भाई वैद्य यांची जवळून पहिली भेट डॉ कुमार सप्तर्षी यांच्या व कोकणातील माजी आमदार शरद खातु, स्व अंकुश काळदाते यांच्या समवेत झाली. ओळखी नंतर अनेक वेळा भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्या कार्या विषयी माहिती ऐकायचा नाद जडला भाई वैद्य उर्फ भालचंद्र वैद्य जन्म २२ जुन १९२८साली व मृत्यु २ एप्रिल २०१८. ज्यांना भाई वैद्य म्हणुन ओळखले जाते. ते भारतीय कट्टर समाजवादी राजकारणी होते. ज्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पदापासून क्रांतिकारक महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, पुण्याचे महापौर या पदासोबत भारतीय समाजवादी पक्षाचे प्रमुख म्हणून काम केले असे जेष्ठ समाजवादी नेते होते.
भाईच्या बोलण्याचं एक वैशिष्ट्य होतं. आवाज स्पष्ट, मोठा, धारदार विचार टोकदार, पण तर्कसंगत असायचे. त्यामुळे पटायचे. बोलण्यातला आशय तर भलताच बंडखोर होता. त्यामुळे तरुणवयात अपिल होणारे वक्तृत्व होतं त्यांचं भाईच्या जवळ गेलो, तसतसे भाई कळत गेले. आणीबाणीनंतर पुलोदच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. त्यांनी तीन लाख रुपये लाच देण्यासाठी आलेल्या स्मगलरला स्वतः सापळा रचून पकडून दिलं होतं. मंत्री पैसे खातात अशा काळात पैसे नाकारणारे भाई म्हणजे सधे राष्ट्रभक्त, भाई १९४२च्या 'चले जाव' चळवळीत बालवयात सहभागी झाले होते. ब्रिटिशांविरोधात लढणारा हा तरुण पुढे गोवा मुक्ती लढयातही झगडला. हा लढा समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली झाला. या लढयात लोहिया, मधु लिमये यांना बेदम मारहाण झाली. भाईंना डोक्याला मार लागला. रक्तबंबाळ झाले होते. एक हात जायबंदी झाला. त्यामुळे एक हात कायम अधू झाला.

आणीबाणीच्या काळात तर भाई पुण्याचे महापौर होते. आणीबाणीविरोधी त्यांनी शनिवारवाड्यावर सभा घेतली आणि त्यांना अटक झाली. त्यानंतर १९ महिने ते येरवड्याच्या तुरुंगात होते. आणीबाणीनंतर राज्यात पुलोदच्या सरकारमध्ये असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव चावं म्हणून पहिला ठराव मांडला. महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना पोलिसांच्या हाफ पैंट बदलून फुल पेंट केल्या. पोलिसांना त्यामुळे सन्मान मिळाला. त्याआधी 'पांडू हवालदार' म्हणून पोलिसांची टर उडवली जात असे. अनेक सासरे माझा जावई पोलिस आहे' हे सांगायला लाजत असत. भाईचा पोलीस दलातले लोक खूप आदर करताना दिसत.
भाई डॉ. राममनोहर लोहियांचा विचार मानणारे होते. महाराष्ट्रात त्यांनी समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचं शिष्यत्व स्वीकारलं होतं. एसेमही त्यांना मानसपुत्र मानत.
एसेम यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक भाईमध्ये दिसे. एसेम यांच्यात असणारा प्रेमळपणा, मनमिळावू स्वभाव, समोरच्याचा मताचा आदर करणं, विचार आणि कृतीत जराही अंतर नव्हतं. जसे विचार तशी कृती. सर्वांना सोबत घेऊन जाणारी वृत्ती. सत्तेच्या मोहापायी तडजोड करण्यास नकार. सत्ताग्राही न होता सत्याग्रही होणं. लोकशाही समाजवादी विचारांवर प्रामाणिक निष्ठा. त्यासाठी वाटेल ती किंमत चुकवायची सतत तयारीअसे. स्वच्छ जीवन जगणारे आदर्श व्यक्तिमत्व होते. समाजवादी पक्षांची नावं बदलली, मंच बदलले, पण भाईनी १९४२ साली समाजवादाचा झेंडा खांद्यावर घेतला तो शेवपर्यंत खाली ठेवला नाही. ते राष्ट्र सेवा दलात घडले. सेवा दलातल्या सैनिकांचं आवडतं गाणं आहे 'सदैव सैनिका पुढेच जायचे, न तुवा कधी मागे फिरायचे'. भाई समाजवादाचा झेंडा घेऊन सैनिकासारखे सतत पुढेच जात राहिले. भाईना शेवटचा निरोप देतानाही पुण्यात साने गुरुजी स्मारकाच्या मैदानात हेच गाणं सेवादल सैनिकांनी गायलं. भाई सर्व महत्त्वाच्या चळवळीत अग्रभागी राहिले. आणीबाणीनंतर जनता पार्टीच्या प्रयोगात ते पुढे होते. जनता पार्टी फुटल्यानंतर ते चंद्रशेखर यांच्यासोबत समाजवादी जनता पार्टीत होते. चंद्रशेखर यांच्यासोबत त्यांनी भारत पदयात्रेत सहभाग घेतला. या यात्रेत कन्याकुमारी से दिल्ली असं जवळपास चार हजार किलोमीटर अंतर ते चालले. या यात्रेच्या संयोजनात भाईंचा महत्त्वाचा वाटा होता. १९९० नंतर मंडल आयोगाच्या चळवळीचं वैचारिक नेतृत्व त्यांनी केलं. मंडल आयोगाची आवश्यकता का, याविषयी त्यांनी एक अभ्यासपूर्ण पुस्तिका लिहिली. भारतातल्या ओबीसी जातींना न्याय मिळायला पाहिजे, यासाठी भाई आग्रही होते. शेतकरी उत्पादक,पशुपालक, कारागीर जातींच्या हक्कासाठी तेव्हा भाईनी महाराष्ट्र आणि देश पिंजून काढला होता.
