महात्मा फुले जन्मद्विशताब्दी वर्ष आणि सत्यशोधक समाज वर्धापन दिन निमित्ताने नागपूर येथे एकदिवसीय विदर्भस्तरीय सत्यशोधक ओबीसी जनगणना परिषद दिनांक ४ऑक्टोबर २०२६ ला सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक उमरेड रोड नागपूर येथे संपन्न झाली. विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतील सत्यशोधक विचारांच्या अभ्यासक, संघटक चळवळीतील बांधवांच्या सहभागाने जातीनिहाय जनगणनेवर सर्वांगाने चर्चा झालेल्या या परिषदेचे, कॉंग्रेस पार्टीचे तडफदार आणि अभ्यासू नेते,नागपूरचे शहराध्यक्ष मा.प्रफुल्ल गुडधे यांचे हस्ते उद्घाटन झाले. मा.संजय शेंडे, अध्यक्ष, महात्मा फुले जन्मद्विशताब्दी समारोह समिती नागपूर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन सत्रात युवा संवादक, साक्षी पवार, अकोला, सत्यशोधक समाज चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, जिल्हाध्यक्ष , बहुजन संघर्ष समिती अमरावतीचे भाई अरविंद वानखेडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी प्रफुल्ल गुडधे म्हणाले, " सत्यशोधक समाज वर्धापनदिना निमित्ताने आयोजित या परीषदेचे उद्घाटन माझे हस्ते होत आहे हा माझ्या जीवनातील विलक्षण आनंदाचा क्षण आहे. ओबीसीच्या न्याय्य अधिकाराच्या पूर्ततेसाठी ओबीसी समाज आणि सरकार दोन्ही घटकांच्या दृष्टीने जनगणना उपयुक्त ठरते. त्यादृष्टीने ओबीसीचे जनजागरण होण्यासाठी सत्यशोधक ओबीसी जनगणना परिषदेचे आयोजन खूप महत्त्वाचे आहे. ओबीसीची अद्ययावत आकडेवारी आणि ओबीसीचे आरक्षण यात ताळमेळ बसवण्यासाठी ओबीसी जनगणना झाली पाहिजे. ही मागणी देशभर भडका घेत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे या परिषदेचे आयोजन करुन आरक्षणाची तात्विक भूमिका, त्यासाठीचे आतापर्यंत झालेले लढे आणि ओबीसी आंदोलनासंदर्भात भविष्यातील आखणी करण्यात येणार आहे. आयोजकांनी सामाजिक उत्तरदायित्त्वाच्या भावनेने केलेले या परिषदेचे आयोजन खरोखरच प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरणार आहे." उद्घाटन सत्र, ओबीसी जातीनिहाय जनगणना, आरक्षण आणि सत्यशोधक चळवळ तसेच सध्याच्या ओबीसी आंदोलनाची स्थिती, जात संघटनांच्या भूमिका आणि आंदोलनाची पुढील दिशा अशा तीन सत्रात संपन्न झालेल्या परिषदेची भूमिका बाबा बीडकर यांनी विषद केली. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचलन वंदना वनकर यांनी तर आभार प्रदर्शन टेमराज माले यांनी केले.

"ओबीसी जनगणना, आरक्षण आणि सत्यशोधक चळवळ" हे परिषदेचे प्रमुख परिसंवाद सत्र सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, ' विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य' या संशोधनपूर्ण पुस्तकांसह, आधुनिक मराठी कवितेचे जनक महात्मा फुले यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखक वर्धा येथील डॉ.अशोक चोपडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या सत्रात जातीनिहाय जनगणना कशासाठी? या पुस्तकासह अनेक पुस्तकांचे लेखक, नांदेडचे डॉ. दिलीप चव्हाण, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते, संयुक्त किसान समन्वय समितीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ. किशोर ढमाले, सत्यशोधकांची गावे, ओबीसींच्या बावण्ण कविता व इतर अनेक पुस्तकांचे लेखक, कवी मंगरुळपीर जि. वाशीमचे सतिश जामोदकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या सत्राची भूमिका अनुज हुलके यांनी मांडली. सुत्रसंचलन शुभांगी घाटोळे तर आभारप्रदर्शन राजु बोचरे यांनी केले.
