सातारा ओबीसी महासंघाचा ऐतिहासिक आक्रोश मोर्चा: मराठा - कुणबी जीआर रद्दीची मागणी

     3 ऑक्टोबर 2025, सातारा: महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी मराठा-कुणबी नोंदी मान्य करण्याबाबत काढलेल्या जीआरच्या विरोधात सातारा जिल्हा ओबीसी महासंघाने तीव्र आक्रोश मेळावा आणि मोर्चा आयोजित केला. ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी, एससी-एनटी समाजांच्या बंधू - भगिनींनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग घेतला.

Satara_OBC_Mahasangh_Aakrosh_Morcha_Against_maratha_Kunbi_GR

     कार्यक्रमाची सुरुवात काँग्रेस भवन येथे आक्रोश मेळाव्याने झाली. त्यानंतर लोक एसटी स्टँड ते पोवई नाका (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा) आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. पुतळ्याला हार घालून मोर्चा निघाला असला तरी, कलेक्टर कचेरीसमोर प्रचंड जनसमुदाय जमा झाला. अनेक ओबीसी बांधवांनी रस्त्यावर चालत घोषणा देत सहभाग घेतला, तर काहींनी थेट कार्यालयासमोर वाट बघितली.

     मोर्चानंतर पाऊण तासाच्या भाषणांनंतर, उपस्थित महिला, विद्यार्थिनी आणि ओबीसी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात जीआर तत्काळ रद्द करण्याची किंवा त्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली. आरक्षण फक्त पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्यांना राजकीय, शैक्षणिक व नोकरीच्या क्षेत्रात मिळावे, असेही नमूद केले. निवेदनाची प्रती टीव्ही चॅनेल्स, वृत्तपत्रांना देण्यात आल्या. यावेळी २०० हून अधिक ओबीसी बांधवांच्या सह्या घेऊन हे निवेदन मुख्यमंत्री, पंतप्रधान व ओबीसी उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत पाठवण्यात आले.

Satara_OBC_Protest_Morcha_Against_maratha_Kunbi_GR

     सातारा जिल्ह्यात प्रथमच ओबीसी समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला असून, सर्व जाती-जमाती एकत्र आल्या. येथून पुढे सातारा जिल्हा ओबीसी महासंघाची स्थापना झाल्याचे जाहीर करण्यात आले. या महासंघाचे कोणताही अध्यक्ष नसणार, फक्त 'संघटक' पद असेल, असे ठरले. महासंघ ओबीसींच्या अडचणींबाबत जनतेला माहिती देणार असून, आंदोलनाची गरज पडल्यास मोठी चळवळ उभी करणार आहे. गावागावांतून आलेल्या सहभागींनी यापुढील मोर्चे अधिक भव्य असतील, अशी खात्री दिली.

     मोर्चात महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासंघाचे पोपटराव गवळी, सातारा जिल्हा तेली समाजाचे अध्यक्ष अनिल भोज, विठ्ठल चिंचकर, शिवाजी चतुर, तुळशीदास शेडगे, गणपत दळवी, डॉ. हेमलता हिरवे, स्मिता महाडिक, सोमनाथ धोत्रे, सुरेश चिंचकर, मनोज विभुते, सुभाष हाडके यांच्यासह अनेक ओबीसी नेते उपस्थित होते. ओबीसी समाजातील सर्व बंधू-भगिनींना, विद्यार्थी-विद्यार्थिनींना आवाहन केले की, भविष्यात ओबीसी हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर गट-तट विसरून एकत्र यावे. अन्याय सहन न करता स्वभावात सुधारणा करावी, अन्यथा गैरफायदा होतो, असेही सांगितले.