बहाळ (रथाचे) येथे प्रथमच सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती विधी

     चाळीसगाव तालुक्यातील बहाळ (रथाचे) या गावात काल गुरूवार दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटना घडली. येथील ज्येष्ठ नागरिक कै. सोमा देवला महाजन यांचा दशक्रिया व उत्तरकार्य गंधमुक्ती कार्यक्रम पारंपारिक कर्मकांडाला फाटा देत सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीनुसार मोठ्या वैचारिक वातावरणात सकाळी १० वाजता राहत्या घरी संपन्न झाला. बहाळ रथाचे गावाच्या इतिहासात अशा प्रकारचा पुरोहित विरहित, अंधश्रद्धा मुक्त विधी पहिल्यांदाच पार पडल्याने या घटनेकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते. या विधीचे विधिकर्ते म्हणून सत्यशोधक चळवळीतील प्रचारक भगवान रोकडे यांनी हा विधी अतिशय साध्या आणि समजेल अशा भाषेत पार पाडला.
Bahal Rathache Yetha Prathamach Sarvajanik Satyadharma Paddhatine Dashakriya Va Gandhmukti Vidhi

     सुरुवातीला त्यांनी उपस्थितांना सत्यधर्म म्हणजे काय हे समजावून सांगितले. ते म्हणाले, सत्यधर्मात पिंडदान नाही, तर विचारदान आहे. गंधमुक्ती म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याचा गंध काढणे नाही, तर जिवंत असलेल्या माणसांच्या मनातील भीती, दुःख आणि अंधश्रद्धेचा गंध काढून टाकणे आहे. कै. सोमाजींनी आयुष्यभर कष्ट केले, त्यांच्या कष्टाला सलाम करणे हाच खरा विधी आहे. या विधीचे औचित्य साधून शोकाकुल सोनवणे परिवाराने एक स्तुत्य उपक्रम राबविला. त्यांनी ब्राह्मणाला दान-दक्षिणा देण्याऐवजी समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या सत्यशोधक समाज संघास २१०० रुपयांचा सहयोग निधी सुपूर्द केला. या निधीचा वापर महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यासाठी करण्यात येणार असल्याचे संघातर्फे सांगण्यात आले.

     या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सत्यशोधक समाज संघाचे प्रदेश सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी "ज्ञान, संस्कृती, इतिहास" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज आपण ज्या अंधश्रद्धेत जगतो, त्याचे मूळ आपण आपला खरा इतिहास विसरलो यात आहे. महात्मा फुले यांनी सांगितले की, विद्येविना मती गेली. म्हणूनच आजच्या या दशक्रिया विधीतून आपण एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे की, आम्ही आमच्या मुलांना उच्च शिक्षण देऊ, मुलींना शिकवू. हाच कै. सोमा महाजन यांना खरा आदर आहे. त्यांनी पुढे सत्यशोधक समाज संघाचे ध्येय-धोरण स्पष्ट केले. आमचे ध्येय कोणत्याही धर्माचा द्वेष करणे नाही, तर माणसाला माणसाशी माणसासारखे वागवणारा सत्यधर्म प्रस्थापित करणे आहे. पुरोहितशाही, जातिभेद, हुंडा, बालविवाह यांसारख्या अनिष्ट प्रथांना विरोध करणे आणि संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांचा प्रचार करणे हेच आमचे धोरण आहे. आज सोनवणे परिवाराने दाखवलेले धाडस हे संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श आहे.

     या कार्यक्रमास शोकाकुल परिवार श्री मोतीलाल देवला महाजन, श्री प्रविण मोतीलाल महाजन, श्री प्रदिप मोतीलाल महाजन, चि अमित प्रविण महाजन, श्री कैलास सोमा महाजन, श्री शामकांत सोमा महाजन, चि सुमित कैलास महाजन, चि प्रतिक शामकांत महाजन आणि समस्त सोनवणे परिवारासह बहाळ व परिसरातील समाज बांधव, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या पुरोगामी पाऊलाचे स्वागत केले. उपस्थित सर्वांनी कै. सोमा महाजन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

     कार्यक्रमाचे शेवटी प्रविण महाजन यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. सार्वजनिक सत्यधर्माची प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम चाळीसगाव तालुक्यात सत्यशोधक चळवळीला नवी दिशा देणारा ठरला आहे.