- प्रेमकुमार बोके
सध्या आपल्या देशात पंचतारांकित हाय प्रोफाईल जीवन जगणाऱ्या तथाकथित बाबांची संख्या खूप वाढलेली आहे.देशाच्या कानाकोपऱ्यात या बाबांच्या प्रवचनांना लोकांची जोरदार गर्दी होत आहे.ही गर्दी खेचून आणण्याचे तंत्र सुद्धा या बाबांच्या प्रायोजक मंडळींनी चांगल्या प्रकारे अवगत केलेले आहे. मोठमोठे व्यापारी,उद्योगपती "माल लगाओ- माल कमावो" या व्यावसायिक हेतूने ठिकठिकाणी या बाबांची प्रवचने आयोजित करीत आहे.पाच-सहा दिवसाचे लाखो रुपये घेणारे ही बाबा मंडळी आणि त्या कार्यक्रमातून कोट्यावधीची कमाई करणारे आयोजक,प्रायोजक असा हा व्यवसाय पध्दतशीरपणे सुरू आहे.या या बाबांची लॉन्चिंग सुद्धा अतिशय नियोजनपूर्वक केली जाते.दरवर्षी नवनवीन बाबांना प्रोजेक्ट केले जाते आणि त्या वर्षात त्याच महाराजांना प्रचंड फोकस केले जाते.सर्वसामान्य माणसे मात्र या मोहजाळाला बळी पडून त्यामध्ये फसत जातात. अध्यात्माच्या नावाखाली कोट्यावधींचा व्यवहार चालतो हे मात्र आमच्या साध्याभोळ्या भाविकांच्या लक्षातही येत नाही.शेकडो एकर परिसरात पसरलेला वातानुकूलित मंडप,सर्वोच्च दर्जाची साऊंड सिस्टिम, पंचपक्वान्नाचे भोजन,कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी दूरदुरुन केली जाणारी वाहनांची व्यवस्था,त्या ठिकाणी असलेला लाईटचा झगमगाट या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर स्वतःच्या मेंदूने विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाला सहज प्रश्न पडेल की हेच का खरे अध्यात्म ? आमच्या महान संतांनी अशाच प्रकारे समाजाची प्रबोधन केले होते का ? अशाच प्रकारे पंचतारांकित जीवन जगून लोकांना ज्ञानाचे डोज पाजले होते का ? हीच का ईश्वराची खरी भक्ती ? अशा भक्तीने ईश्वर खरोखर प्रसन्न होतो का ? असे अनेक प्रश्न विचारी माणसाला पडल्याशिवाय राहत नाही.
हे बाबा मंडळी कधीही गोरगरिबांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदांवर जावे हे सांगत नाही.अभ्यास करावा,पुस्तके वाचावी यावर बोलत नाही,शेतकऱ्यांच्या समस्या मांडत नाही,महिलांच्या अडचणी समजून घेत नाही,बेरोजगारांचे प्रश्न मांडत नाही,आमच्या संत महापुरुषांचा अनेकदा अपमान होतो त्यावर हे कधी तोंड उघडत नाही.उलट त्यांच्याच कडून अनेकदा आमच्या महापुरुषांचा अपमान होतो.त्यामुळे यांची प्रवचने, सत्संग म्हणजे केवळ बाजार असतो. या बाजारात भक्त हा गिऱ्हाईक असतो आणि बाबा हा व्यापारी असतो. व्यापारी हा कधीही घाट्याचा सौदा करीत नाही.त्यामुळे हे व्यापारी या अध्यात्मरुपी सत्संगातून आपल्या भक्तरुपी ग्राहकांना खोट्या गोष्टी सांगून त्यांना फसवितात आणि त्यांच्याकडून प्रचंड पैसा कमावतात. त्यामुळे ही आधुनिक बाबांची जी नवीन जमात आपल्या देशात निर्माण झालेली आहे,त्यावर कुठेतरी निर्बंध घालणे आवश्यक आहे.कारण या बाबा जमाती मधील अनेक बाबांनी कित्येक स्त्रियांवर बलात्कार करून, त्यांचे शोषण करून अध्यात्माला कलंकित केले आहे व आज अनेक बाबा,बापू तुरुंगात आहे.
बाबा लोकांची ही नवी जमात काही राजकारणी लोकांसाठी प्रचाराचे सुद्धा काम करतात,त्यामुळे त्यांना फार मोठे राजकीय अभय असते आणि त्या बळावर ही बाबा मंडळी अनेकदा फार विषारी आणि विखारी वक्तव्ये करतात. संविधान बदलण्याचे जाहीरपणे आपल्या प्रवचनातून सांगतात. अंधश्रद्धेचा खुलेआम प्रचार प्रसार करतात.लोकांच्या भावनेचा गैरफायदा घेऊन अनेक अवैज्ञानिक गोष्टींना हे बुवा बापू सतत चालना देत असतात. त्यामुळे आमची येणारी नवी पिढी दिवसेंदिवस अंधश्रद्धाळू बनत असून विज्ञानवादी विचारांपासून ती दूर चाललेली आहे.शाळा,कॉलेजमध्ये जरी ती विज्ञान विषय शिकत असली तरी प्रत्यक्ष त्यांच्या आचरणात मात्र कुठेही विज्ञान आपल्याला दिसत नाही.उलट विज्ञानाच्या विरोधात त्यांचे वागणे बोलणे असते आणि विज्ञानवादी लोकांच्या ते सतत विरोधात असतात.ही जी भ्रामक परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे ती परिस्थिती या ढोंगी बुवा बापूंनीच निर्माण केलेली आहे.त्यामुळे त्यांना वठणीवर आणणे व देशात संविधानाला अभिप्रेत असलेले न्याय, स्वातंत्र्य,समता आणि बंधुता यांचे राज्य निर्माण करणे ही काळाची गरज आहे.अन्यथा ही कार्पोरेट बुवा,बापू,महाराजांची फौज येणाऱ्या काळात देशामधे बेबंदशाही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.
प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी, १५ एप्रिल २०२३