पिंपरी-चिंचवड : काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड ओबीसी विभागाच्या वतीने येत्या रविवारी, 25 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुदळवाडी पूल, भोसले पेट्रोलपंपाजवळ "जय संविधान, जय बापू, जय भीम" या ब्रीदवाक्याखाली भव्य ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी, संविधानाचा सन्मान आणि संरक्षण, काँग्रेसची आघाडीची भूमिका, राहुल गांधी यांच्या प्रयत्नांमुळे देशात होणारी जातनिहाय जनगणना यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे. हा मेळावा आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आणि संविधानाच्या रक्षणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिलकुमार जयहिंद, विधानपरिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुदडे पाटील, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, निर्भय बनोचे, अॅड. असिम सरोदे, शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, कामगार नेते विष्णूपंत नेवाळे, मिलिंद फडतरे, महिला शहराध्यक्षा सायली नढे, ओबीसी बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव गुरव, काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर निरीक्षक प्रवीण जांभळे, ओबीसी संघर्ष समितीचे अनंता कुदळे, आनंदा जैसवाल, राहुल शिंपले आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आणि संविधानाचे रक्षण करणे हे आहे. काँग्रेस पक्षाने संविधान सन्मान आणि बचावासाठी विविध मोहिमा आणि उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागली असून, यामुळे सामाजिक न्याय आणि समतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास मेळाव्यात व्यक्त केला जाणार आहे. या जनगणनेचे फायदे आणि त्याचे सामाजिक परिणाम यावरही चर्चा होणार आहे. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी काँग्रेस ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी मुख्य संयोजक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
हा मेळावा पिंपरी-चिंचवडमधील ओबीसी समाजाला एकत्र आणण्यास आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. संविधानाचे मूल्य जपण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या प्रयत्नांना गती देणारा हा मेळावा समाजात नवीन जागरूकता निर्माण करेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.