सत्यशोधक साहित्य संमेलनाची प्रेरणा व भूमिका
Satyashodhak OBC Sahitya Sammelan Beed
आमचे लोकजीवन सांगते की, ओबीसी म्हणजे खऱ्या अर्थाने ओरिजनल भारतीय कम्युनिटी होय. याच बलुतेदार कम्युनिटीने भारतीय ग्रामव्यवस्थेचा पाया घातलाय. भारतीय कला व संस्कृतीचा उगम या समूहाच्या अंतर्मनातून झालाय. भीमबेटकातील दहा हजार वर्षे जुनी चित्रे याच हाताने रंगवलीत. प्राचीन शिलालेख, ताम्रपट याच हाताने कोरलीत. वेरूळचे कैलास लेणे असेल अथवा अजिंठ्याची शिल्पे, चित्रे याच कष्टकऱ्यांनी आकाराला आणलीत. भारतभर प्राचीन मंदिरे, त्यावरील अप्रतिम शिल्पे यांच्याच छन्नीहातोड्याने मोहक झालीत. ज्यांचे जीवन व कर्तृत्व भारतीय इतिहासाचा दुवा ठरले. दुर्दैव असे की तेच ओबीसी साहित्य विविध वाङ्मयप्रकारांतून बहिष्कृत ठरले. ओबीसी म्हणजे केवळ हिंद ओबीसी नव्हे, तर ओबीसीचा अर्थ ब्राह्मण, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शीख, मराठा, कुणबी या सगळ्या समूहांत असणारे ओबीसी होय. या सगळ्या समूहांतील ओबीसींचा शैक्षणिक, सामाजिक स्तर खालावलेला आहे हा निव्वळ योगायोग नाही. म्हणूनच सत्यशोधक ओबीसी परिषदेचे हे साहित्य संमेलन विविध स्तरांवर मागासलेल्या समूहांचे आहे. हा सगळा समूह जागतिकीकरणाच्या राक्षसापुढे हवालदिल झालाय.
ब्रिटिश सरकारने १९३१ ला ओबीसींचा समूह सर्वप्रथम मोजला. त्यानंतर १९४१-४२ ला पुन्हा ब्रिटिशांनी जनगणना केली. यात ओबीसींची जनगणना झाली नाही. आता पुन्हा ओबीसींची जनगणना होणे आवश्यक आहे. जनगणना म्हणजे केवळ डोके मोजणे नव्हे, तर त्यामुळे ओबीसींच्या तमाम प्रवर्गातील सर्व जातींचा, सर्व पातळ्यांवरील मागासलेपणा व्यापक प्रमाणात राष्ट्रापुढे मांडण्याचा संविधानिक उपाय आहे आम्ही असे मानतो. आता मायबाप सरकारला आणि कोट्यवधी भारतीयांना कळेल की, स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही ओबीसी किती मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे.