R. Ambedkar
लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगातील इतर समाजाप्रमाणेच भारतीय समाजही सुरवातीच्या काळात अनेक वर्गानी मिळून बनलेला होता याची आपण आठवण ठेवली तर आपणास बराच लाभ होण्यासारखा आहे. भारतात प्राचीन काळी पुढील वर्ग होते. १) ब्राह्मण किंवा उपाध्याय वर्ग, २) क्षत्रिय किंवा सैनिक वर्ग, ३) वैश्य किंवा व्यापारी वर्ग व ४) शूद्र किंवा शेतकरी व मजूरांचा वर्ग. ही वर्ग पद्धतीच होय, ही गोष्ट विशेषत्वाने लक्षात घ्यावयास हवी. या पद्धतीत व्यक्तीनी पात्रता मिळविल्यानंतर त्याला वर्ग बदलविता येऊ शकत होता. व त्यामुळे वर्गातील व्यक्ती बदलत्या राहत असत. हिंदुच्या इतिहास काळात केव्हातरी उपाध्याय वगनि सामाजिक संबंधाच्या बाबतीत बाकीच्या जनतेपासून स्वतःला वेगळे तोडून घेतले. श्रम विभागणी तत्वानुसार बाकीच्या जनतेचीही विभागणी झाली. त्यामुळे काही वर्ग खूप मोठे तर काही अगदीच लहान झाले, वैश्य आणि शूद्रात जातीच्या मूळ रूपाचा बराच मसाला भरलेला होता. त्यामुळे आजच्या अनेक जातीच्या उगमाचा हा वर्ग मूळ साठा ठरला. सैनिकी पेशा स्वभावतःच अशा पोट विभागणीस अनुकूल नसल्यामुळे क्षत्रिय वर्गाचे विभाजन राज्यकर्ते व सैनिक अशा दोनच भागात होऊ शकले. एका समाजाचे अशा तन्हेने पोटविभाग पडण्याची प्रक्रिया पूर्णतः स्वाभाविक आहे. परंतु या पोटविभागासंबंधीची अस्वाभाविक गोष्ट म्हणजे त्यांनी वर्गपद्धतीतील मुक्त प्रवेश पध्दती गमाविली आणि ते स्वयंमर्यादित वर्ग बनले. त्यांनाच जाती असे म्हणतात. प्रश्न असा की, प्रवेश बंद करून अंतर्गत विवाह करणारा वर्ग होण्यास त्यांना भाग पाडण्यात आले की त्यांनी स्वेच्छेनेच प्रवेशद्वार बंद केले ? माझे मत असे की याचे उत्तर दुहेरी स्वरूपाचे आहे. काहींनी स्वतः दारे बंद केली तर इतरांना त्यांच्यासाठी दारे बंद असल्याचे आढळून आले. यातील पहिले भाष्य मानसशास्त्रीय असून दुसरे यांत्रिक स्वरूपाचे आहे, तरीपण ते परस्पर पूरक आहेत; आणि जातीसमस्यचे पूर्ण स्पष्टीकरण करण्यासाठी दोन्हींची आवश्यकता आहे.
प्रथम मी मानसशास्त्रीय भाष्य विचारासाठी घेतो. या संदर्भात आपणाला पुढील प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे आहे. हे पोटविभाग किंवा तुमच्या आवडीप्रमाणे त्याला औद्योगिक, धार्मिक किंवा आणखी कोणतेही वर्ग म्हणा-हे वर्ग स्वयंमर्यादित अथवा अंतर्गत विवाह करणारे वर्ग का बनले?
