ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास राज्यात उद्रेक - ओबीसी सेवा संघाचा इशारा

बाठिया आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षणाची मागणी

     कोल्हापूर ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, जर आरक्षणाविना निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला तर राज्यातील ओबीसींच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ओबीसी सेवा संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी, केंद्रीय सदस्य बळवंत सुतार, कार्याध्यक्ष कृष्णात लोहार- दानोळीकर यांच्यासह पदाधिकारी व संचालक मंडळाने एका पत्रकाव्दारे ओबीसी समाजबांधवांच्या भावना मांडल्या आहेत.

OBC_Reservation_OBC_Seva_Sangh      पत्रकात म्हटले आहे की, ओबीसी आरक्षण संदर्भात बाठिया आयोगाने राज्यात ४० टक्के ओबीसी समाज असून २७ टक्के ओबीसी आरक्षण देण्यास हरकत नाही, अशा प्रकारची शिफारस केली आहे. आरक्षणासंदर्भात १६ जुलैमध्ये सुनावणी होणार आहे. ऐन पावसाळ्यात निवडणूक घेण्यात येऊ नयेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाला विनंती करणार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षण दिल्यानंतरच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका व महानगरपालिका यांच्या निवडणूका झाल्या पाहिजेत, अशी ओबीसी सेवासंघाची मागणी आहे.