पुणे : देशातील शिक्षण, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात सत्य बोलण्याची परंपरा दिवसेंदिवस कमी होत चालली असून, सध्याची परिस्थिती ही ब्रिटिशकालीन पारतंत्र्यापेक्षाही अधिक गंभीर असल्याची खंत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केली. अन्याय आणि दडपशाहीविरोधात समाजाने भीती झुगारून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी दाखवली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

गंगाधर सहस्रबुद्धे जीवनगौरव सोहळा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात 'मनुस्मृती दहनाचे सांस्कृतिक महत्त्व' या विषयावर ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी पोलिस महानिरीक्षक एस. एन. मुश्रीफ, काँग्रेसच्या शहराध्यक्ष दीप्ती चव्हाण, समितीचे अध्यक्ष सुनील यादव, लता बंडगर, सचिव श्याम निलंगेकर, विठ्ठल गायकवाड, माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कोळसे पाटील म्हणाले की, आज शिक्षण क्षेत्र, सामाजिक जीवन आणि सार्वजनिक व्यवहारांमध्ये सत्य बोलण्याची आणि वस्तुस्थिती मांडण्याची परंपरा लोप पावत चालली आहे. समाजातील अनेक गंभीर प्रश्न हे विद्यमान व्यवस्थेतील त्रुटींमुळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे विचार करणे आणि सामाजिक वास्तव समजून घेणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या मनुस्मृतीच्या विचारसरणीवर टीका केली होती, ती विचारसरणी आजही विविध स्वरूपात समाजात अस्तित्वात आहे. अन्यायकारक आणि विषमतेला खतपाणी घालणाऱ्या विचारांविरोधातील संघर्ष हा नवीन नसून तो हजारो वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आजही सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढा देण्याची गरज कायम आहे.
"लोकशाही व्यवस्थेत वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, मतभेदांना विचारांनी उत्तर देण्याऐवजी हिंसेचा मार्ग स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. ही बाब लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अन्यायाविरोधात उभे राहण्यासाठी समाजाने भीती झुगारली पाहिजे आणि लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे," असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दत्तात्रेय जाधव यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर काँग्रेसच्या शहराध्यक्ष दीप्ती चव्हाण, मिलिंद देशमुख आणि मुकुंद काकडे यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक परिवर्तनासाठी वैचारिक चळवळींचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बर्वे यांनी केले, तर अंजूम इनामदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमात सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांच्या जतनासाठी समाजाने अधिक सजग आणि सक्रिय होण्याची आवश्यकता असल्याचा सूर अनेक वक्त्यांनी व्यक्त केला.