मुख्य मजकूराकडे जा

देशाचे दुश्मन

Deshache Dushman by Satyashodhak Dinkarrao Javalkar

Page 18 of 27
15 एप्रिल 2023
Book
1,2,7,3,5,,,

देशाचे दुश्मन, ( भाग 18) लेखक  -  सत्यशोधक दिनकरराव जवळकर

     पुण्याच्या बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात काढली, तेव्हा 'देश बुडाला, धर्म बुडाला, कलि आला' म्हणून बाप मेल्यासारखी कोकलत सुटली. या कोकलत खंगारात पहिला नंबर चिपळूणकर आणि त्यांच्या खालोखाल शंखबहाद्दर टिळक ! टिळक-चिपळूणकर हे ब्राह्मण्याचे हे दोन हात होते. कोणी ब्राह्मण्याला कसोटा मारला की, हे दोन्ही हात त्यांच्याच तोंडावर आदळून अशी बोंबाबोंब करीत, असा तोंडाचा अजबखाना खोलीत की हे ब्रह्म देवाच्या ओकारीपासून झालेले असावेत, असा समंजस माणसाचा ठाम निश्चय होई. जोतिरावांनी केलेल्या श्रमाचे फळ आज पुण्याच्या हुजूरपागेतील गर्ल्स हायस्कूलमध्ये पाहावयास सापडत आहे व हजारो भटांच्या लेकी-सूना त्यातून 'मनुष्य' होऊन बाहेर पडत आहे. जोतिरावांनी नेट धरला नसता तर ब्राह्मण जात रानटी आहे म्हणून 'ब्राह्मणवाडा' गावाच्या दूर बसविण्याची पाळी आली असती. ही शाळा स्थापन करतेवेळी जोतिरावांचे वय अवघे एकवीस वर्षांचे होते. सहा वर्षांखाली सत्यशोधक म्हणवून घ्यायला मोठे मी मी म्हणवणारे भीत होते; पण पाऊणशे वर्षांपूर्वी हा एकवीस वर्षाचा माळ्याचा मुलगा जगावरील

Jotirao Phule and Savitrimai Phule first school for girls in 1848

नापाक व नापीक

     गुलामांची खडकाळ हृदये, आपल्या थोर पुण्याईचे बीजारोपण करून बगीचाची बहार आणावयास सिद्ध झाला. जुन्या पुराण्या, नासक्या, कुजक्या मतांच्या उकिरड्यावर लोळून, सवंग लोकप्रियतेचा चिखल माखविणारी टिळकांची गाढवलोळी पहा, आणि हिंददेवीच्या पंचकन्यांचा पुनरुद्धार करण्याकरिता स्वत:चा जीव धोक्यात घालणारी ही जोतिरावांची सिंहाची झेप पहा. भटणीच्या कुशीत मोहरा जन्मतो आणि माळणीचे पोटी पशूच जन्मतो, असली टिळकी नजर ज्या भटाला नसेल त्याला हे कबूल करावेच लागेल, की जोतिरावांपुढे टिळक म्हणजे एक काठीचे कोल्हे व कोल्ह्याचा कुईकुयाट ठरत आहे. जोतिरावांचा याच स्त्री शिक्षणाबद्दल इतका छळ झाला, की तो सहन करताना साधारण मनुष्य पशूपलीकडे तरी गेला असता. शाळेत मुलींची संख्या वाढत गेली, कोणीतरी फुकट मास्तरकीचे काम करावयास त्यांना एक जोडीदार पाहिजे होता; ब्राह्मणांनी तर स्त्रियांना  शिक्षण देणे म्हणजे त्यांना 'मडमा' बनविण्यासारखे महत्पाप आहे, असा जोराचा विरोध सुरू ठेवलेला; स्त्री जातीला ब्राह्मणांनी जितके नीच ठरविले आहे तितके दुसऱ्या कोणीही ठरविले नाही. ब्राह्मण लोकांच्या मनात त्यांच्या आया-बहिणीविषयी, लेकी-सुनांविषयी जो पुरातन काळापासून संशय आहे, त्याचे कारण समजत नाही. ब्राह्मणेतर लोक स्त्रीयांना कधीच हीन लेखीत नव्हते व नाही. राज्यकारभारापासून तो गरीबांच्या झोपडीपर्यंत पुरुषवर्गाबरोबरीने वागण्यास ब्राह्मणेतर स्त्रिया हमेशा तयार असतात. ब्राह्मणेतर स्त्री अगदी गोषात ठेवा, तिथून ती राजसुत्रे हलवील, पण त्यामुळे तिच्याविषयी वाईट संशय कोणाला येणार नाही. अपवाद असतील, पण ते फार थोडे ! ब्राह्मणांत पूर्वी काहीतरी भयंकर गडबडगुंडा उडाल्यामुळे स्वतःच्या बायकांवरचा त्यांचा विश्वास उडाला आहे.

