डॉ. कुमार सप्तर्षी हे एक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, 'युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक व समाजवादी नेते होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ही उपेक्षित घटकांसाठी व सामाजिक परिवर्तनासाठी आपले आयुष्य समर्पित केले.
डॉ कुमार सप्तर्षी यांचा जन्म दि २१ ऑगस्ट १९४१ साली अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खेड या गावी झाला. शालेय शिक्षण अहमदनगर येथे झाले. पुढील शिक्षण पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस (MBBS) शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांच्या वर समाजवादी विचारधारेचा व स्व. डॉ. राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे ते समाजवादी विचारांच्या विविध सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय सहभागी झाले.
सामाजिक व राजकीय योगदान तरुणांमध्ये सामाजिक जाणिवा निर्माण करण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी युवक क्रांती दलाची (युक्रांद) स्थापना करून महागाई, भ्रष्टाचार, शैक्षणिक व सामाजिक विषमतेविरुद्ध अनेक यशस्वी सत्याग्रह व आंदोलने केली. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारमूल्यांचा साहित्यात व कार्यात सतत पुरस्कार केला.

सामाजिक व शैक्षणिक कार्य:- १९६५ युवक क्रांती दल स्थापना मार्च १९७३ मध्ये युक्रांदची स्थापना करून हजारो तरुणांमध्ये समता, बंधुभाव व पुरोगामी विचार रुजवले. पुण्यातलं बौद्धिक वातावरण, राष्ट्रीय अस्वस्थता आणि घरचं टिपिकल ब्राह्मणी वातावरण यातून सप्तर्षीमधल्या तरुणाची जडणघडण झाली आहे. १९६५ साली सप्तर्षीनी * यूथ ऑर्गनायझेशन'ची स्थापना केली. त्या वेळी ते २६ वर्षांचे होते. या त्यांच्या संघटनेनं विद्यार्थ्यांची अनेक आंदोलनं केली. पूनम हॉटेलमध्ये वेटरची कामं करून, बूट पॉलिश करून बिहारमधील दुष्काळग्रस्तां साठी २६,००० रुपयांचा निधी पाठवला. शिवाय ६७ च्या मे महिन्यात गया जिल्ह्यातील रजौली गावी (आता नवादा जिल्हा) अनिल अवचट आणि सप्तर्षीनी दोन महिने दवाखाना, कार्यकर्त्यांसाठी खाणावळ चालवली.
सोलापूरचा लढा १९७२ च्या सुमारास सोलापूरमधील ऐतिहासिक कामगार व विद्यार्थी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या आणि डॉ. अरुण लिमये यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाले. ग्रामीण विकास व शिक्षण: कर्जत तालुक्यातील खेड येथे भारतीय समाज विकास व संशोधन संस्था' स्थापन करून शाळा व महाविद्यालय सुरू केले, ज्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग मिळाला.
दलित हक्क व समता: १९७७ मध्ये शेडगाव येथील दत्त मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्याचे यशस्वी आंदोलन केले. आणीबाणीचा विरोध: आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून लोकशाही रक्षणासाठी लढा दिला व येरवडा कारागृहात स्थानबद्ध राहिले. विधानसभा सदस्य: १९७८ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून जनता पक्षाच्या उमेदवारीवर विजयी होऊन आमदार झाले.
८०-९० या दशकात सप्तर्षीनी वेगवेगळे प्रयोग केले. राशीनला शाळा-कॉलेज काढलं, आसपासच्या गावांमध्ये शेतीचे प्रयोग केले. जनता दलाच्या तिकिटावर अहमदनगर मधून दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आलं नाही.
जेष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी आणि भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे, गुरु-शिष्यासारखे आणि वैचारिक सहकार्याचे होते. डॉ. कुमार सप्तर्षी हे चंद्रशेखर यांना आपले अत्यंत आदरणीय मार्गदर्शक मानत असत. दोघांमध्ये एका कुटुंबातील थोरल्या व धाकल्या भावा सारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. देश व राज्य पातळीवरील असंख्य समाजवादी नेत्या सोबत त्यांनी चळवळीत काम केले.
राजकीय व सामाजिक सहकार्य: समाजवादी चळवळीत आणि आणीबाणीच्या काळात या दोन्ही नेत्यांनी एकाच विचारसरणीतून एकत्रितपणे काम केले व पुरोगामी मूल्यांची पाठराखण केली. 'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी'चे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी लिहलेले 'संकल्प', 'यात्री', 'स्वप्नांच्या सापळ्यांचा देश अमेरिका' आणि 'येरवडा विद्यापीठातील दिवस' ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रात डॉ. कुमार सप्तर्षी यांनी समाजवाद व गांधीवाद या विचारांच्या माध्यमातून सत्याग्रही मासिकाचे इ.स. १९९९ मध्ये 'सत्याग्रही विचारधारा' या वैचारिक मासिकाची स्थापना केली आणि त्याचे दीर्घकाळ संपादक म्हणून काम पाहिले. या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी महात्मा गांधी समाजवादी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या मासिकाचा प्रभावी माध्यम म्हणून वापर केला.
राजकीय आणि व सामाजिक क्षेत्रातील नैतिकतेचा हास रोखण्यासाठी व लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी या मासिकाच्या माध्यमातून परखड भूमिका मांडली. आज ही महाराष्ट्रभर त्यांचे असंख्यअनुयायी आहेत. बहुतांशी आमदार, खासदार, काही मंत्री, जि प अध्यक्ष विविध क्षेत्रात क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
मी स्वतः ला नशीबवान समजतो मला डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या सोबत जनता दल पक्षात काम करण्याची व सतत त्यांना भेटून संवाद साधण्याची संधी मिळाली त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही माझ्यावर आहे. मी अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. कुमार सप्तर्षी यांचा प्रचार केला. असंख्य कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. १९९१ साली ते विभाजीत जनतादलाचे ( स ज द ) प्रदेशाध्यक्ष होते. त्या वेळी मला प्रदेश युवक सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी दिली. या मुळे मला असंख्य नेत्यांचा सहवास मिळाला.
तारूण्या पासुन ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. या ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दल (युक्रांद) चे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे १८ जुलै २०२६ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी पुण्यात निधन झाले. दीर्घ आजारपण व मधुमेहाच्या त्रासामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुण्यातील एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. व युवकांना दिशा देणारा विचार थंडावला.
हा लेख त्यांना भावपूर्ण शब्द सुमनाची श्रद्धांजली....
लेखक.... डॉ. राजेंद्र मुरलीधर सानप, इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड, बालेपीर बीड. मो नं. ९४२००१९५९७