- अनुज हुलके
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तरी पार झाली. त्यानिमित्ताने देशभरात अमृत महोत्सव साजरा होत आहे. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचे अनन्यसाधारण अप्रूप वाटून तो समाज आपसूकच आनंदसोहळ्यात तल्लीन होणे स्वाभाविक आहे. ज्यांच्या वाडवडलांनी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊन खस्ता खाल्ल्या असे स्वातंत्र्यप्रेमी स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास स्मरण करत असताना मनोमन सुखावलेले दिसतात; तर या विपरित असेही ढोंगी स्वातंत्र्यप्रेमी उरबडवे, कर्जबुडवे,परान्ने बडवे आघाडीवर आहेत, जे स्वातंत्र्य आंदोलनात कुठेही नसल्याचा त्यांच्या माथी कलंक असल्याचे शरसंधान वारंवार होत आलेले आहे.
हजारों वर्षापासून धार्मिक गुलामगिरीतून मुक्तीसाठी अवैदिक जनसमूह संघर्षरत आहेत. धार्मिक स्वातंत्र्यासाठी उद्रेक होत आलेले आहेत, आजही त्यातील नियमितता कायम आहे. "सनातनम (सनातन धर्म) हा कोरोना व्हायरस, मलेरिया किंवा ताप यांसारख्या आजारासारखा असून त्याचा विरोध करण्यात अर्थ नसून त्याचे निर्मूलन करायला हवे," (दै.सकाळ,४ सप्टेबर २०२३) असे वक्तव्य तामिळनाडूचे युवककल्याण आणि क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी एका कार्यक्रमात केले. सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात असून त्याचे निर्मूलन करायला हवे. असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांचे पूत्र उदयनिधी यांना वाटते. सनातन धर्म हा जातीव्यवस्थेच्या नावाखाली लोकात फूट पाडत असून, विधवांना सती जायला भाग पाडले, बालविवाहाला प्रोत्साहन दिले. असा हल्ला त्यांनी सनातन धर्मावर केला.
अशा अन्याय्य धर्मसूत्राचा बीमोड करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची नितांत गरज असते. करुणानिधी यांनी कायदा आणून सर्व जातीच्या व्यक्तींची मंदिरांमध्ये पुजारी म्हणून नेमण्यास सुरुवात केली.याचे स्मरणही त्यांनी करुन दिले. ब्राम्हणेतरांना-ओबीसींना बरोबरीचे न समजणाऱ्यांच्या नाकावर लिंबू टिच्चून तामिळनाडूत स्टॅलिन या मुख्यमंत्र्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांची मिरासदारी मोडून काढ़त ओबीसी पुजारी नेमण्याची तयारी केली. ही खूप महत्वपूर्ण घटना म्हणता येईल. महाराष्ट्रात देखील ब्राह्मण पुरोहिताशिवाय लग्न वास्तु दशक्रिया आदि विधी करण्याचा प्रघात सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून रुढ झाला. अलीकडे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील पंड्यांचा प्रभाव मोडून काढत ब्राम्हणेतर पुजारी नेमले जात आहेत. हे धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मणांची मक्तेदारी मोडून काढणारे समतेसाठी आरक्षणच होय. देवालयात एकाच जातीचे पुजारी न नेमता हिंदु धर्मातील कोणत्याही जातीचे पुजारी नेमणूक करणे म्हणजे एकप्रकारे समान नागरी कायदा म्हणता येईल, की नाही? ही प्रक्रिया अधिक गतीने व व्यापकपणे पुढे जायला हवी. ओबीसींना हिंदु म्हणून, समानतेच्या अंगाने मानत असताना, सर्व क्षेत्रात ब्राम्हणांना जो मानपान-मानधन, पद-पत-प्रतिष्ठा मिळते, ते सर्व ओबीसींना मिळायला पाहिजे. ही खरी हिंदु एकता अन् समता असेल. यासाठी ओबीसींचा सामाजिक न्यायासाठी लढा आहे, ओबीसी जनगणनेची मागणी त्या लढ्याची अपरिहार्यता आहे.
