भंडारा, २४ ऑगस्ट २०२६ ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना व्हावी आणि त्यात ओबीसी कॉलम अनिवार्य असावा, या मागणीसाठी ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडारा यांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आज १०० वा दिवस पूर्ण झाला आहे. ११ मे २०२६ पासून सुरू झालेले हे आंदोलन अद्यापही सुरूच असून उपोषण मंडपावर अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत.
या निमित्ताने अॅड. प्रदीप ढोबळे, संस्थापक अध्यक्ष, ओबीसी सेवा संघ यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. भेटीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन सादर केले. निवेदनात केंद्र सरकारने काढलेल्या राजपत्रांमध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रमाणेच ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र कॉलम टाकण्याची आणि ड्रॉप-डाउन मेनूद्वारे जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
१६ मे २०२६ रोजी सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यातील घरगणनेत ओबीसी कॉलम नसल्याचे समोर आल्यानंतर समितीने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दुसऱ्या टप्प्यात एससी-एसटी प्रमाणे ओबीसी कॉलम समाविष्ट करण्याचे आणि ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र गणना होईल असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. राजपत्रातील दहाव्या प्रश्नात ओबीसी कॉलम दिसत नसल्याने सरकार लबाडी करत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
समितीने स्पष्ट केले आहे की, हे आंदोलन पुढेही सुरू राहील. येत्या पंधरवड्यात तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असून याबाबत जिल्हाधिकारी यांना आधीच सूचना देण्यात आली आहे. ही मागणी केवळ भंडारापुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पोहोचेल, असेही समितीने सांगितले.
सन २०१८ आणि २०२५ मध्ये केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी कॉलमसह जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही सध्याच्या राजपत्रांमध्ये ओबीसी कॉलम नसल्याने ओबीसी समाजाची फसवणूक होत असल्याची भावना आंदोलकांमध्ये आहे. समितीची मुख्य मागणी आहे की, ओबीसी प्रवर्गासाठी एससी-एसटी प्रमाणे ड्रॉप-डाउन मेनू ठेवून जनगणना व्हावी आणि केवळ “जात लिहा” असा खुला प्रश्न ठेवू नये.
यावेळी अॅड. प्रदीप ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य समन्वयक सदानंद ईलमे, प्रभाकर वैरागडे, डॉ. बाळकृष्ण सार्वे, गोपाल सेलोकर, भगीरथ धोटे, भैय्या लांबट, बबलू कटरे, सावन कटरे, उमेश शेंडे (गोंदिया), डॉ. अनिल डहाके, नंदू नागरकर (चंद्रपूर), विलास काळे (यवतमाळ), डॉ. रमेश पिसे, रामचंद्र तरोणे, रोशन उरकुडे, रमेश शहारे, पंजाब कारेमोरे, धनंजय बिरणवार, किशोर डोकरीमारे, तुळशीराम बोंदरे, माणिकराव कुकडकर, ललिता देशमुख, लता बोरकर, शुभदा झंझाड, रंजना गभणे, केशव अतकरी, सेवक हजारे, माधुरी खंडाईत, श्रीकृष्ण पडोळे, मनोहर टिचकुले, अरुण जगनाडे, विष्णू जगनाडे, भोजराज गभणे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसी संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, केंद्र सरकारने तात्काळ ओबीसी कॉलम समाविष्ट करून जातनिहाय जनगणना सुरू केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.