"न स्त्री स्वातंत्र्यमर्हति "

    हे ब्राह्मणी सुखाच्या भात्यातून निघालेले अस्त्र भटणींच्या भोवतीच का पडले ? अनृत, साहस, माया या दुर्गुणांनी भटांनी आपल्या आया-बहिणींची जी शास्त्रोक्त ओटी भरली आहे, याचे कारणही तसेच बलवत्तर असले पाहिजे. अजूनसुद्धा वयाच्या चाळीसाव्या वर्षी चिपळूणकरांनी शूद्र ठरविलेल्या ब्राह्मणेतरांच्या गळ्यात जाहीर रीतीने भटणी पडत आहेत, असे वृत्तपत्रे ठोकीत असतात. काहीतरी हा पौराणिक ब्रह्मघोटाळा असेल, ब्राह्मणांनी स्त्री जातीचा स्वानुभवावरून अपमान केलेला दिसतो. तसा इतरांनी केलेला दिसत नाही. अशा स्वमाता संशयी भटजींच्या विरोधामुळे जोतिरावांना मुलींच्या शाळेला जोडीदार मास्तर मिळेना. टिळक-चिपळूणकरांचे बापजादे जोतिरावांना कोलमडून पाडण्याकरिता तयार होतेच. जोतिराव म्हणजे काय कच्च्या विटांचा मेरू नव्हता की, कच्च्या गुरूचा चेला नव्हता. ह्या सच्च्या दिलाच्या हिंदपुत्राने स्वत:च्या कुटुंबाला, नवयुगीन महाराष्ट्राच्या आद्य माता सावित्रीबाई फुले यांना मास्तरणीचे काम करावयास लावले. स्त्री-शिक्षणावरचे पहिले संकट ह्या नव्या मनुतील

भवानी मातेवर कोसळले

    आजच्या मास्तरणी सुद्धा या जुन्या चुन्याच्या भट्यांना मनगट पाहिल्याशिवाय सहन होत नाहीत, तर महाराष्ट्र मायबहिणीची ही पहिला विद्यादेवी, ब्राह्मणांच्या डोळ्यात खड्यासारखी सलू लागली असेल त्यात नवल नाही. भट जात विरोध करताना नीचपणाची कमाल करते, हे पौराणिक ऐतिहासिक सत्य स्वयंसिद्ध आहे. २०व्या शतकात पटेल बिलाला संमती दिली म्हणून, काही ब्राह्मण मुलींवर, स्वतः च्या मायभगिनीवर कर्मचांडाळ ब्राह्मण पशूंनी हात टाकण्यास कमी केले नाही. हे प्रस्तूत लेखकाने स्वयंसेवक म्हणून काम करीत असता डोळ्याने पाहिले आहे; आणि अनेक ब्राह्मणेतर स्वयंसेवकांनी धावत जाऊन त्याच नरपशूंच्या अघोरी उन्मादातून ब्राह्मण मुलींची अब्रू वाचविली आहे. सध्या जर ब्राह्मण स्त्रियांच्याबाबतीत ही स्थिती, तर पाऊणशे वर्षांपूर्वी हा भटभाईंनी केवढा कहर माजवला असेल ! जोतिरावांच्या कुटुंबावर शाळेत जाताना या ब्राह्मण नराधमांनी

खडे मारण्यास

    कमी केले नाही. महाराष्ट्राच्या या मायमाऊलीवर पडलेले खडे महाकालाच्या दणक्याने आज मातीत मिसळूनही गेले असतील; पण या खड्याने ब्राह्मणेतर महाराष्ट्राच्या हृदयाला पडलेली भगदाडे मात्र इतकी लांब, रूंद व खोल आहेत, की संबंध ब्राह्मण्यांच्या, ! , पुराण- ग्रंथांच्या मढ्यांनी तरी भरून जातील की नाही हा आज तरी सांगवत नाही. निष्ठुर भविष्याला मुठीत धरून जोतिरावांनी काळाचा चाळा फिरविण्यासच सुरवात केली होती. अशा महाकार्यात असले भयंकर आघात सोसावे लागतातच, पण तेच मनात ठेवून सत्यशोधकांनी त्यांचे उसणे फेडू नये अशी आमची विनंती आहे. दर आठवड्याला एकांतित न्हाव्याच्या पुढे आपल्या आया-बहिणींच्या मुंड्या तासण्याकरिता देणाऱ्यांनी जोतिरावांच्या कुटुंबाला खडे मारले यात नवल ते काय ! सर्पाने प्राण घेतलाच पाहिजे; नाहीतर तो सर्प कसला ! ज्यांना स्वमातांची पर्वा नाही ते किती हलकट आणि नीच वृत्तीचे लोक असले पाहिजेत हे जाणून त्यांच्या बायकांच्या मुंड्या न्हाव्याकडून सोडविण्यास ब्राह्मण माऊलींना उलट सहाय्य करण्यास आपणच तयार झाले पाहिजे. आपण एकाच दणक्याने असल्या मुर्दाड लोकांच्या शास्त्रीय काचातून त्यांची मुक्तता करू शकू, अशी आपली उमेद आहे. जोतिरावांच्या कुटुंबाला त्रास दिला, त्याचा सूड उगविणे हे क्षत्रिय कर्म नव्हे. हा शुरांचा धर्म नाही; स्त्रियांवर खडे मारण्याचे, स्त्रियांवर चळवळीत देखील हात टाकण्याचे नीच कर्म ब्राह्मण म्हणविणाऱ्या पशूंकडूनच होत असते, ते त्यांचे त्यांनाच लखलाभ होऊ द्या ! आपली माता वीरप्रसू क्षत्रिय माता असते. ब्राह्मणांनी स्वतःच्या मातेला सुद्धा

"जन्मना जायते शूद्रः '

    या हुकूमाने 'ब्राह्मण्य' लाभू दिले नाही. क्षात्र मातेच्या सुपुत्रांनी या शूद्र मातेच्या भटांना इथून पुढे मिरवू देऊ नये ! यांच्या हाती धार्मिक, सामाजिक सूत्रे असली तरी हे ब्रह्मदेवाच्या बचाळीतले किडे, टिळक-चिपळूणकरांसारख्या