सामाजिक सलोखा ही एका निरोगी, प्रगल्भ आणि सुसंवादी समाजाची मूलभूत गरज आहे, कारण तो समाजाला एकत्र बांधतो, शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवतो, विकास साधतो आणि सामाजिक न्याय व एकतेसाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून कार्य करतो. सामजिक सलोखा हा समाजा समाजात सदभावना निर्माण करून एक आदर्श समाज निर्माण करतो. विविधतेने नटलेल्या आपल्या समाजात एकमेकांबद्दल आदर, प्रेम सहिष्णुता आणि बंधुत्वाची भावना टिकवून ठेवण्यासाठी सामाजिक सलोखा अत्यावश्यक बाब आहे.
सामाजिक सलोख्याची गरज खालीलप्रमाणे आहे:
शांतता आणि स्थैर्य:- जेव्हा समाजात सलोखा असतो, तेव्हा लोकांमध्ये सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण राहते. याउलट, सामाजिक ऐक्य नसेल तर संघर्ष आणि अशांतता वाढू शकते, ज्याचा परिणाम समाजाच्या प्रगतीवर होतो.

राष्ट्रीय एकात्मता:- विविध जाती, धर्म, भाषा आणि संस्कृतीच्या लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण होण्यासाठी सामाजिक सलोखा आवश्यक आहे. या एकात्मतेमुळे देश एकसंघ राहत.
विकास आणि प्रगती:- सामाजिक सलोखा असेल, तर समाजातील सर्व घटक एकत्र येऊन विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतात. याशिवाय, समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखल्याने आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला चालना मिळते.
सामाजिक न्याय आणि समानता:- सामाजिक सलोखा समाजात समानता आणि न्यायाची भावना वाढवतो. तो लोकांना एकत्र आणतो आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला कमी करतो.
जातीय आणि धार्मिक सलोखा :- महाराष्ट्र हा विविध संस्कृती आणि धर्मांचे राज्य आहे. इथे जातिय सलोखा टिकवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, जेणेकरून सर्व धर्मांचे लोक प्रेम व बंधुभावाने एकत्रितपणे राहू शकतील.
मानवी बंधुभाव वाढवणे:- सामाजिक सलोखा हा माणुसकीचा संदेश देतो. तो सर्व लोकांना एकत्र आणतो आणि एकमेकांबद्दल प्रेम, आदर व सहानुभूतीची भावना सलोखा वाढवतो.
समस्यांवर मात करणे:- कोणताही समाज जेव्हा एकत्र येतो, तेव्हा तो मोठ्या समस्यांवर सहजपणे मात करू शकतो. सलोखा समाजात एकीची ताकद निर्माण करतो, ज्यामुळे एकत्रितपणे उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढणे शक्य होते.
सामाजिक सलोखा राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे आपल्या देशात अनेक जाती-धर्माचे लोक सुखाने व आनंदाने सलोख्याचे जीवन जगत आहेत. समाजातील सलोखा अबाधित ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे..
सामाजिक सलोखा, राखण्यासाठी उपयुक्त भुमिका जातीय सलोखा वाढवण्यासाठी काही सूचना देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी जातीय सलोखा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.... त्याचबरोबर सर्व जातीयवादी पक्ष आणि जातीयवादी संघटनांवर बंदी घालण्याची नितांत गरज आहे ज्याद्वारे जातीयवादाचा धोका निर्माण होणार नाही... परंपरा लक्षात घेऊन सद्य परिस्थितीत बंधुभाव व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी व महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सद्भावनेची गरज आहे..
सामाजिक क्रांती आणि सामाजिक सलोखा प्रत्यक्ष कृतीतून घडविणारे कृतिशील राजे म्हणून लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव आजही देशात घेतले जाते. दलित शोषित बहुजनांना शासन व प्रशासना तून सन्मानाचे हक्क बहाल करणारे सामाजिक सलोखा निर्माण करणारे लोकराजा म्हणून त्यांची ख्याती होती.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे पण सध्या महाराष्ट्रात समाजा समाजात द्वेषाची भावना वाढीस लागली आहे. शालेय विद्यार्थीत सुद्धा हि भावना प्रबळ होत आहे. याचा भविष्य काळात दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. राजकीय क्षेत्रातील काही या विष प्रयोगाला हातभार लावताना दिसत आहेत. स्वार्थीची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आजच्या युवा वर्गाने पुढाकार घेऊन थोर समाजवादी नेते डॉ राममनोहर लोहिया यांचेजाती तोडो समाज जोडो. हा संदेश. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर सामाजिक द्वेष भावना मुक्त सामाजिक समता सलोखा कायम राहिल यासाठी पुढाकार घेऊन योगदान दिल्या शिवाय अठरा पगड जाती जमातींना एकत्रित करून स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज व सर्व संत महात्मे, महापुरुष यांच्या विचारांचा स्वप्नातील आदर्श महाराष्ट्र सक्षमपणे उभा राहिल. सामाजिक सलोखा कायम राहिल.
लेखक - डॉ राजेंद्र मुरलीधर सानप, इंद्रप्रस्थ कॉलनी नगर रोड बीड मो.नं. ९४२००१९५९७