डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा दलितांचे नेते अशी करण्यात आली. बौद्धांचे आणि अनुसूचित जाती-जमातींचे उद्धारकर्ते अशी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा माध्यमांनी तयार केलेली आहे. महात्मा गांधी, पं. नेहरू, लो. टिळक हे साऱ्या देशाचे नेते.(भविष्यात गोळवलकर, हेगडे, सावरकर!) मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते अशी जाणीव समाजमनावर कोरण्यामागचे राजकारण कधीतरी आम्ही शांतपणे समजून घ्यायला हवे. ४० वर्षांपूर्वी मी नामांतर आंदोलनात तुरुंगात गेलो, तेव्हा तिथे मी नानाविध जातिधर्माचे सत्याग्रही लोक बाबासाहेबांना मानणारे पाहिले. त्यांच्याशी बोलल्यावर माझी मनोमन खात्री झाली, की बाबासाहेबांना असे मर्यादित, सीमित करण्यामागे एक फार मोठे कारस्थान आहे.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातले सर्वाधिक अभिमानाचा जसा विषय आहेत. ते सर्वाधिक द्वेषाचेही धनी आहेत ह्यामागचे एंटायर पॉलिटिक्स काय आहे? महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आणल्यामुळे आमचे नुकसान झाले असे बहुजन समाजामध्ये, विशेषतः ओबीसींमध्ये जाणीवपूर्वक बिंबवले जाते. एका बाजूला बाबासाहेबांचे अपहरणही करायचे आणि त्याचवेळी तरुण पिढीमध्ये त्यांच्याबद्दल द्वेषही पसरवायचा असा दुटप्पी व्यवहार कोण करतेय? बाबासाहेबांनी १९३० मध्ये सर्वप्रथम ओबीसी हा प्रवर्ग जन्माला घातला हे किती बलुतेदार, अलुतेदार (शूद्र) लोकांना माहीत आहे? त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा नेहरू सरकारमध्ये ओबीसींना न्याय मिळत नव्हता म्हणून दिला होता, हे किती वेळा सांगितले जाते? किती कुणबी, माळी, तेली, वंजारी, आग्री, सुतार, शिंपी, सोनार, मराठ्यांना माहीत आहे, की बाबासाहेबांच्या हृदयात आणि चळवळीत सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय ओबीसी हा होता? स्वतंत्र ओबीसी जनगणनेची १९४६ साली त्यांनीच सर्वप्रथम मागणी केलेली होती
शोध घ्यायला हवा ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९९ साली पहिली शेतकरी परिषद घेतली. त्यांनी विधिमंडळावर काढलेला पहिला मोर्चा दलितांचा नव्हता, तर शेतकऱ्यांचा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कसणाराला जमीन मिळावी म्हणून त्यांनी १९३२ मध्ये खोती रद्द करण्याचे विधेयक लिहिले. १९३६-३८ ला सर्व ताकदीनिशी मुंबई असेंब्लित ते मंजूर व्हावे म्हणून लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते होते हे समीकरण इतके घट्टपणे कोरले गेलेय, की १९१९ साली सर्वप्रथम भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, असे साऊथबरो कमिटीला सांगणारे डॉ. बाबासाहेब फारसे सांगितलेच जात नाहीत. भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या आधी, बरोबर आणि नंतर स्वतंत्र झालेले अनेक देश लोकशाही टिकवू शकले नाहीत. हुकूमशाही किंवा लष्करी राजवट त्यांच्या वाट्याला आली. आपल्या शेजारच्या एका देशात अलीकडेच डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा तिथल्या सर्व विचारवंतांनी आवर्जून एक मुद्दा पुन्हा पुन्हा मांडला. त्यांच्या घटनेच्या कमकुवतपणामुळे त्यांची लोकशाही मृतप्राय झाली. भारताची राज्यघटनाच इतकी मजबूत होती व आहे, की तिच्या लोकशाहीची प्रगल्भता दिवसेंदिवस वर्धिष्णू होत आहे. तिथले सगळे वक्ते म्हणत होते, काश, हमारा संविधान लिखने के लिये हमे भी एक बाबासाहब डॉ. अंबेडकर मिलते, हमे भी एक बाबासाहब भीमराव अंबेडकर चाहिए, हमे भी भारत जैसा प्रजातंत्र चाहिए !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार आहेत. याबाबतचं त्यांचं योगदान आपल्याला त्यांची आणि लेखन यांचे जे राज्य शासनानं २२ खंड प्रकाशित केलेले आहेत, त्यातून बघायला मिळतं. त्यांचे विचार आणि त्यांनी केलेल्या विविध चळवळी आजही प्रेरणादायी ठरतात. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि देशाचे कायदेमंत्री म्हणून राज्यघटनेच्या निर्मितीचे ते प्रमुख शिल्पकार ठरले. बुद्धधम्मविषयक चिंतनातून त्यांनी भारतीय गणराज्यांच्या प्राचीन वारशाला लोकशाहीची नवी झळाळी दिली.
भारतीय राज्यघटनेत प्राचीन भारतीय परंपरा आणि सर्वंकष परिवर्तन यांचा समतोल साधण्याचं फार अवघड काम बाबासाहेबांनी केलं. खरंतर हे भीमधनुष्य पेलणं सोपं नव्हतं. संविधानाच्या रूपानं एक राजकीयसामाजिक क्रांतिकारी विधानच त्यांनी अस्तित्वात आणलं. त्यातून भारताच्या आधुनिकीकरणाला जोरदार चालना मिळाली.
- प्रा. हरी नरके ( लेखक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत. )