नगर - महात्मा जोतिराव फुले यांना महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे व रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने ११ मे १८८८ रोजी महात्मा ही पदवी प्रदान केली. त्या वेळे पासून देश त्यांना महात्मा म्हणून ओळखू लागला आहे. आता हा दिवस राज्य सरकारने महात्मा दिन या नावाने साजरा करण्याची मागणी श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. महात्मा फुले यांचे कार्य जगाला सर्वश्रुतच आहे. स्त्री-शुद्र - अतीशुद्र समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले व जोतीबा फुले ज्या तन्मयतेने झटत होते, त्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले होते, त्यामोबदल्यात महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील ब्राम्हणशाहीने त्यांचा अतोनात छळ व अपमान केला होता. त्यामुळे सत्यशोधक कार्यकर्त्यांमध्ये व बहुजनांमध्ये त्यांचा आदर दुनावला होता. मांडवीच्या रघुनाथ सभागृहात आपल्या उद्धारकर्त्या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी गरीब व कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने आणि उत्स्फुर्तपणे जमून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विडा उचलला होता. मुंबईकर सत्यशोधक कार्यकर्ते व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आमंत्रणांवरुन जोतीबा फुले मुंबईला आले होते, तेव्हा मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी जोतीबा फुलेंना युगप्रवर्तक कार्याबद्दल महात्मा पदवीने गौरविण्यात आले. त्यादिवसापासुन आपणासर्वांना जोतीबा फुले महात्मा फुले नावाने परिचित झाले. ११ मे २०२३ रोजी त्या घटनेस १३५ वर्षे पुर्ण होत आहेत.