समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ ?

डॉ. महेंद्र धावडे, संस्थापक अध्यक्ष,बळीराजा पार्टी 

     समृद्धी महामार्गावर प्रवाशांना गाठून लुटण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळी वाहने थांबवून चालकांना शस्त्रांचा धाक दाखवणे, मौल्यवान वस्तू, दागिने आणि पैसे चोरून नेणे अशा प्रकारांचा समावेश होतो. महामार्गाची अथांग लांबी, ठिकठिकाणी असणारा निर्मनुष्य परिसर आणि सुरुवातीच्या काळात असलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा यांमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. अनेकदा वाहनांचे टायर पंक्चर करून किंवा मदतीचा बहाणा करून प्रवाशांना जाळ्यात ओढले जाते.सिन्नर जवळील मलढोण शिवारात महामार्गावर धारदार लोखंडी वस्तू आणि खिळे फेकून, वाहने पंक्चर करण्याचा नवा सापळा लुटारूंनी रचला आहे. अशाच एका रात्रीत दरोडेखोरांनी एका नामांकित वकिलाच्या कुटुंबासह दोन ते तीन गाड्यांना लक्ष्य करत तब्बल १८ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सिन्नर परिसरात दरोडेखोरांनी रस्त्यावर टाकलेल्या धारदार वस्तूंमुळे कारच्या टायरसह इंजिनचे मोठे नुकसान झाले. ऑईल गळतीमुळे वाहन थांबवावे लागताच, दबा धरून बसलेल्या ८ ते १० अज्ञात दरोडेखोरांनी गाडीला वेढा घातला.

     सिन्नर - गाडीतील महिला आणि लहान मुलांना शस्त्रांचा धाक दाखवून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरोडेखोरांनी प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना बेदम मारहाण केली आणि अंदाजे २७ तोळे सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

Samruddhi Mahamargavar Darodekhorancha Dhumakul

    वैजापूर - जवळ भरदुपारी उद्योजकाला घेरलेदुसरी घटना वैजापूर जवळील 'एक्झिट १८' जवळ घडली. साहिल सोनवणे हा २२ वर्षीय तरुण नागपूरहून मुंबईच्या दिशेने फॉर्च्युनर कारने जात असताना, एका किया सेल्टोस आणि महिंद्रा एक्सयुव्ही ७०० कारमधून आलेल्या टोळीने त्याच्या गाडीचा पाठलाग केला. मदत मागण्याचा बनाव करत दरोडेखोरांनी त्याची गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि शस्त्राचा धाक दाखवून १.५ लाख रुपयांची सोन्याची चेन लुटली.

   हवेत गोळीबार- लूटमारीच्या तिसऱ्या घटनेत एका व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. महामार्गावर टायर पंक्चर झाल्यानंतर दरोडेखोरांनी या व्यापाऱ्याच्या गाडीला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, धोका ओळखून मोहम्मद फरहान या व्यापाऱ्याने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन फेऱ्या गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने घाबरून दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत महामार्गावरून खाली उड्या मारून पळ काढला.

    कोबिंग ऑपरेशन 

     घटनेची गांभीर्य दखल घेत नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. पोलिसांनी धाराशिव आणि बीड जिल्ह्यात धडक कोंबिंग ऑपरेशन राबवले असून, या टोळीचा मुख्य सूत्रधार किरण गायकवाड (रा. शिरूर कासार, बीड) याच्यासह ७ संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या महागड्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

     संभाजीनगर:"समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना आता आनंद नाही, तर पोटात भीतीचा गोळा येतो. रात्रीच्या वेळी गाडी पंक्चर झाली, तर आपल्या कुटुंबाचे काय होईल या विचारानेच अंगावर काटा येतो," ही उद्विग्न प्रतिक्रिया आहे.

     समृद्धी महामार्गावरून अनेकजण सण-उत्सव किंवा कौटुंबिक कारणांसाठी रात्रीच्या वेळी महिला आणि लहान मुलांसह प्रवास करतात. अशा वेळी निर्मनुष्य ठिकाणी टोळ्यांनी हल्ला केल्यास कुटुंबाचा जीव कसा वाचवायचा, हा सर्वात मोठा प्रश्न सामान्य माणसाला सतावत आहे.

     नेटवर्क - महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत मोबाईल नेटवर्क गायब असते. अशा स्थितीत गाडी खराब झाली किंवा अपघात झाला, तर पोलिसांशी किंवा नातेवाईकांशी संपर्क कसा साधायचा? या चिंतेमुळे प्रवाशांमधील भीती द्विगुणित झाली आहे.वाढत्या गुन्हेगारीचा थेट परिणाम महामार्गावरील वाहतुकीवर दिसू लागला आहे. अनेक चालकांनी आणि कुटुंबांनी समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास करणे पूर्णपणे बंद केले आहे. अनेक प्रवासी आता समृद्धीऐवजी जुन्या राष्ट्रीय महामार्गांचा पर्याय निवडत आहेत, जिथे किमान रस्ता थांब्यांवर लोकांची वर्दळ आणि वस्ती असते.

 उपाय योजना - 

     महामार्गावर दर १० ते १५ किलोमीटरवर पोलीस मदत केंद्र आणि २४ तास फिरते पोलीस पथक (Highway Patrol) तैनात असावे.महामार्गावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करून मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडले जावेत.संपूर्ण महामार्गावर मोबाईल नेटवर्कची रेंज सुरळीत करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना आदेश द्यावेत.

     सारांश-."प्रशासनाने केवळ टोल वसूल करण्यावर लक्ष न देता, सामान्य माणसाच्या जिवाची आणि पैशाची सुरक्षा करावी," अशी संतप्त मागणी आता जनतेमधून होत आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर हा महामार्ग समृद्धीचा नव्हे, तर 'भीतीचा महामार्ग' म्हणून ओळखला जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Samruddhi Mahamargavar Darodekhorancha Dhumakul