भारतातील जाती त्यांची घडण, उत्पत्ती आणि प्रसार
Bhartatil Jati Tyanchi Ghadan Utpatti Aani Prasar book by Dr. B. R. Ambedkar
लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्याने स्वत.भोवती प्रथम मर्यादा घालून घेतली असा वर्ग कोणता ? या प्रश्नाचे उत्तर जातीच्या उगमाच्या अध्ययनाने आपणास मिळावयास हवे, हा प्रश्न फाजील चौकशीसारखा वाटण्याचा संभव असला तरी तो सुसंगत आहे; आणि याच्या उत्तरामुळे भारतातील जातीचे मूळ व वृध्दी स्पष्ट होण्यास आपणास बरीच मदत होईल. दुर्दैवाने या प्रश्नचे सरळसोट उत्तर देणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. अप्रत्यक्षरीत्याच त्याचे उत्तर मी देऊ शकतो. माझ्या विवेचनात आलेल्या रूढी हिंदू समाजात प्रचलित आहेत असे मी यापूर्वी म्हटलेले आहे. एरव्ही ते विधान त्या रूढी सार्वत्रिकपणे प्रचलित आहेत असे सुचवीत असल्यामुळे आणखी अचूक होण्यासाठी त्या विधानाला थोडी पुष्टी जोडणे आवश्यक आहे. या रूढी त्यांच्या पूर्ण कडक रूपात केवळ एका जातीत म्हणजे ब्रह्मणातच सापडण्यासारख्या आहेत. हिंदू समाजात ब्राह्मणांनी सामाजिक वारस्यात सर्वात वरच्या दर्जाचे स्थान प्राप्त केलेले असल्यामुळे अब्राह्मण जातीतही या रूढी अनुकरणाद्वारे पाळण्यात येत असल्या तरी त्या कडकपणे व सर्वच्या सर्व पाळल्या जात नाहीत. या महत्वाच्या बाबींचा आपणाला मूलभूत मूद्दा म्हणून उपयोग होऊ शकतो. जर अब्राम्हण जातीत या रूढींची प्रथा अनुकरणा मुळे आली असेल-आणि हे सहजगत्या सिध्द करता येण्याजोगे आहे. तर जातीव्यवस्थेचा जनक कोणता वर्ग आहे हे सिद्ध करण्यास कसल्याच युक्तीवादाची आवश्यकता उरत नाही. ब्राम्हण वर्गाने स्वत:ला मर्यादा घालून आपले रूपांतर जातीत का करून घेतले हा वेगळा प्रश्न असून त्याची वासलात पुढे वेगळया संदर्भात लावता येईल, परंतु या रूढीचे कडकपणे पालन व उपाध्याय वर्गाने जुन्या संस्कृतींत आढयतेने उपभोगलेली सामाजिक श्रेष्ठता हे दोन पुरावे या 'कृत्रिम संस्थेचे' तेच जनक असून त्यांनीच या अस्वाभाविक रूढीद्वारे तिची जोपासना केली हे सिध्द करण्यास पुरेसे आहेत.
जाती प्रथेची वाढ आणि प्रसार सर्व भारतभर कसा झाला या माझ्या प्रबंधाच्या तिसऱ्या भागाजवळ मी आता आलेलो आहे. पुढील प्रश्नाचे उत्तर मी दिले पाहिजे. देशातील बाकीच्या अब्राम्हण लोकांमध्ये जातिप्रथेचा प्रसार कसा झाला ? जातीचा भारतभर प्रसार कसा झाला या प्रश्नाची दुर्दशा जातीच्या उगमाच्या प्रश्नापेक्षाही अधिक झाली. माझ्या मते याचे मुख्य कारण म्हणजे प्रसाराचा व उगमाचा प्रश्न वेगवेगळा करण्यात आला नाही. असे होण्याचे कारण म्हणजे एकतर भारतीय स्मृतीकारांनी दैवी विभागणी म्हणून भारतातील गरीब जनतेवर जातीप्रथा लादली किंवा भारतीय जनतेत असलेल्या एखाद्या विशिष्ट सामाजिक उत्क्रांतीच्या नियमामुळे जातीचा प्रसार झाला, असा विद्वानांचा गैरसमज झालेला आहे.
