अमरावती - ओबीसी समाज हा प्रामुख्याने शेतकरी आहे. या समाजाच्या विकासासाठी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ मिळवून देतानाच मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मांडली.
डॉ. बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबविते. ओबीसींचा विकास करायचा असेल तर या सर्व योजना घराघरांत पोहचविणे आवश्यक आहे. राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाने यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ओबीसी समाजातील शेतकऱ्यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांचा लढा स्मरणात ठेऊन आपल्या मागण्या मंजूर करण्याकरिता जंतर-मंतरला जाण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन साबळे यांनी केले.
सरकार कुठलेही असले तरी ओबीसींचे प्रश्न कायम राहतात, असा टोला राजूरकर यांनी लगावला. प्रास्ताविक पौर्णिमा सवाई यांनी केले. संमेलनात अमरावती जिल्ह्यातील ८०० शेतकरी प्रतिनिधींनी शेती व शेतकरी प्रश्नांवर विचारमंथन केले. शेतीप्रश्नांसाठी लढा देताना जीव गमावणाऱ्या शेतकऱ्यांना दोन मिनिटांची मौन श्रद्धांजली अपर्ण केली.
याप्रसंगी संगीता ठाकरे, अॅड. प्रीती बनारसे, प्रवीण गाढवे, विजय बाबरे, राजू चौधरी, विनय डवंगे, कविवर्य विठ्ठल कुलट, नितीन पवित्रकार, अजीज पटेल, रितेश हेलोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांसाठी एकत्र या : डॉ. तायवाडे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी साऱ्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. बदलत्या परिस्थितीत एकीचे बळ महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढा द्यावा, असे आवाहन डॉ. तायवाडे यांनी केले.