मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा व बीड जिल्ह्याचा सहभाग

डॉ राजेंद्र सानप - ९४२००१९५९७

    मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा मराठवाड्यातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली. मराठवाडा भारताचा एक भाग बनला.

    दि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र झाला, पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामाविष्ट होण्याची संमती दर्शविली तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर व जुनागड संस्थानही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामाविष्ट झाली नव्हती.

    हैदराबाद संस्थानावर निजाममीर उस्मान अली खानयांचे राज्य होते. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामाविष्ट होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थयांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम चालू झाला होता. हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या १ कोटी ६० लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता.

Marathwada Mukti Sangram Ladha ani Beed Jilhyacha Sahabhag

    मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवीयाने मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेच्या माध्यमातून रझाकार नावाने मुस्लिम स्वयंसेवकांची भरती केली. त्यांच्या साह्याने जनतेवर अमर्याद अत्त्याचार चालू केले. या अत्याचारांचा विरोधात मोठा लढा उभारला गेला याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदु, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, कॉ गंगाधर आप्पा बुरांडे यासह अनेक नेत्यांनी केले. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची काळजी न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.

    बीड जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक राहिले आहे. निजामाची जुलमी राजवटत्याची क्रूर 'रझाकार' संघटना यांच्याविरुद्ध बीडमधील अनेक वीर भूमिपुत्रांनी व नेत्यांनी सशस्त्र व सनदशीर मार्गाने लढा दिला. या लढ्याचा मुख्य केंद्रबिंदू बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे शहर होते. या ऐतिहासिक संग्रामात मोलाचे योगदान देणारे बीड जिल्ह्यातील प्रमुख स्वातंत्र्यसेनानी पुढील प्रमाणे होते.

प्रमुख नेतृत्व आणि स्वातंत्र्यसेनानी

१) स्वामी रामानंद तीर्थ जरी ते संपूर्ण हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे मुख्य प्रणेते आणि सर्वोच्च नेते होते, तरी त्यांच्या चळवळीची आणि शैक्षणिक कार्याची सुरुवात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयातून झाली होती. त्यांनी येथूनच तरुणांमध्ये देशभक्तीची बीजं पेरली.

२) कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे : बीड जिल्ह्यातील 'मोहा' गावचे रहिवासी असलेले अप्पा हे मराठवाड्याच्या डाव्या चळवळीचे आणि मुक्ती संग्रामाचे प्रमुख नेते होते. त्यांनी शेतकरी आणि कष्टक-यांची फळी निर्माण करून निजामाविरुद्ध लढा दिला.

३) पंढरीनाथ चिंतामणराव देशमुखः खड़कीघाट (जि. बीड) येथील रहिवासी असलेल्या पंढरीनाथजींनी नारायणगड येथे झालेल्या सत्याग्रहात तिरंगा हाती घेऊन जाहीर भाषण केले होते. त्यानंतर त्यांना ६ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. भारत सरकारने १९७२ मध्ये त्यांना 'ताम्रपट' देऊन गौरवले होते.

४) विठ्ठलराव काटकर: बीड जिल्ह्यातील एक खंबीर नेते, ज्यांनी रझाकारांच्या अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी स्थानिक तरुणांना संघटित केले आणि सशस्त्र कारवायांमध्ये भाग घेतला.

५) वामनराव वाझे आणि बुधाजी कायवाडे: बीड परिसरातील स्थानिक आंदोलनांचे नेतृत्व करणारे आणि स्वातंत्र्यसैनिकांना एकत्र आणणारे प्रमुख कार्यकर्ते.

सशस्त्र आणि सीमेवरील लढा

    टाकळगावचे क्रांतिकारकः गेवराई तालुक्यातील टाकळगाव हे गाव हैद्राबाद मुक्ती संग्रामातील क्रांतीचे प्रमुख केंद्र बनले होते. येथील धाडसी क्रांतिकारकांनी जंगल सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह आणि सीमेवरील सशस्त्र कॅम्पमध्ये मोठा सहभाग नोंदवला होता.

    २१ हुतात्मा तरुणः निजामाच्या सैन्याशी आणि कासीम रझवीच्या रझाकारांशी दोन हात करताना बीड जिल्ह्यातील २१ तरुण शहीद झाले होते.

    ९ भूमिपुत्रांचे बलिदानः मुक्ती संग्रामाच्या अंतिम टप्प्यात बीड शहरातील एका दंगलीदरम्यान आणि निजामाच्या अत्याचाराविरुद्ध लढताना बीडच्या ९ भूमिपुत्रांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

    बीड जिल्ह्याच्या या गौरवशाली इतिहासावर आधारित हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि बीड जिल्हा' नावाचा ऐतिहासिक ग्रंथ डॉ. सतीश साळुंके यांनी लिहिला असून, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने याचा राष्ट्रीय स्तरावर बहुमान केला आहे.

    निजाम शासनाचे एवढे अमर्याद अत्याचार होते. हैदराबाद मुक्ति संग्रातील काँग्रेस कार्यकत्यांनी हाती शस्त्रे घेतले. भारताचे तात्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलयांनी निझाम शासनाच्या विरोधात पोलीस कार्यवाहीची घोषणा केली. १९ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे. एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशाने निझाम संस्थानावर कारवाई चालू झाली.

    मुख्य सैन्य सोलापूरकडून शिरल्या. पहाटे ४ वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर २ तासांत नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वारंगळ, बीदर विमानतळावर भारतीय सैनिकांनी हल्ले केले. १५ सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून सैन्य पुढे निघाले.

    भारतीय सैन्यापुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत. निजामी सैन्यास माघार घ्यायला भाग पाडले कासीम राजवीला अटक केली. शेवटी दि १७ | सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबादचे सैन्यप्रमुख जन अल इद्रीस यांनी शरणांगती स्वीकारली. निजामाने पराभव मान्य केला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. हैदराबाद संस्थानावर तिरंगा फडकला.

    आज या मुक्तिसंग्राम लढ्यातील शहीदांना मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ऐतिहासिक इतिहासाला आज मुक्तिसंग्राम दिनी नतमस्तक होऊन.. अमर करू या.

'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन चिरायू होवो!

डॉ राजेंद्र सानप - ९४२००१९५९७