डॉ. दिलीप चव्हाण यांनी जातीनिहाय जनगणनेची अभ्यासपूर्ण मांडणी केली. आर्थिक मागासलेपण ठरवणे सोपे आहे . ते उपलब्ध सांख्यिकी वरुन स्पष्ट दिसते. परंतु सामाजिक सांस्कृतिक अंगाने मागासलेपण स्पष्ट दिसणारे नसल्याने ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याचे ते म्हणाले. जातीनिहाय ओबीसींसह सर्व जातींची सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक अशा सर्व अंगांनी झालेली प्रगती तसेच सामाजिक, धार्मिक माध्यमातून होणारी कुचंबणा मानापमान, संधी नाकारल्या जाणे, उपेक्षित वंचित ठेवले जाणे अशा अनेक अंगाने नोंदी असलेल्या सखोल जातीनिहाय जनगणनेची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक कॉ. किशोर ढमाले यांनी आरक्षण आणि सत्यशोधक चळवळ या संबंधी सविस्तर मांडणी केली. सत्यशोधक चळवळीने समतेसाठी केलेल्या लढ्याची माहिती विषद केली. सत्यशोधक चळवळीचा संघर्ष समतेसाठी, न्यायासाठी, मानवी मुल्यांना अग्रक्रम देणारा संघर्ष असल्याचे विविध संदर्भ दिले. सामाजिक सांस्कृतिक संघर्ष योग्य दिशेने जाण्यासाठी सत्यशोधक चळवळ समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मा. सतिश जामोदकर यांनी सत्यशोधक चळवळीने राबवलेल्या विविध उपक्रमांची मांडणी केली. सत्यशोधक चळवळीतील विविध भागात त्यावेळी कार्यरत सत्यशोधकांच्या कार्याचा उल्लेख केला.
डॉ. अशोक चोपडे यांनी अध्यक्षीय भाषणात विविध शोषित जातींमधील अंतर्गत संघर्ष सामोपचाराने टाळण्याची गरज असल्याचे सांगितले. शोषण व्यवस्थेचे स्वरूप, चरीत्र समजून घेऊन त्याविरोधात एकजूट कशी निर्माण करता येईल? याकडे लक्ष देण्याची तीव्र गरज सध्याच्या काळात निर्माण झाल्याचे सांगतानाच, सत्यशोधक चळवळीचा विचार आणि वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या भूमिका आजही दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सध्या ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी देशभरातील ओबीसींमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. मोर्चे आंदोलने विविध भागात होत आहे. परंतु ओबीसी जातीसमुह एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के पेक्षा जास्त असुन देखील प्रस्थापित शासनकर्ते गंभीरपणे घेत नाही. यामागील कारणमीमांसा आणि निश्चित वैचारिक दिशा घेण्याच्या दृष्टीने या एकदिवसीय विदर्भ स्तरीय सत्यशोधक ओबीसी जनगणना परिषदेचे आयोजन केले गेले.
"सध्याची ओबीसी आंदोलनाची स्थिती जाती संघटनांच्या भूमिका आणि पुढील वाटचाल" या विषयावर शेवटच्या चर्चासत्रामध्ये मा. हिराचंद बोरकुटे, प्रा. नामदेव जेंगठे, प्रा.शाम झाडे, मा. खेमेंद्र कटरे, मा. अजय भेंडे,मा.सुरेंद्र बुराडे, मा. माधव गुरनुले,मा.सुनिता खंडाळे, मा. कपिल थुटे, मा. प्रफुल्ल गुल्हाने,मा. राजेंद्र कळसाईत, मा. गिरीधर कोठेकर, मा.विकी बेलखोडे यांनी आपले विचार मांडले. सध्याची ओबीसी आंदोलनाची स्थिती ही विशेषतः जनगणनेच्या मागणीच्या संदर्भात पुढे आलेली असून सन १९९० च्या मंडल नंतरच्या काळामध्ये विविध जाती संघटनांचा उदय झाला. त्या जाती संघटनाच्या माध्यमातून ओबीसींचे प्रश्न आणि ओबीसी म्हणून वेगवेगळ्या जातींचे प्रश्न घेऊन या जाती संघटनांनी काम केले. त्या माध्यमातून ओबीसीमध्ये एक मोठी, चेतना निर्माण झाली.ओबीसी आंदोलनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सत्यशोधक चळवळीच्या वाटचालीत असल्याचे मान्य होत गेले. शेतकरी आणि मधल्या जातीच्या लोकांची सत्यशोधक चळवळ भारतात खेड्यापाड्यात पोहचलेली पहिली चळवळ होय, वारकरी संप्रदायातील संतांचे योगदान विशेषतः अठरापगड जातीतून संघर्ष करत उभी राहिलेली वारकरी संत चळवळ म्हणजे पुरोहितशाहीचे धार्मिक शोषण आणि विषमतेविरुद्ध आंदोलन होते, महानुभाव संप्रदाय, लिंगायत पंथ समानतेच्या लढ्यात अग्रेसर असलेले आंदोलन यात मधल्या जाती, खालच्या जाती, आणि