बल्लारपूर तालुक्यातील १७ पैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीत ओबीसी सरपंच;

 ५० टक्के मर्यादेच्या अंमलबजावणीमुळे आरक्षणात मोठी घट, ओबीसी समाजात तीव्र नाराजी; गतवर्षी पाच ग्रामपंचायतींमध्ये होते ओबीसी सरपंचपद

     बल्लारपूर : राज्य निवडणूक आयोगाने २३ जुलै रोजी पाठवलेल्या अधिकृत पत्राद्वारे, एकूण आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक झालेल्या बल्लारपूर तालुक्यातील सरपंचपदांच्या आरक्षणात मोठी सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार येत्या ४ सप्टेंबर रोजी सरपंचपदांची संपूर्णपणे नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची अधिकृत सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे. या सुधारणेमुळे बल्लारपूर तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींपैकी अवघ्या एकाच ग्रामपंचायतीत नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) सरपंचपद आरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे ओबीसी समाजात पुन्हा एकदा तीव्र संताप आणि नाराजी उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी ८ जुलै २०२५ रोजी झालेल्या आरक्षण सोडतीत तब्बल पाच ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी सरपंचपद देण्यात आले होते.

Ballarpur Talukyatil 17 Paiki Keval Ekach Grampanchayatit OBC Sarpanch

     बल्लारपूर तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. यापैकी गतवर्षी ८ जुलै रोजी पार पडलेल्या सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीत ओबीसी समाजाला विसापूर, कळमना, नांदगाव (पोडे), बामणी आणि पळसगाव या पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण देण्यात आले होते. मात्र आता नव्याने काढण्यात येणाऱ्या आरक्षण सोडतीत १७ पैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीत ओबीसी सरपंच असणार आहे. यामुळे संख्येने निर्णायक ठरणाऱ्या ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

     बल्लारपूर तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी चार, नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) केवळ एक, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी तब्बल नऊ जागांचे नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे अधिकृत आदेश जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेले हे एकमेव सरपंचपद महिलांसाठीही राखीव राहणार आहे. त्यामुळे बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, कळमना, नांदगाव (पोडे), बामणी (दुधोली), पळसगाव, कवडजई, किन्ही, काटवली (बामणी), कोठारी आणि कोर्टोमक्ता या ग्रामपंचायतींपैकी नेमक्या कोणत्या ग्रामपंचायतीत ओबीसी महिला सरपंचपद राखीव असेल, याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मागील वर्षी असे होते सरपंचपदाचे आरक्षण

     बल्लारपूर तालुक्यात ८ जुलै २०२५ रोजी १७ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी ओबीसी प्रवर्गासाठी विसापूर, कळमना, नांदगाव (पोडे), बामणी (दुधोली) आणि पळसगाव या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण होते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी कवडजई, किन्ही, काटवली (बामणी), कोठारी आणि कोटींमक्ता या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपद देण्यात आले होते. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी लावारी, मानोरा, हडस्ती आणि आमडी या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाचे आरक्षण होते, तर अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी इटोली, गिलबीली आणि दहेली येथे सरपंचपद आरक्षित करण्यात आले होते.

९ पदे राहणार महिला सरपंचांसाठी राखीव

     नव्याने काढण्यात येणाऱ्या सरपंचपदांच्या आरक्षणात अनुसूचित जातीसाठी ३, अनुसूचित जमातीसाठी ४, ओबीसीसाठी केवळ १ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९ अशा एकूण सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील २ महिला, अनुसूचित जमाती प्रवर्गातील २ महिला, ओबीसी प्रवर्गातील १ महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील ४ महिला अशा एकूण ९ सरपंचपदे विशेषतः महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.