आमिन शेख, राज्य कार्यकारणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ,
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून आजवर १६ विद्रोही साहित्य संमेलनं राज्यभरात विविध जिल्ह्यांत मोठ्या थाटात पार पडली. यंदाही १७ वे विद्रोही साहित्य संमेलन वर्धा येथे थेट अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आमनेसामने होत आहे. यंदा वर्धा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व सत्यशोधक समाज स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवास समर्पित करून १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. याबाबत हा विशेष लेख....
विद्रोही मराठी साहित्य संमेलन म्हणजे परिसंवाद, कविसंमेलन, गटचर्चा, विशेष व्याख्यान, शाहिरी जलसा, बालमंच, लघुचित्रपट, चित्रप्रदर्शन एकपात्री प्रयोग, विशेष मुलाखत असा भरगच्च कार्यक्रम म्हणण्यापेक्षा उत्सवच विद्रोही संमेलनात साजरा होतो. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व सत्यशोधक समाज स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवास समर्पित करून ब्राह्मणी, भांडवली, पुरुषताक मूल्यसंस्कृतीच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक १९९९ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेत पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक पाया आहे. न्या.म.गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण म. जोतिराव फुले यांना दिले; तेव्हा म. फुलेंनी म्हटले होते की, तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही. फुलेंनी उंटावरून शेळ्या वळणाऱ्या घालमोड्या दादाच्या त्या संमेलनात सहभागी होण्यास ठाम नकार दिला होता.
सध्या देशात असहिष्णू वृत्ती थैमान घालत आहे. भारतीय नागरिकांनी काय खावे, काय खाऊ नये कोणत्या विचारांचा प्रचार प्रसार करावा आणि करू नये, लग्न, प्रेम कोणाशी करावे आणि करू नये हिंदू स्त्रियांनी किती अपत्ये जन्माला घालावी इत्यादी संदर्भात पितृसत्ताक मूल्य विचार व संस्कृती लादण्याचे प्रकार आणि त्यासाठी हिंसा आणि दहशतीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही प्रवृती कायदा हातात घेऊन पछाडलेले जमाव सोबत घेऊन मॉब लिंचिंग घडवत आहेत. संस्कृतीच्या संभावित टेहाळणी बुरुजांवरून ही प्रवृत्ती सामान्यजनांच्या जीवनावर नियंत्रण गाजवत आहे. महात्मा गांधीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला गोळ्या झाडत नथुराम प्रवृत्तीचे गौरवीकरण उघडपणे केले जात आहे. संसद, न्यायपालिका, आर्थिक संस्था अशा सर्व लोकशाही संस्था खिळखिळ्या केल्या जात आहेत. विरोधकांना संपविण्यासाठी शासकीय तपास यंत्रणा ईडी, सी.बी. आय. एनआयएचा वापर केला जात आहे. सांस्कृतिक दहशतवाद आक्रमकपणे अंमलात आणला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीचा नंगानाच चालू आहे. इतिहास, संस्कृती परंपरेचा गैरवापर करत खोट्यानाट्या कंड्या पिकवत, जाणीवपूर्वक हिंसेचे शास्त्र तयार करणाऱ्यांना राज्यकत्यांकडून बहुमान मिळत आहे. धार्मिक दंग्यासाठी वादग्रस्त प्रश्न उकरून काढले जात आहेत बहुजन समाजाला अपमानित करण्यासाठी महामानवांच्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. ते करणाऱ्या ब.मो. पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण देऊन भागले नाही, तर पदमभूषण देऊन बहुजनांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आता जेम्स लेन प्रकरणी पाहिलेले इतिहासाचे विकृतीकरण चित्रपटात आणले जाते आहे, उद्या ते पाठ्यपुस्तकातही येण्याची शक्यता आहे. कारण महामानवांच्या बदनामीला केंद्रीय सरोधा राजाश्रय लाभला आहे. स्वतः राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज व आई सावित्रीबाई फुले यांची बदनामी करत आहेत. समतावादी विचारांना देशद्रोही ठरवले जात आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खुनी अजूनही मोकाट आहेत, इतिहासाचे विकृतीकरण, शिक्षणाचे ब्राह्मणीकरण, राज्यघटना बदलाचे राजकारण, समाजाचे जातीजमातील विभागीकरण, लैंगिकतेचे वस्तुकरण, आदिवासी वनवासिकरण यातून भारतीय संस्कृतीच्या मुळावर हल्ले चढवले जात आहेत पार्श्वभूमीवर कला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात कष्टकरी व वंचितांच्या शेतकयांच्या बाजूने अभिव्यक्तीच्या वाटा मोकळ्या करणारी विद्रोही साहित्य संमेलने १९९९ पासून आपण आयोजित करीत आलो आहोत, समता, लोकशाही व आत्मसन्मानाची एक घनघोर लढाई, मराठी भाषिक संस्कृतीच्या क्षेत्रात लढली जात आहे. आपणही या विद्रोही साहित्य संमेलनास सहकार्य करून, उपस्थित राहुन या महाप्रवासात सामील व्हाये. जनतेच्या जाणिवा बधिर करणाऱ्या वर्चस्ववादी चंगळवादी संस्कृतीला नकार देत बंधु-भगिनीभाव, सामाजिक बांधिलकीचा नवा आविष्कार या सायबर युगात घडवूयात. विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी संस्कृती साहित्य विचारांचा पुरस्कार करते.
विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने आजवर मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, वाशी (नवी मुंबई), पुणे, मनमाड, धुळे, परभणी, बुलढाणा, हिंगोली, नाशिक, उदगीर इत्यादी ठिकाणी साहित्य संमेलने. एक आंतरराज्य (निपाणी), एक विद्रोही महिला साहित्य संमेलन (पुणे) यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहे. कालकथित बाबुराव बागुल, कवी वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनिराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ. आ.ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते यांसारख्या सर्जनशील साहित्यिकांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत. बहुभाषिकता, धार्मिक व सांस्कृतिक बहुविधतेतह संविधानाचा सन्मान हे या १७ व्या अ. भा. विद्रोही साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्ये आहे.
आमिन शेख, राज्य कार्यकारणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, 9763047863