प्रथमतः भारतीय स्मृतीकारांचा समाचार मी घेऊ इच्छितो. प्रत्येक देशात त्यांचे नियम करणारे महापुरूष असतात. हे महापुरूष आणिबाणीच्या वेळी पापी जनतेला सुधारण्यासाठी एखाद्या अवतारी पुरूषाप्रमाणे उदयास येतात. आणि जनतेला न्यायाचे व नीतीचे धडे देतात. मनु हा भारताचा स्मृतिकार खरोखरच होऊन गेला असेल तर तो निश्चितच एक धाडशी पुरूष होता. त्याने सांगितलेल्या कथेप्रमाणे जर जातीची निर्मिती करण्यात आली असेल तर मग हा मनु नक्कीच एक अविचारी माणूस असला पाहिजे. आणि ज्या लोकांनी त्याची विभागणी मान्य केली ते लोकही आपणाला माहीत असलेल्या लोकाहून भिन्न असले पाहिजे. जातीचा कायदा कोणीतरी 'तयार केला' ही कल्पनाच करता येण्यासारखी नाही. जातीचा नियम मनुने तयार केला असता तर त्याच्या मृत्यूनंतर तो जिवंत राहूच शकला नसता असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही. कारण एका माणसाच्या लेखनीच्या फटकाऱ्यास नम्र होऊन आपली स्थिती जनावराच्या बरोबरीची नीच करून घेण्यास व स्वतः दुःख सोसून दुसऱ्या वर्गाला उच्चतेच्या शिखरावर चढविण्यास कोणता वर्ग तयार होऊ शकेल ? ज्याच्या अधिपत्या खाली सर्व जनता आहे अशा जुलमी हुकुमशहाशिवाय कोणीही आपल्या आश्रिताला अशा नितांत अन्याय्य पध्दतीने विभागणी करण्याची परवानगी देऊ शकेल ही कल्पनाच करवत नाही. कारण एका दृष्टीक्षेपातच या त्याच्या 'संस्थेचा' अन्यायीपणा सहज लक्षात येतो. मनुविषयी मी फारच कठोर आहे असे वाटण्याचा संभव आहे; परंतु त्याचे भूत ठार मारण्याइतके माझे सामर्थ्य पुरेसे मजबूत नाही याची मला खात्री आहे. तो एखाद्या देहरहित भूताप्रमाणे जिवंत आहे; आणि अजूनही जातीव्यवस्थेबद्दल त्याच्याकडेच तक्रार नोंदवीली जाते. मला तर अशीही भीती वाटते की तो आणखी बराच काळ जिवंत राहील. मला तुमच्या मनावर एक गोष्ट बिंबवावयाची आहे. ती म्हणजे मनुने हा जातीचा कायदा तयार केला नसून तो तसे करूही शकला नसता. मनुच्या फार पूर्वीच जात अस्तित्वात होती. तो जातिप्रथेचा एक प्रचारक होता; आणि म्हणूनच त्याने तिला तात्विक रूप दिले. परंतु सध्याची हिंदू समाजव्यवस्था निश्चितच त्याने नेमून दिलेली नाही व तो तसे करूही शकला नसता. अस्तित्वात असलेले जातीचे नियम संकलित करण्यात व जातिधर्माचा उपदेश करण्यातच त्याचे कार्य संपुष्टात आले. जातीचा प्रसार व वाढ करण्याचे कार्य इतके अवाढव्य आहे की ते एखाद्या व्यक्तिच्या किंवा वर्गाच्या सामर्थ्य व धूर्तपणापलिकडचे आहे. ब्राम्हणांनी जाती निर्माण केल्या, या विचारसरणीतही असाच युक्तिवाद करण्यात येतो. मनुच्या बाबतीत मी जे सांगितले आहे त्यानंतर, वैचारिक दृष्टया ही विचारसरणी चुकीची असून उद्देश्यतः द्वेषमूलक आहे एवढे सांगितले म्हणजे पुरे; आणखी काही विशेष सांगण्याची गरज नाही अनेक बाबतीत ब्राम्हण दोषी असतील आणि ते दोषी आहेत असे मीही म्हणतो परंतु अब्राह्मण जनतेवर जातीप्रथा लादण्याचे कार्य त्यांच्या सामर्थ्याबाहेरचे होते. त्यांनी आपल्या अस्खलित तत्वज्ञानाद्वारे प्रसाराच्या क्रियेत मदत केली असेल परंतु त्यांच्या जातीचा सीमेपलीकडे त्यांच्या योजना ते निश्चितच रेटू शकले नाहीत. एखाद्याने स्वतःच्या नमुन्यावरहकुम समाज घडविण्याची कल्पनाच किती तेजस्वी व भव्य आहे ! तो अशा रम्य कल्पना करून स्वतःची प्रशंसा करू शकतो व आनंदात मश्गुल होऊ शकतो. परंतु तो ती कल्पनाच प्रत्यक्षात फारशी पुढे रेटू शकत नाही. माझ्या हल्ल्याचा आवेश अनावश्यक वाटण्याचा संभव असला तरीसुद्धा मी तुम्हाला ठासून सांगतो की तो निष्कारण नाही. हिंदू समाजव्यवस्था जातीच्या चौकटीत मोठया चातुर्याने बसविलेली असून, शास्त्रांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेली ती एक संस्था आहे असा श्रद्धाळू हिंदूच्या मनात दृढ विश्वास आहे. केवळ असा विश्वास आहे, एवढेच नाही तर ती चांगलीच असणार कारण ती शास्त्रांनी नेमून दिलेली आहे, व शास्त्र चूक असू शकत नाहीत असाही त्यांचा समज आहे. या वृत्तीच्या विरुद्ध बाजूने एवढया आवेशाने मी माझे मत मांडले याचे कारण धार्मिक पावित्र्याला काही शास्त्रीय आधार आहे, म्हणूनही नव्हे किंवा त्याच्या विरोधी जे सुधारक उपदेश करतात त्यांना मदत म्हणूनही नव्हे. उपदेशाने जातिव्यवस्था निर्माण झाली नाही व नष्टही होणार नाही, एखादया शास्त्रीय स्पष्टीकरणाला धार्मिक पावित्र्य बहाल करून त्याची स्तुती करीत बसण्याच्या वृत्तीतील ढोंगीपणा दाखवून देण्याचा माझा उद्देश आहे.
