चाळीसगाव - २४ सप्टेंबर हा ऐतिहासिक दुहेरी क्रांती दिन आहे. याच दिवशी इ.स. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शाक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक झाला आणि बरोबर १९९ वर्षांनी इ.स. १८७३ मध्ये महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या दोन्ही ऐतिहासिक घटनांच्या ३५२ व्या आणि १५३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सत्यशोधक समाज संघाच्या वतीने चाळीसगांव भडगाव रोड येथील महात्मा फुले स्मारक येथे भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ वंदनेने झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फूले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी हातात सत्यशोधक समाजाचा झेंडा घेऊन "जय जिजाऊ, जय शिवराय, जय जोती, जय क्रांती, जय सत्यशोधक" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या अभिवादन सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा. कैलास जाधव आणि शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. गोकूळ पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा कार्याध्यक्ष कैलास जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शिवाजी महाराजांचा शाक्त राज्याभिषेक हा बहुजन समाजाला स्वराज्यात सामावून घेण्याचा क्रांतिकारी प्रयोग होता. निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते झालेला हा अभिषेक हे सांगतो की स्वराज्य हे सर्व १८ पगड जातींचे आहे. याच विचाराचा वारसा महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुढे नेला. फुले हे शिवरायांचे खरे वैचारिक वारसदार आहेत, त्यांनीच प्रथम रायगडावर जाऊन शिवजयंती उत्सव सुरू केला.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोकूळ पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. महात्मा फुले यांनी १८८३ साली शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या लुटीचा पर्दाफाश केला. आजही शेतकरी त्याच परिस्थितीत आहे. शिवरायांचे रयतेचे स्वराज्य आणि फुलेंचे सत्यशोधक विचारच शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सत्यशोधक समाजाचे प्रचारक ह.भ.प. भगवान महाराज रोकडे यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सत्यशोधक विचार मंचाचे अध्यक्ष मा. भीमराव खलाने यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सत्यशोधक समाजाच्या प्रार्थनेने *सत्य सर्वांचे घर, सर्व धर्माचे माहेर* याने झाली.
याप्रसंगी माळी समाजाचे जेष्ठ नेते अशोक खलाने, डॉ. संजय माळी, समता सैनिक सतीश महाजन सर, माजी सरपंच आबासाहेब पैलवान, सच्चिदानंद जाधव, पोलीस पाटील शरद महाजन, एन.डी. महाजन सर, पत्रकार निलेश परदेशी, लोकमतचे पत्रकार गोविंद वाघ, मानव मुक्ती मिशनचे तालुका अध्यक्ष भूषण माळी, भगवान महाजन, शैलेंद्र महाजन, माजी सैनिक अशोक माळी यांच्यासह चाळीसगाव शहर व तालुक्यातील परिवर्तनवादी संघटनांसह सत्यशोधक समाज संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी यापुढे गावागावात शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रचार प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.