सचिन राजूरकर -
मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार १९९० मध्ये केंद्रीय सेवा व शिक्षणातील प्रवेशांमध्ये इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) ५२ टक्के आरक्षण लागू करण्यात आले. परंतु काही उच्चश्रूंनी याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका टाकली. त्यात इंद्रा सहानी वर्सेस भारत सरकारच्या १९९२ ला लागलेल्या निकालात २७ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आणि ओबीसी समाज दोन उन्नत व प्रगत भागात विभागला गेला.
१२ महिन्यांच्या आत त्यांनी अहवाल सादर करणे अपेक्षित होते; मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्याची राजकीय संवेदनशीलता लक्षात घेऊन या समितीला १४ वेळा मुदतवाढ देण्यात आली. अखेर सहा वर्षांनंतर ३१ जुलै २०२३ रोजी लोकसभा व राज्यसभेत चर्चेला न ठेवता त्यांनी हा अहवाल राष्ट्रपतीना सादर केला. रोहिणी आयोगाने हा अहवाल सादर केल्यानंतर आता मंडल आयोगाने निर्माण केलेल्या मागासवर्गीय आरक्षणाचा आराखडा नव्याने तयार करायचा का? हा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. याशिवाय या अहवालात नक्की काय शिफारशी दिल्या आहेत, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.
असे असेल उप-वर्गीकरण ?
केंद्रीय सूचीत ओबीसींच्या तीन हजारांहून अधिक जाती आहेत. या जातींचे आरक्षणाचा लाभ घेतलेल्या आणि न घेतलेल्या प्रकारानुसार वर्गीकरण करण्यात येईल. आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या अतिमागास ओबीसी जातींना २७ टक्के कोट्यात प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणात तीन वा चार गट केले जाण्याची शक्यता आहे. तीन गट केले तर दीड हजार अतिमागास जातींना १० टक्के आरक्षण, एकदा वा दोनदा आरक्षणाचा लाभ मिळालेल्या सुमारे एक हजार जातींनाही १० टक्के आरक्षण व सातत्याने आरक्षणाचा लाभ मिळालेल्या सुमारे दीडशे जातींना ७ टक्के आरक्षण दिले जाईल, अशी चर्चा आहे. ओबीसी आरक्षणात ४ गट केले तर अनुक्रमे १० टक्के, ९ टक्के, ६ टक्के व ४ टक्के आरक्षणाचे उप-वर्गीकरण केले जाऊ शकते, असे मानले जाते.
ओबीसी प्रवर्गातील दुर्बल जातींना सशक्त समाजाच्या बरोबरीने आणण्याचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी ओबीसींना २७ टक्के आरक्षण असले तरी अनेक राज्यात अजूनही पूर्णपणे २७ टक्के आरक्षण लागू झाले नाही. नोकरीत पूर्णपणे २७ टक्के आरक्षण पूर्ण होऊ शकले नाही, मग केंद्र व राज्य सरकार कोणत्या आधारावर ओबीसींचे वर्गीकरण करणार? ओबीसीचे वर्गीकरण करायचे असल्यास शास्त्रीयदृष्ट्या झाले पाहिजे. ओबीसींची जातनिहाय जनगणना करूनच वर्गीकरण करावे तरच सर्वांना न्याय मिळेल.
सचिन राजूरकर - महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, सहकारनगर, नागपूर मो. ९३७०३२४६०८