दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, प्रकाशाचा आणि मांगल्याचा सण ! घराघरांत दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, फटाक्यांची आतषबाजी, फराळाचा सुगंध आणि नवीन कपड्यांचा उत्साह असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, याच दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कुटुंबांच्या घरात मात्र आनंदाऐवजी चिंतेचा आर्थिक विवंचनेचा अंधार पसरलेला असतो. कारण त्यांच्या वाट्याला आलेली असते ती दुष्काळाची झळ पाण्याची टंचाई, पिकांचे नुकसान व आर्थिक विवंचना!
शहरांमध्ये दिवाळीची खरेदी जोरात सुरू असताना ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत असते. बाजारपेठा रोषणाईने उजळलेल्या असतात; परंतु शेतकऱ्यांच्या घरातील चूल पेटविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. ज्यांच्या कष्टावर संपूर्ण समाजाचे पोट भरते, त्याच शेतकऱ्याच्या घरात दिवाळीचा दिवा लावण्यासाठी पैसे नसावेत, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ?

यंदा पावसाने पाठ फिरवली, काही ठिकाणी पाऊस झाला तर काही ठिकाणी पिके पाण्याअभावी करपून गेली. सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली. कर्जाचा डोंगर मात्र वाढतच चालला आहे. ऊसतोड मजुरांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करायची तरी कशी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
दिवाळीचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर असतो; पण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या चेह-यावर यंदा निरागस आनंदाऐवजी निराशा दिसत आहे. नवीन कपडे, फटाके, मिठाई आणि फराळ यांची अपेक्षा करणाऱ्या मुलांना परिस्थितीची जाणीव करून देताना आई-वडिलांचे मन किती व्यथित होत असेल, याची कल्पनाही करवत नाही.
विशेषता ग्रामीण भागातील महिलांची अवस्था अधिकच कठीण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती, जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, घरखर्च आणि मुलांचे शिक्षण या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांची दमछाक होत आहे. दिवाळीच्या सणात घराची स्वच्छता, रांगोळी, फराळ आणि पाहुणचार करण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक महिलांना आपल्या इच्छा मनातच दाबून ठेवाव्या लागत आहेत.
अशा परिस्थितीत शासनाची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. केवळ दुष्काळ जाहीर करून प्रश्न सुटणार नाही. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक विमा भरपाई, कर्जाबाबत दिलासा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा छावण्या आणि रोजगार हमीची कामे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मदत कागदावर न राहता ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली पाहिजे.
दिवाळीच्या निमित्ताने सरकारने काही अंशी अल्पशी मदत दिली. पण त्यामुळे फार मोठा हातभार लागणार आहे असे म्हणता येणार नाही. मोठमोठ्या करण्यापेक्षा घोषणा दुष्काळग्रस्तांच्या घरात खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवा पेटविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटनांनी व स्वयंसेवी उद्योगजकांनी अशा कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे.
दिवाळीचा खरा अर्थ केवळ घरात दिवे लावणे किंवा फटाके फोडणे एवढाच नाही. तर दुसऱ्याच्या आयुष्यातील अंधार दूर करणे हाच दिवाळीचा खरा संदेश आहे. आज गरज आहे ती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व रोजंदारी कामगारांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची, त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची आणि त्यांच्या घरात आशेचा दिवा पेटविण्याची.
शहरातील दिवाळी रोषणाईने उजळली म्हणून महाराष्ट्र उजळला असे म्हणता येणार नाही. जोपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात आनंदाचा दिवा पेटत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाली असे म्हणता येणार नाही! कारण प्रश्न केवळ दिवाळी साजरी करण्याचा नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा आहे. त्यांच्या आयुष्यातील दुष्काळ संपणार कधी, हाच आजचा खरा प्रश्न आहे.
एका बाजूला दिव्यांची रोषणाई आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या घरातील अंधार. ही दरी मिटविणे, हेच खऱ्या दिवाळीचे उद्दिष्ट असले पाहिजे.
लेखक - डॉ राजेंद्र मुरलीधर सानप इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड मो. न. ९४२०० १९५९७