भारतीय समाजाच्या दुःखाचे मूळ जातिव्यवस्थेत
Indian caste system is the major problem
ओबीसींच्या साहित्याबद्दल येथे बोलले पाहिजे. कारण हे साहित्य संमेलन आहे. तरीही प्रथमतः ओबीसींच्या स्थिती-गतीबद्दल प्रथमतः विवेचन केले. त्याचे कारण त्यांच्या दुःखाचे मूळ इथल्या जातिव्यवस्थेत आहे. आपण ते अधोरेखित व्हावे यासाठी, शिवाय साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम असत नाही, तर ते समाजपरिवर्तनाचे एक हत्यार असते असे मीही मानतो. म्हणून साहित्यनिर्मितीबद्दल बोलायचे झाले, तर मध्ययुगापासून ओबीसी जातीमधले, तसेच दलित जातीमधले कवी लेखन करीत आहेत. चोखामेळा, सोयराबाई ज्याप्रमाणे दलित समाजातून आलेले संत होते, त्याप्रमाणे नामदेवासारखे संतश्रेष्ठ शिंपी समाजातन आलेले होते. सेना न्हावी. नरहरी सोनार आणि सावता माळी या संतांनी तर वारकरी चळवळीला एक परिमाण मिळवून दिले; नव्हे तर पूर्णत्व मिळवून दिले आहे.
इंग्रजांच्या आगमनानंतर औद्योगिकीकरणाबरोबरच जे सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन सुरू आहे, त्यात अतिशय कमी संख्येने का होईना इतर मागासवर्गीय समाजातून लेखक, कार्यकर्ते पुढे आलेले दिसतात. बाबा पद्मनजींसारख्या लेखकाचा तर उल्लेख करता येईलच. परंतु म. जोतिबा फुले यांनी तर समाजपरिवर्तनासाठी एक दिशाच दिली. जसा जसा काळ पुढे जात आहे, तसेतसे म. फुले यांच्या विचारांची अन्वर्थकता अधिकाधिक स्पष्ट होत जाते आहे. अर्थात वारकरी चळवळी, संत आणि म. फुले यांच्यासारखे लेखक जातीचा परीघ ओलांडून मानवतेच्या मोठ्या अवकाशात कार्य करू लागले. म्हणूनच त्यांचे स्मरण आजही आपण करतो. याचा अर्थच असा की जे लेखक, कार्यकर्ते जातीचा परीघ ओलांडून व्यापक मानवतेच्या आवकाशात प्रवेश करतात त्यांच्याच हातून काहीतरी अक्षरवाङ्मय निर्माण होते. आज मराठी लिहीत असलेल्या ओबीसी समूहातील लेखकांसमोर ही गोष्ट असली पाहिजे. त्यामुळे त्यांचे लेखन अधिक अर्थपूर्ण होईल. मर होईल व समाजधारणेतील त्यांचा वाटाही महत्त्वाचा राहील.
आता या उद्ध्वस्त भारताचे चित्रण करायचे तर नुसते छायाचित्रणात्मक पद्धतीने करून भागणार नाही. या छायाचित्रणात्मक लेखनाला मानवी स्पर्श क्वचितच प्राप्त होतो. म्हणून छायाचित्रणाच्या पुढे जाऊन मानवी स्पर्श प्राप्त करून देणे आवश्यक असते आणि त्यासाठी आवश्यक असते तो मानवी नात्याचा सखोल शोध घेणे व एकूण जीवनाचा अन्वयार्थ लावणे. मानवी नात्यांचा शोध घेण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण, आत्मचिंतन यांसारख्या बाबींची आवश्यकता असते. एकूण जीवनाचा अन्वयार्थ लावण्यासाठी मात्र जीवनाला कवेत घेणाऱ्या एखाद्या व्यापक तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते. किंबहुना अशा तत्त्वविचारांशिवाय लेखन पांगळे असते. कारण जीवनाचा अन्वयार्थ केवळ तत्त्वज्ञानाच्या आधारेच लावता येतो.
एकंदरीत काय की, भक्कम आणि व्यापक तात्त्विक पाया असल्याशिवाय कुठलीही चळवळ उभी रहात नाही, याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे, एवढे सांगून मी आपला निरोप घेतो.
( स्रोत - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे भाषण, संमेलनाध्यक्ष, दुसरे अ. भा. ओबीसी साहित्य संमेलन, नाशिक, १६-१७, फेब्रुवारी २००८, स्मरणिका-ओबीसी गौरवगाथा, 'जागर' )