दि. १० फेब्रुवारी २०१९ - वय वर्षे ४ ते १४ [ १८९४ ते १९०४] याकाळात भिमराव सातार्यात राहत होते. एकदा ते भावंडांसह वडलांना भेटायला जात असताना गाडीवानाने त्यांची जात कळताच त्यांना गाडीतून खाली उतरवले. त्यांना प्यायला कोणीही पाणी दिले नाही. ह्या घटनेने कोवळ्या भिमरावाच्या काळजाला दिलेल्या डागण्या ते आयुष्यभर विसरू शकले नाहीत. मनावरचे हे चरे आठवले की भिमराव कायम जखमी व्हायचे. या घटनेला आज सव्वाशे वर्षे उलटून गेलीयत. त्या दहा वर्षाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातार्याच्या सदर बाजार या कॅंटोनमेंट परिसरातील भाड्याच्या घरात राहात होते. त्या घराला भेट द्यायला काल गेलो होतो.
त्यांचा आरडाओरडा ऎकून काही शेजारी गोळा झाले. त्यांनी मला सांगितले या खानदानी मंडळींना डॉ. बाबासाहेबांच्या नावाची नफरत आहे. संपुर्ण ॲलर्जी. या घरात सव्वाशे वर्षांपुर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहात होते हा त्यांना आजही अपमान वाटतो. ते नाव ऎकले की त्यांचा संताप संताप होतो. ते पिसाळतातच.
त्या घराची व जागेची बाजारभावाने होणारी किंमत रूपये एक कोटींपेक्षा अधिक असून ती अदा करून हे घर सरकारने "राज्य संरक्षित स्मारक" घोषित केलेले आहे. तशी कायदेशीर प्रक्रियाही पुर्ण झालेली आहे. तरीही हे सरंजामदार सदर स्मारक/घर बळकाऊन बसलेत. सरकारचा निर्णय ते मानायला तयार नाहीत. हे घर सातारच्या सदर बाजार परिसरात, पारशी अग्यारीसमोर आहे.
आता कुठे राहिलीय जातियता? असा साळसूद प्रश्न काही उच्चभ्रू सहजपणे विचारतात.
प्रा. हरी नरके, दि. १० फेब्रुवारी २०१९