'इंडिया' आघाडीच्या बैठकीत निर्धार : संविधानाचे रक्षण हाच जाहीरनामा
सातारा, ता. ६ : देशातील भाजप, आरएसएस आणि मनुवाद्यांच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या साताऱ्यातील बैठकीत आज करण्यात आला. त्याच धर्तीवर जिल्ह्या-जिल्ह्यात कृती कार्यक्रम ठरवले जाणार असून, आमचा जाहीरनामा हा संविधान व संविधानातील उद्दिष्टे हाच आहे. त्या उद्दिष्टांचे रक्षण करणे हे आमचे - कर्तव्य आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
समन्वय बैठक आज झाली. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, डॉ. भारत पाटणकर आदी उपस्थित होते..
चव्हाण म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने इंग्रजांची फोडा व झोडा ही नीती | अवलंबल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी घराघरांत भांडणे लावली. पक्ष फोडले, घरे फोडली, जाती-जातीत भांडणे लावली. धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम केले. त्यांच्या विरोधी लढण्याचा संकल्प आजच्या या समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आलेला आहे."
मोदी सरकारविरोधात मोर्चाचे नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार व राज्य राज्यातील भाजपची सरकारे ही भ्रष्टाचाराची कुरणे झालेली आहेत. त्या विरोधात या निवडणुकीत प्रचारात भर दिला जाईल, तसेच इलेक्ट्रॉल बाँडची माहिती देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया टाळाटाळ करत असल्याने त्यांच्या विरोधात लवकरच ठिकठिकाणी मोर्चे काढण्याचे बैठकीत ठरवण्यात आले.
शरद पवार गटाचे नेते हेलिकॉप्टरने रवाना
'इंडिया' आघाडीची बैठक सुरू असतानाच मुंबईत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, सारंग पाटील हे तिघे हे खास हेलिकॉप्टरने रवाना झाले.