डॉ. महेंद्र धावडे, संस्थापक अध्यक्ष, बळीराजा पार्टी
पदवीधर /शिक्षक मतदारसंघ (विधान परिषद) निवडणुकीत पसंतीक्रम पद्धतीनुसार (Preferential Voting System) मतदान केले जाते. ही निवडणूक ईव्हीएम (EVM) मशीनद्वारे होत नसून मतपत्रिकेवर (Ballot Paper) पार पडते.
'जांभळे स्केच पेन
• मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांकडून मतपत्रिकेसोबत जांभळ्या रंगाचे स्केच पेन दिले जाते.
• मतपत्रिकेवर पसंतीक्रम लिहिण्यासाठी फक्त आणि फक्त याच पेनचा वापर करणे बंधनकारक आहे.
• स्वतःचे कोणतेही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन वापरल्यास मत अवैध (बाद) ठरते.

पसंतीक्रम नोंदवण्याची पद्धत
१) मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे 'पसंतीक्रम' (Order of Preference) लिहिण्यासाठी एक रकाना (स्तंभ) असतो.
२) तुमच्या सर्वाधिक पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर '१' हा आकडा लिहिणे अनिवार्य आहे. जर तुम्ही कोणत्याही उमेदवारासमोर '१' हा आकडा लिहिला नाही, तर तुमचे मत बाद होते.
३) तुमच्या आवडीनुसार इतर उमेदवारांच्या नावासमोर २, ३, ४ अशा क्रमाने पसंतीक्रम देऊ शकता. हे देणे ऐच्छिक (Optional) आहे. तुम्ही हवे असल्यास फक्त '१' हा एकच पसंतीक्रम देऊनही मतदान सोडू शकता.
४) जेवढे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, त्या सर्वांना तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता.
मत देण्याची पद्धत
पसंतीक्रम दर्शवणारे आकडे खालीलपैकी कोणत्याही एकाच स्वरूपात लिहिता येतात.
• आंतरराष्ट्रीय अंक: 1, 2, 3, 4...
• देवनागरी (मराठी) अंक: १, २, ३, ४...
• रोमन अंक: I, II, III, IV...
(टीप: पसंतीक्रम 'एक', 'दोन', 'तीन' अशा शब्दांत लिहू नये.)
मत अवैध (बाद) होण्यापासून वाचा
• १ हा आकडा एकाच उमेदवाराला द्या: '१' हा आकडा एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर लिहू नका.
• चिन्हांचा वापर करू नये-उमेदवाराच्या नावासमोर बरोबरचे (✓) किंवा चुकीचे (✗) असे कोणतेही चिन्ह करू नका. पसंतीक्रम फक्त अंकातच लिहावा.
• ओळख पटेल असे काहीही लिहू नये-मतपत्रिकेवर स्वतःचे नाव, सही, आद्याक्षरे, अंगठ्याचा ठसा किंवा इतर कोणताही मजकूर लिहू नका. यामुळे गोपनीयता भंग पावून मत बाद होते.
• आकड्यांची पुनरावृत्ती टाळावे-एकच आकडा (उदा. २ किंवा ३) वेगवेगळ्या उमेदवारांच्या समोर लिहू नका.
बळीराजा पार्टी