१९९२ नंतर भाईनी परधर्म द्वेष शिकवणाऱ्या अतिरेकी शक्ती आणि गरिबांचा गळा घोटणारी क्रूर भांडवलशाही या दोन्ही विरोधात रणशिंग फुंकलं. जागतिकीकरणविरोधी कृती समिती स्थापन करून स्थानी राज्यभर दौरे केले. अक्षरक्ष: खेड्यापाड्यात ते जात. तालुक्याच्या गावात जात. जिथं जिथं संधी मिळेल, तिथं तिथं ते गेले. जागतिकीकरणाचा वरवंटा किती भयानक आहे. हे आकडेवारीनिशी पटवून देणं, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. परधर्मद्वेषी अतिरेकी शक्ती आणि जागतिकीकरणड़ उदारीकरणड़ खाजगीकरणाचं (खाऊजा) धोरण यांना विरोध करण्यासाठी त्यांनी गांधीवादी, समाजवादी, कम्युनिस्ट आंबेडकरवादी, नक्षलवादी, पर्यावरणवादी स्त्रीवादी अशा विचारांच्या कार्यकत्यांना नेत्यांना, विचारवंतांना आणि अभ्यासकांना लोकशाही समाजवादाच्या झेंडयाखाली एक होण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सतत २५ वर्ष से समाजवाद्यांच्या, परिवर्तनवाद्यांच्या एकीसाठी झटत राहिले.
परिवर्तनवाद्यांच्या एकीसाठी त्यांनी सोशलिस्ट फ्रंट, समाजवादी जनपरिषद सोशलिस्ट पार्टी हे पक्ष काढले. त्यांची अध्यक्ष, सरचिटणीस ही पदं भूषवली. या पक्षाच्या बांधणीसाठी ते देशभर फिरले.
बिहार विधानसभेची निवडणूक होती. समाजवादी जनपरिषदेनं दहा ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांच्यासाठी प्रचाराच्या सभा घेत होते. सभेला माणसं किती याची काळजी नसे. असतील त्या श्रोत्यांना समाजवाद, सध्याच्या राजकारणातले पेच धर्मापांचं देशावरचं संकट याची भाई जाणीव करून देत.
एकदा सितामढी परिसरातल्या एका गावात सभा होती. सभा संपली, रात्रीचे नऊ वाजले होते. पुढच्या गावी जायचं पण रस्ते नीट नव्हते. बसची सोय नव्हती. सायकल रिक्षा होत्या, आडवाट अंधार, खराब रस्ते अशा अवस्थेत जाऊ नका असा आग्रह कार्यकत्यांनी केला. त्या गावात थांबायचं तर गेस्ट हाऊस, हॉटेल नव्हते. छोटं गाव होतं. राहायचं
कुठे ? कार्यकर्ते गरीब, साधारण. एका कार्यकर्त्याच्या घरी थांबावं लागलं. जेवण उरकलं. अंगणात सतरंजीवर झोपावं लागलं. सकाळी उठल्यावर आंघोळ करण्यासाठी कार्यकत्यांच्या घरात न्हाणी, बाथरूम नव्हती. घरासमोर सार्वजनिक हातपंप होता. त्यावर पाणी हापसायचं आणि आंघोळ करायची. भाईनी उत्साहानं बादली घेतली आणि आंघोळ केली. आपण कुणी ग्रेट वगैरे आहोत, मंत्रीबिंत्री होतो, याचा कुठेही बडेजाव नाही. नेहमीसारखे फ्रेश होऊन भाई पुढच्या ठिकाणी जायला तयार झाले. असा आणि इतका साधेपणा त्यांच्याकडे होता. त्याकाळी भाई गावोगाव हिंडत होते. कार्यकर्ते घडवत होते. त्यांना लोकशाही समाजवादाची निकड पटवत होते. हा सारा काळ समाजवादी चळवळीच्या पडझडीचा होता. या पडझडीत निराश न होता लोकांना लढण्यासाठी उभं करणं हे सोपं काम नव्हतं. हे करताना यशापयशाची तमा न बाळगता भाईनी असंख्य माणसं पडवली. म्हणून त्यांना लोक 'जितंजागतं समाजवादी विद्यापीठ' म्हणत.
राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचं काम केलं. गरिबांचं शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. लोहिया, एसेम यांच्या विचारांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. माणूस चारित्र्यवान आहे की नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या हातात सत्ता द्यावी आणि मग पारख करावी असं म्हणतात. भाई सत्तेत होते. तिथं ते भ्रष्ट झाले नाहीत. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांचं चारित्र्य अधिक झळाळून तळपलं. जवळ आलेल्या प्रत्येकाला त्यांनी प्रेम दिलं आणि समाजवाद सांगितला. त्यांना अखेरचा निरोप देताना खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अपवि' हे साने गुरुजींचं गाणं गायलं गेलं. ते अतिशय समर्पक होतं! समाजवादी विचारांचा कडवट साथी भाई वैद्य यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
लेखक - राजेंद्र मुरलीधर सानप,
सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ
इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड, मो नंबर. ९४२००१९५९७.