गावातल्या बाया मजुरीला जाताना मारुतीच्या मंदिराच्या पायरीजवळ पायताणं काढून तिथूनच हात जोडून रानोमाळी जायला निघतात.असा पायंडा कसा पडला असेल? अनेक मंदिरात स्त्रियांना प्रवेश निषिद्ध केलेला असतो. अनेक प्रसंगी पूजा विधी करताना महिला नारळ फोडत नाही. ही प्रथा स्त्रियांना कोणत्या अधिकारापासून वंचित ठेवते? अशा बंधनाने स्त्रियांच्या कोणत्या स्वातंत्र्याचा संकोच होत असेल? हा निश्चितच सखोल संशोधनाचा विषय आहे. गतवर्षी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) एका कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी उच्च पदस्थ महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून घेतात. तेव्हा ही घटना धार्मिक अधिकाराच्या दृष्टीने, फार महत्वाची ठरते. एखाद्या घटकराज्याचे प्रमुख राजकीय पुढारी मीपणाची झूल फेकून अशी भूमिका घेतात तेव्हा त्या कृत्याला समाजाची अधिमान्यता मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन लढ्याचे वैभव ध्यानात येते. "ब्राह्मण, भट, जोशी, उपाध्ये इत्यादिक लोकांच्या दास्यत्वापासून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे आज हजारो वर्षे ते शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटीत आले आहेत, यास्तव सदुपदेश व विद्याद्वारे त्यांस त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता म्हणजे धर्म व व्यवहारासंबंधी ब्राह्मणांचे बनावट व कार्यसाधक ग्रंथांपासून त्यांस मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज तारीख २४ माहे सप्टेंबर सन १८७३ इसवी रोजी स्थापन केला."(पृ.२०५,पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट, महात्मा समग्र वाङ्मय, सं हरी नरके,महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई,२०१३) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची मांडलेली सुत्रे धर्मस्वातंत्र्याचा आविष्कार होय. पुरोहितशाहीच्या वरवंट्याखाली दबलेले धार्मिक अधिकार आणि शुद्रातिशुद्रांना आर्यांच्या खोडसाळ मतलबी धर्माच्या जाळ्यात अडकवून होणाऱ्या शोषणाविरुधची ललकारी, धर्मचिकित्सेतून स्त्रीशुद्रातिशुद्रांचा उजागर झालेला सांस्कृतिक वारसा आधुनिक भारताच्या उभारणीत महत्वपूर्ण मानण्यात येतो. करवीर संस्थानात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सत्यसमाजी विचाराची कास धरून राज्यकारभार चालविला त्याची मधूर फळं महाराष्ट्राला चाखता आली. ब्राम्हणेतर चळवळीचा सर्वाधिक प्रभाव तामिळमनावर ठसला. मराठी मातीत पेरलेल्या सत्यशोधकी विचाराचे भरघोस पीक तामिळनाडूत हाती आले. पेरियार रामास्वामी यांनी अजोड कष्टाने ब्राह्मणेतर लढ्याचा मळा द्रविड चळवळीच्या आवृत्तीतून तामिळ जनतेच्या मनमनात फुलवला. त्यातून तामिळनाडूचे सामाजिक सांस्कृतिक राजकीय वेगळेपणे ठसठशीतपणे पुढे येते. उदयनिधी सारखे नवपिढीतील नेत्रुत्व त्या दिशेने झेपावते. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असताना उदयनिधीची बोचरी अभिव्यक्ती आणि उदयनिंधीचा होत असलेला धिक्कार; उदयनिधींवर देशद्रोहाचा वगैरे शेरा मारुन पुढे निघणे हितावह आहे की, त्यावर चिंतन होणे? "...एकंदर सर्व आर्यभट ब्राह्मण आपले थोतांडी ग्रंथ एके बाजूला फेकून एकंदर सर्व मानव स्त्रीप्राण्यांबरोबर सत्य वर्तन जेव्हां करू लागतील, तेव्हां जगांतील एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुष आर्याचें कल्याण व्हावें, म्हणून आपणां सर्वांच्या निर्मीकाच्या पदापाशीं लीन होऊन त्यांजविषयीं मनःपूर्वक प्रार्थना करतील, यांत कांही संशय नाहीं..." (पृ.५२५ सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक,महात्मा फुले समग्र वाङ्मय, सं.हरी नरके,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,२०१३) धर्माच्या बुरख्याआडून वर्णजातसमर्थक एकप्रकारे स्वातंत्र्याचा तिरस्कार करतात त्यांच्यासाठीही काही फार सुखदायक नाही, शुद्रातिशुद्रांना जसजसे समाजभान येईल तसे धर्मस्वातंत्र्याचा लढा सशक्त होऊन पुरोहितशाहीला मूठमाती दिल्याशिवाय सर्व मानवसमूहाचं कल्याण होऊ शकणार नाही. सत्यशोधक विचार सूत्रांतून दिलेला हा देशोद्धाराचा संकल्प होय. आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू असताना पुरोहितधार्जिण्या धार्मिक गुलामगिरीविरुद्ध आविष्कार होणे यातून सत्यशोधक तत्वज्ञानाची अपरिहार्यता अधोरेखित होते.
- अनुज हुलके