अनेक चुका करत जीवसृष्टी निर्माण झाली; असंख्य चुका करीत विज्ञान विस्तारले. जगाची अर्थव्यवस्था मानवनिर्मित आहे आणि तीही चुका करीतच उभी राहीली आहे. पाकशात्रातील अनेक लज्जतदार पदार्थ ही मानवी चुकांचीच निर्मिती आहे. चुकांमुळेच नवनिर्मिती होते, सर्जनशिलता प्रकट होते. एडिसनने हजार चूका केल्या तेव्हा कुठे त्याला विजेचा बल्ब शोधता आला.
तरीही आज जर सार्वमत घेतले तर एका भावनेबद्दल सर्वांचे एकमत होईल, ते म्हणजे ‘माझे बरोबर असते, इतरांचेच चुकते.’ तुम्ही आता ह्या क्षणी चुकता अहात का, असे विचारले तर प्रत्येक जण प्रथम बचावात्मक आणि मग आक्रमक पवित्रा घेतो. या क्षणी, चालू वर्तमानात आपले चुकत असेल ही भावनाच कोणाला सहन होत नाही. माझे बरोबरच आहे ही भावना जपत प्रत्येकजण वर्तमानकाळात जगत असतो. कृती चुकीची असली तरी त्यावेळची भावना ‘मी बरोबर आहे’ अशीच असते. चुक झाली आहे हे आपल्याला त्या क्षणानंतर कळते व खंतही वाटते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. पण आपल्याकडून चुक होत आहे किवा अशी कुणी जाणीव करून दिली तरी आपल्याला चालू क्षणी ते मान्य नसते.

असे होण्यास आपली मानसिक जडणघडण कारणीभूत आहे. चुका होणे हे नैसर्गिक आहे. कारण माणसाची शारीरिक रचनाच तशी आहे. माणसाची पंचेंद्रिये ही कोणत्याही गोष्टीबद्दल संपूर्ण व तंतोतंत माहिती देऊ शकत नाहीत. ज्ञानेंद्रियांकडून मिळणाऱ्या माहितीला मर्यादा असतात. या मर्यादित माहितीतून मेंदू निष्कर्ष काढतो. यामुळे त्या निष्कर्षालाही मर्यादा पडतात. अशा मर्यादित माहितीतून काढलेल्या निष्कर्षावर आधारित असंख्य समजुती उराशी बाळगत आपण जगत असतो. प्रत्येक चालू क्षणी या समजुती क्रियाशील असतात. त्या समजुतींच्या आधारावरच आपण निर्णय घेत असतो. या समजुतींची आपण कधीच खातरजमा केलेली नसते, त्या तपासून पाहिलेल्या नसतात की त्यांचे विश्लेषण केलेले नसते. म्हणून या समजुती बरोबरच आहेत असे आपण समजुन चालतो. मर्यादित माहितीमुळे त्या चुकीच्या असू शकतात हे आपण ध्यानीच घेत नाही. मर्यादित माहितीतून चुका होतात हे ध्यानी घेतले तर बर्याच समस्या सुटण्यास मदत होईल.
चुका करणे अनैसर्गिक आहे, चुका करणे भयंकर आहे, फक्त मुर्ख माणसेच चुका करतात, चुका करणारा मठ्ठ असतो हे आपल्या मनावर शाळेमध्ये बिंबवले जाते. चुका करणे म्हणजे नालायक ठरणे, ही समजूत प्रत्येक मुलामध्ये रुजवली जाते आणि हेही ठसवले जाते की, ’आयुष्यात कधीही चुका न करणे म्हणजे यशस्वी होणे. यशाच्या या समजूतीला आपण घट्ट बांधून घेतो व चुका टाळण्याची आटोकाट धडपड करतो. पण चुका होतातच. म्हणून चुका स्विकारणे आणि त्या पुन्हा न होतील याची दक्षता घेणे, तसेच स्वमताला खरे ठरवण्याचा अट्टाहास सोडणे हेच आपल्या प्रगतीचे लक्षण आहे.
वेगवेगळ्या कोनातून जग वेगवेगळे दिसते म्हणून आपली समजूत जरा बाजुला ठेऊन दुसऱ्या कोनातूनही पहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपली बुध्दी विस्तारते आणि ‘माझेही कदाचित चुकत असेल’ ही जाणीव संवादाचा नवा मार्ग खुला करते. आज आपल्याला गरज आहे ती संवादाची... वादाची नव्हे. आपल्या चुका समजून घेण्याची... चुकांचे समर्थन करण्याची नव्हे. चुका प्रगतीची वाट मोकळी करून देतात. पण केव्हा? जेव्हा एकच चुक पुन:पुन्हा करत नाही तेव्हाच. म्हणूनच चुकणे हे मानवाचे जसे मोठे सामर्थ्य आहे तसेच वैशिष्ठ्यही आहे.