याचे कारण म्हणजे ब्राह्मण तसे होते म्हणून, असे माझे उत्तर आहे. अंतर्गत विवाह किंवा प्रवेशबंद पध्दती ही हिंदू समाजात टूम होती. आणि ब्राम्हण जातीतून तिची सुरुवात झाल्यामुळे सर्व अब्राम्हण पोटविभागांनी किंवा वर्गानी अंतःकरणपूर्वक तिचे अनुकरण केले व पाळी पाळीने त्यांचेही अंतर्गत विवाह पाळणाऱ्या जातीत रूपांतरित झाले. विभाजनाच्या प्रक्रियेत वाटचाल करीत असताना या अनुकरणाच्या साथीचा संसर्ग सर्वच पोट विभागांना झाला व त्याने सर्वांना जातीचे रूप दिले. अनुकरणाची प्रवृत्ती मानवी मनात खोलवर रुजलेली असून भारतातील विभिन्न जातींच्या घडणीचे ते अपुरे स्पष्टीकरण आहे असे वाटू नये. तिने इतके खोलवर घर केले आहे की वाल्टर बॅगहाँट म्हणतो .* : "अनुकरण प्रवृत्ती एच्छिक किंवा जाणीवपूर्वक असते, असे आपण मुळीच समजता कामा नये. या उलट तिची बैठक मुख्यतः मनाच्या अत्यंत सूप्त भागात असते, व या सूप्त मनातील भावनांची जाणीव प्रत्यक्ष कार्य होईपर्यंत प्रगट मनाला होत नाही. इतकेच नव्हे तर आधी जाणीव होण्याच्या दृष्टीने या भावना इतक्या गूढ असतात की कार्य होत असतानासुध्दा त्या जाणवत नाहीत. आपल्या स्वभावातील अनुकरणप्रियतेचा मुख्य आधार म्हणजे आपल्या श्रध्दा होत. काही गोष्टींबद्दल आपल्या मनात अनुकूल पूर्वग्रह व काहींबद्दल प्रतिकूल पूर्वग्रह असतात याची कारणे आपल्या स्वभावाच्या गूढ भागात असतात परंतु श्रद्धाजन्य अनुकरण वृत्तीबद्दल शंकाच असू शकत नाही' ग्रॅबेल ट्रेड या लेखकाने 'अनुकरण प्रवृत्तो' हाच विषय शास्त्रीय अभ्यासासाठी निवडला असून त्याने अनुकरणाचे तीन नियम सांगितले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अनुकरणाचा प्रवाह श्रेष्ठ दर्जाच्या लोका पासून कमी दर्जाच्या लोकांकडे वाहतो. किंवा त्याचेच शब्द उद्धृत करतो. 'संधी दिली तर अमीर उमराव लोक त्यांच्या नेत्यांचे, त्यांच्या राजांचे किवा शासनकांचे सर्वकाळी व सर्वस्थळी अनुकरण करीत असतात. त्याचप्रमाणे सामान्य लोकही त्यांच्या अमीर उमरावांचे अनुकरण संधी मिळताच करीत असतात. ** ट्रेडचा दुसरा नियम असा - अनुकरण वृत्तीचा विस्तार किवा घनता अंतराच्या प्रमाणात कमी अधिक असतो. तो म्हणतो - "अत्यंत जवळच्या संबंधितांच्या सर्वात चांगल्या वस्तूचे जास्तीत जास्त अनुकरण होत असते. वस्तुतः आदर्श व्यक्तीच्या आचरणाचा प्रभाव अंतराच्या व तिच्या श्रेष्ठत्वाच्या प्रमाणात प्रत्यक्षरीत्या होत असतो. येथे आंतर याचा अर्थ त्याच्या सामाजिक संबंधाच्या अर्थाने घ्यावयाचा आहे. तथापि जर त्या व्यक्तीशी अनेक प्रकारचे व रोजचे संबंध येत असतील व आपली अनुकरण वृत्ती तृप्त करण्याची सर्व प्रकारची संधी आपणास उपलब्ध असेल तर या दृष्टीने ती व्यक्ती प्रत्यक्ष परिचित नसली किंवा फार दूर अंतरावर असली तरी ती 'जवळच' आहे. असे म्हणावे लागते. सामाजिक दृष्टया उच्चत्व लाभलेल्या लोकांनी घालून दिलेल्या प्रथांचा प्रसार क्रमशः कसा झाला याचे स्पष्टीकरण या कमीत कमी अंतराच्या अनुकरणाच्या नियमाने होते. *".
काही जातींची घडण अनुकरणाच्या वृत्तीमधून झाली ही माझी उत्पत्ती सिद्ध करण्यासाठी वस्तुतः तिला पुराव्याची गरज नाही - अनुकरणाद्वारा जातीच्या घडणीला नितांत आवश्यक असलेली परिस्थिती हिंदू समाजात होती की नाही, हे पाहणे उत्तम मार्ग ठरेल असे मला वाटते. वरील अधिकारी लेखकाच्या मते अनुकरणासाठी पुढील परिस्थिती आवश्यक असते. (१) ज्यांचे अनुकरण व्हावयाचे आहे त्यांना समाजात मानाचे स्थान असले पाहिजे आणि (२) त्या समाजातील लोकांचे 'परस्पर संबंध विभिन्न व नित्य' असले पाहिजे. ही परिस्थिती भारतात उपलब्ध होती यात शंकेला जागा नाही. ब्राम्हण अर्धामुर्धा देवच नव्हे तर भूदेव होता. तो एखादी प्रथा सुरू करतो व बाकीच्यानाही तसेच घडवितो. त्याचा अधिकार निःसंशय असून आशीर्वाद व कल्याणाचा तो मुख्य झरा आहे. अशातऱ्हेने धर्मग्रंथानी पवित्र बनविलेला व पुरोहित धाजिणी लोकांनी पुण्य बनविलेला देहधारी प्राणी आपले व्यक्तीगुण शरणांगत मानवावर लादल्याशिवाय कसा राहील ? ही गोष्ट जर खरी असेल तर त्याला निर्मितीचे मूळ कारण कां मानतात ते कळून येईल. वस्तुतः अशा प्रकारचा प्राणी केवळ अनुकरण करण्यापेक्षा अधिक पात्रतेचा असतो, निदान अनुकरणीय तरी असतोच. शिवाय तो गटांतर्गत विवाहाच्या मिर्यादा असलेल्या वेगळ्या जातीत राहात असल्यामुळे त्याच्या उदाहरणा नुसार इतर जातींनी वर्तन करू नये तर काय करावे ? मनुष्यस्वभाव किती दुर्बल ! एखादा गंभीर तत्ववेता असो की एखादी क्षुद्र मोलकरीण असो संधी मिळताच ते अनुकरणाला बळी पडल्याशिवाय राहात नाहीत. यावाचून दुसरे घडूच शकत नाही. कारण अनुकरण सोपे असून संशोधन कठीण असते.