भारतातील जातीच्या प्रसाराचा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत अशा तऱ्हेने महापुरुषवाली उत्पत्ती आपणाला फारशी मदत करू शकत नाही. पाश्चात्य पंडितांनी महापुरुष पूजेला न फसता वेगळ्या तऱ्हेने स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यामते ज्या केन्द्रबिंदुभोवती जाती निर्माण झाल्या ते असे : (१) धंदा (२) वर्गीय संस्थांचे अवशेष इ., (३) नव्या श्रद्धेचा उदय, (४) मिश्र जातीय संतती आणि (५) देशांतर.
हे केन्द्रबिंदु इतर समाजामध्ये अस्तित्वात नाहीत की काय ? आणि ते केवळ भारताचेच वैशिष्टय आहे काय असा यावर प्रश्न निर्माण होऊ शकेल. ते केवळ भारताचेच वैशिष्टच नसेल व सर्व जगात सारखेच आढळन येत असेल तर पृथ्वीच्या इतर भागात त्यांनी जाती का निर्माण केल्या नाहीत ?. वेदाच्या भारतभूमी पेक्षा ते इतर भाग जास्त पवित्र आहेत म्हणून की काय ? की ते पंडितच चुकले म्हणावे ? मला शंका येते की दुसरे विधानच सत्य असावे.
वरील पैकी एका किंवा अनेक केंद्रबिंदूवर आधारीत उत्पत्तीबद्दल अनेक लेखकांनी श्रेष्ठ दर्जाचा सिद्धांत मांडल्याचा आव आणला तरी जवळून तपासून पाहल्यानंतर मॅथ्यू अर्नोल्डच्या 'कसल्याही भव्यतेचा समावेश नसलेल्या मामूली वस्तूचे भव्य नाव" या विधानाची ती फिटंफाट उदाहरणे आहेत असे कोणालाही खेदाने म्हणावे लागते. सर डेन्शिल आयवेस्टन, मि. नेसफिल्ड मि, सेनाट आणि सर एच. रिस्ले यांनी पुढे मांडलेल्या जातीच्या वेगवेगळया उत्पत्ती याच नमुन्याच्या आहेत. त्यांचे एकमेव परिक्षण करावयाचे म्हणजे वरपांगी तर्काने रूप दिलेल्या रडगाण्याचे ते दिखाऊ रूप होय असे म्हणावे लागते. उदाहरणार्थ : श्री. निस् फिल्ड म्हणतात की 'ज्यावर भारतातील जातीव्यवस्था उभारल्या गेली तो एकमेव आधार म्हणजे केवळ धंदा होय. परंतु, त्यांनी वरील विधान करून आपला विचार मुळीच पुढे नेलेला नाही, याची त्यांना आठवण करून दिली पाहिजे. कारण भारतातील जाती ह्या उद्योगमूलक आहेत इतकाच त्याचा वास्तवीक अर्थ आहे. आणि हा तर अगदीच मामुली शोध आहे. उद्योग मूलक वर्गाने आपले रूपांतर उद्योगमूलक जातीत का करून घेतले याचे कारण आपणाला श्री. नेस्फिल्डकडून अजून कळावयाचेच आहे. श्री. नेस्फिल्डची उत्पत्ती नमुना म्हण न पुरेसी नसती तर इतर मानववंशशास्त्रज्ञांच्या उत्पत्तीचा विचार मी मोठया आनंदाने केला असता परंतु वस्तुतः तशी आवश्यकता दिसत नाही.
विघटनाच्या नियमानुसार निर्माण झालेली एक अद्भुत गोष्ट अशा दृष्टीने काही उत्पत्ती जातिव्यवस्थेचे स्पष्टीकरण करतात. धार्मिक शरणांगतीची भाषा वापरून सांगायचे म्हणजे हर्बर्ट स्पेन्सरच्या 'सजीव प्राण्याच्या देहरचनेत जशी भिन्नता असते तशीच जातीभिन्नतासुद्धा पूर्णतः नैसर्गिक उत्कांतीद्वारे निर्माण झाली, तर काहीच्या मते संततीशास्त्राच्या नियमामुळे जाती निर्माण झाल्या ! जातीसंस्था अटळपणे अस्तित्वात आली किंवा निसर्ग नियमाशी जुळवून घेण्यासाठी गरीब व अगतिक जनतेवर जाणीवपूर्वक ती लादावी लागली असा चुकीचा युक्तिवाद सर्वच करतात, म्हणून या सर्व उत्पत्तीच्या परीक्षणासाठी खोळंबून राहण्याऐवजी या विषयावरील माझे विचार मी तुमच्यासमोर ठेवतो.