महिला यांचा अधिक समावेश होता. स्त्री शूद्रातिशूद्र,अर्थात,ओबीसी अस्पृश्य आणि समस्त स्त्रियांच्या मूलभूत हक्कांसाठी हे व्यापक आंदोलन वैदिक व्यवस्थेविरुद्ध चालत आलेले आहे. याची दीर्घ आणि सघन चर्चा, मतमतांतरे मंडलनंतरच्या काळात होऊ लागली. मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या मागासपणास कारणीभूत जातीव्यवस्था आणि पुरोहितशाहीचे वर्चस्व यामाध्यमातून ओबीसीचे होणारे धार्मिक शोषण, त्याविरुद्ध उभे राहिलेले आंदोलन, फुले शाहू आंबेडकर विचारप्रणालीची आवश्यकता या सभोवतीची चर्चा ओबीसी आंदोलनास पूरक ठरत गेली. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेले ओबीसी जनगणना आंदोलनाचे लोन सर्वत्र विदर्भभर आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेले आपल्याला दिसते. सध्याच्या परिस्थितीमध्ये या जाती संघटना फार प्रभावी दिसत नसल्या तरी ओबीसीचे एक मोठे आंदोलन त्या माध्यमातून उभे झालेले दिसते. पूर्वी ज्या जाती संघटना कार्यरत होत्या त्यातील प्रगल्भ असे कार्यकर्ते ओबीसीच्या प्रश्नावर आज मोठ्या प्रमाणामध्ये झगडत असलेले दिसतात. आणि त्यामुळे पुढील वाटचाल करत असताना सर्व ओबीसी मधील जातींचा समावेश यामध्ये असेल आणि त्यामुळे या आंदोलनाचे स्वरूप व्यापक झालेले दिसेल असे याठिकाणी सर्व वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. चर्चासत्राचे अध्यक्ष विजय बाभुळकर यांनी अध्यक्षीय भाषणाने समारोप केला. ते म्हणाले की "मंडल आंदोलनात जाती संघटना ह्या जशा महत्त्वाच्या वाटत होत्या. तसा त्या जाती संघटनांचा जातीव्यवस्थाविरोधी पोत महत्त्वाचा आहे. जाती संघटना केवळ आपापल्या जातीचा विचार न करता जाती तोडण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्याची आवश्यकता असते, परंतु ओबीसी म्हणून आयडेंटिटी ही फार महत्त्वाची आहे. ओबीसी म्हणून मिळणारे फायदे हे जातीच्या पलीकडले असतात म्हणून यापुढे ओबीसीचे आंदोलन सशक्त करण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करणे गरजेचे आहे." या चर्चा सत्रामध्ये उपस्थित सर्वांनी जो सहभाग घेतला त्या सर्वांच्या वक्तव्याचा अशाच प्रकारचा सार होता. महात्मा फुले जन्मद्विशताब्दी वर्षात आणि सध्याच्या ओबीसी आंदोलनाला अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सर्वांनी आपले जुने अनुभव, मंडल नंतरच्या काळामध्ये सगळ्यांचे अनुभव या कामात यावे त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करु असे त्यांनी आश्वासन दिले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन अॅड. समीक्षा गणेशे आणि आभार प्रदर्शन दिवाकर सूर यांनी मानले.
दिवसभर चाललेल्या सत्यशोधक ओबीसी जनगणना परिषदेला विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, ब्रम्हपुरी उमरेड, हिंगणघाट, इ. ठिकाणहून शेकडो सत्यशोधक ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसी जनगणना परिषदेच्या यशस्वीतेसाठी महात्मा फुले जन्मद्विशताब्दी समारोह समिती नागपूरच्या कार्यकारीणी मधील संजय शेंडे, टेमराज माले, विजय बाभुळकर, सुधाताई बामनपल्लीवार, संध्या राजूरकर, ईश्वर ढोले, राजू बोचरे, सुरेश कुथे, बाबा बीडकर, वंदना वनकर,एड. विनोद खोबरे, संध्या राजुरकर, रंजना कोल्हे,नयना झाडे, हेमराज बनसिंगे, अनुज हुलके, मिराताई मदनकर, विनोद उलिपवार,सुरेंद्र बुराडे, समिक्षा गणेशे, माधुरी सेलोकर, कर्णबोधी मांडवे, राजेश मेश्राम, सुरेश मानमोडे, दिवाकर सूर, संजय नरखेडकर, जयंत झंजाड, सुनिल मगरे, शुभांगी घाटोळे, वसंत लांडे,ऍड. अनिल काळे, इंद्रपाल जौंजाळकर, अनिल घुसे, संजय वाडीभस्मे, शैलेश जनबंधु, राजेंद्र डफ, आशा गोपालपूरे, अनिल पुंजे, कल्याण हिरेखन, मधुकर ढोके, देवराव टोंगे,निशा हटवार, प्रविणा बालपांडे, प्रकाश दुलेवाले, इत्यादी सर्वांनी परिश्रम घेतले.
वृत्तसंकलन- बाबा बीडकर, अनुज हुलके