तथापी जाती तयार होण्याच्या प्रक्रीयेतील अनुकरणाची भूमिका स्पष्ट करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ज्या रुढीनी जातीच्या शैशवावस्थेत तिच्या रचनेला आधार दिला त्या रूढीबद्दल अब्राम्हण वर्गाचा कल कसा होता हे समजून घेणे हा होय. कारण या रूढींनी जातीचे संगोपन केले इतकेच नव्हे तर हिंदू मनावर ती पूर्णपणे कोरल्या जाईपर्यंत काळाच्या ओघात सतत साथ दिली व आज त्यांच्यामुळेच कसल्याही आधारावाचून हिंदू मनात जाती लोंबकळत आहेत. आज जातीला एखाद्या तळ्यातील शेवाळासारख्या बिनबुडाच्या श्रद्धेशिवाय दुसऱ्या कोणत्याही टेकूची गरज उरली नाही. अशातऱ्हेने हिंदू समाजात एखाद्या जातीचा सामाजिक दर्जा, सती, सक्तीचे वैधव्य आणि बालविवाह या रूढी ती जात ज्या प्रमाणात पाळते त्यानुसार वेगवेगळा ठरतो. ब्राम्हणापासून असलेल्या अंतरा नुसार ( हा शब्द मी ट्रेडच्या अर्थाने वापरीत आहे ) वेगवेगळ्या जाती वेगवेगळया प्रमाणात या रुढीचे पालन करतात. ज्या जाती ब्राम्हणांना अगदी जवळच्या आहेत त्यांनी तीनही रूढीचे अनुकरण केले असून त्यांचे कठोरपणे पालन करण्याचा ते आग्रह धरतात. ज्या जाती ब्राम्हणांना कमी जवळच्या आहेत त्यांनी सक्तीचे वैधव्य आणि अल्पवयीन मुलीचा विवाह या दोन रूढींचे अनुकरण केले व इतर आणखी दूर असलेल्या जातींनी केवळ बाल विवाहाच्या रूढीचे अनुकरण केले; तर फार दूर असलेल्या जातींनी फक्त जातीपद्धतीवरील श्रद्धंचे अनुकरण केले. यापुढे जाऊन मी असे म्हणतो की या अधुऱ्या अनुकरणाला ट्रेड ज्याला 'अंतर' म्हणतो ते थोडयाप्रमाणात कारणीभूत असून काही प्रमाणात या रूढींचा रानटीपण कारण ठरला आहे. हे उदाहरण ट्रेडच्या नियमाचा ढळढळीत दाखला असून भारतातील जातींच्या घडणीची संपूर्ण प्रक्रिया ही सामान्यांनी वरिष्ठांचे अनुकरण करण्याची प्रक्रिया आहे असे मानण्यात कसलाही संदेह ठेवीत नाही. माझा एक निष्कर्ष कदाचित तुम्हाला आकस्मिक किंवा निराधार वाटला असेल म्हणून मी आता त्याच्या समर्थनासाठी थोडा मागे वळतो. आपल्यासमोर उपस्थित केलेल्या तीन रूढींच्या मदतीने ब्राम्हण वर्गाने सर्वप्रथम जातीची रचना सुरू केली असे मी म्हटले आहे. व या निष्कर्षाचे कारण इतर वर्गातील या रूढीचे अस्तित्व केवळ उसनवारीचे आहे असे मी दिले होते. अब्राम्हण वर्गात या रूढींचा प्रसार होण्याबाबत अनुकरणाच्या प्रक्रियेने बजावलेली भूमिका सांगितल्यानंतर आता हे स्पष्ट होईल की साधन रूपाने किंवा आदर्शाचा रूपाने या रूढी अब्राम्हणात ( जरी त्यांना कल्पना नसली तरी ) अनुकरणात्मक जर आहेत तर त्यांना नमुन्याप्रमाणे उपयोग होण्यासाठी कोणती तरी पुरेशी श्रेष्ठ अशी मळ जात आधी असलीच पाहिजे. आणि ईश्वर सत्तात्मक समाजात ईश्वराच्या सेवकांवाचन 'नमुना' होण्याचे कार्य दुसरा कोण करू शकणार ?
* Physics and Politics 19, 5 P. 60
**Laws and Imitation Tr. by E. G. Parsons 2nd ed P.21
*पूर्वोक्त