वेंडलीतून ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरुवात
चंद्रपूर : रवींद्र टोंगे हे २१ दिवस अन्नत्याग आंदोलन करून ओबीसी समाजाचे आयकॉन ठरले आहेत. आरक्षण वाचविण्यासाठी ते परत आंदोलनाची तयारी करीत आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. घराघरात असे आयकॉन तयार होऊ लागले आहेत. आपल्या हक्कासाठी या प्रत्येकांमध्ये जागरूकता आली आहे. त्यामुळे सरकारने कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, अशी ठाम भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी मांडली. ओबीसी समाजाला गृहित धरण्याची चूक करू नये, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
यावेळी राजूरकर म्हणाले, निम्मे सत्र संपूनही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू झालेले नाहीत ही तर किमान स्वाधार योजना लागू करून ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. सरकार प्रत्येक गोष्टीत दिरंगाईचे धोरण अवलंबत आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. यातून ओबीसींना आणि सरकारलाही नेमक्या परिस्थतीची जाणीव होईल, असे मतही त्यांनी मांडले.