ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती

     शियाळी रामामृत रंगनाथन ( डॉ. एस. आर रंगनाथन) (जन्म १२ ऑगस्ट, १८९२, निधन २७ सप्टेंबर १९७२) हे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. ते एक महान गणितज्ञ आणि ग्रंथपाल होते, ज्यांनी भारतातील वाचनसंस्कृती आणि ग्रंथालय चळवळीला नवीन दिशा दिली. त्यांच्या जन्मदिनानिमित्त (१२ ऑगस्ट) भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो.त्या निमित्ताने हे शब्दसुमनांने विनम्र अभिवादन. 

     डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म: १२ ऑगस्ट १८९२ रोजी तामिळनाडू राज्यातील शियाली (शीरकाझी) येथे झाला. त्यांचेशिक्षण गणित विषयात पदव्युत्तर (एम.ए.) शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.पुढे मद्रास विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल म्हणून त्यांनी १९२४ मध्ये कार्यभार स्वीकारला. ग्रंथालयशास्त्राच्या अधिक अभ्यासासाठी त्यांनी प्रेसिडेन्सी महाविद्यालयातील प्राध्यापकाची नोकरी सोडून मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल या पदाची नोकरी स्वीकारली. ग्रंथालयशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी सन १९२४-२५ या काळात ते इंग्लंडला प्रशिक्षण घेण्यासाठी गेले. इंग्लंडहून परत आल्यावर मद्रास विद्यापीठाच्या ग्रंथालयाची पुनर्रचना करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. समाजाला सुशिक्षित आणि साक्षर करण्यासाठी ग्रंथालयासारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही, हे ओळखून त्यांनी १९२८ साली मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. ग्रंथालय संघांना कायद्याचे संरक्षण मिळाले तर त्यांची प्रगती होईल हे लक्षात आल्याने डॉ. रंगनाथन यांच्या पुढाकाराने मद्रास राज्यात पहिला सार्वजनिक ग्रंथालय कायदा अस्तित्वात आला.ग्रंथालय कायदा करणारे मद्रास हे पहिले राज्य ठरले. म्हणूनच रंगनाथन यांना ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणतात. त्यानी तांत्रिक काळातही ग्रंथालयाची पंचसूत्र धोरण निर्माण केले. कोलन क्लासिफिकेशन, प्रोलेगोमेना टू लायब्ररी क्लासिफिकेशन, थेअरी ऑफ लायब्ररी अँड रेफरन्स सर्व्हिसेस आदी अमूल्य ग्रंथाचे लेखन व प्रकाशन केले. रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्रातील प्रमाणपत्र तसेच पदविका अभ्यासक्रमाचे प्रारूप धोरण तयार करून ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

Granthalay Shastraache Janak – Padmashree Dr S R Ranganathan

रंगनाथन यांनी ग्रंथपालांसाठी सांगितलेली पंचसूत्री 

१. ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत.

२. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. 

३. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे.

४. वाचकांचा वेळ वाचला पाहिजे.

५. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. 

    हि पंचसुत्र ग्रंथालयाचा आत्मा आहे.यामुळी वाचक ग्रंथ यांचा सुरेख सुयोग साधला गेला आहे. डॉ एस आर रंगनाथन यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने सन १९३५ साली 'रावसाहेब' या पदवीने त्यांना सन्मानित केले. ग्रंथालयशास्त्रातील प्रमाणपत्र, बी. लिब, एम. लिब अभ्यासक्रमासाठी बहुआयामी व अथांग कर्तृत्वाबद्दल भारत सरकारने सन १९५७ साली "पद्मश्री' पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. सन १९६४ साली अमेरिकेतील पिर्टसबर्ग विद्यापीठाकडून “डीलिट' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तालिकीकरण व वर्गीकरण या विषयातील संशोधनासाठी १९७ साली अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने “ मार्गरेड मॅन' हा पुरस्कार दिला. शासनाने त्यांच्या कार्याची व योगदानाची दखल घेत त्यांच्या नावाने ग्रंथालय चळवळीत योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील ग्रंथालय कार्यकर्त्याना व ग्रंथपाल कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट ग्रंथालय सेवक, एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र हे पुरस्कार देण्यात येतात. भारतीय ग्रंथालयाच्या इतिहासात साधारण १९६५ नंतर संगणकाने प्रवेश केला. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जागेच्या प्रश्नाला पर्याय दिला पण त्यामुळे ग्रंथालये नाहीशी होणार नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र ई - बुक्स, ई-जर्नल्स, सीडी, डीव्हीडी, मायक्रोचीप, कार्ड रीडर, पीडीएफ, अलीकडचे किंडल अशा ई- लायब्ररीची नवी संधी ग्रंथप्रेमींना, वाचकांना उपलब्ध झाली आहे. “वाचाल तर वाचाल“ या बोधवाक्या अनुसार सार्वजनिक ग्रंथालये समाज प्रबोधन करण्यासाठी प्रामाणिक कार्य करत आहेत. या चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा व एक महत्वाचे ग्रंथालयशास्त्र म्हणुन मान्यता मिळवून देणारे ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ एस आर रंगनाथन यांचा जन्मदिन ग्रंथपाल दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. या ग्रंथपाल दिनानिमित्त सर्व ग्रंथपाल व ग्रंथालयीन कर्मचारी व पदाधिकारी व वाचक यांना मनःपूर्वक शुभेच्छा व डॉ एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

डॉ. राजेंद्र मुरलीधर सानप

सदस्य - महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड, मो. नं. ९४२१९५९७