- लेखक - सत्यशोधक दिनकरराव जवळकर
श्री. के. ग. बागडे यांचे प्रस्तावनेसह देशाचे दुश्मन
आवृत्ती पहिली १९२५, किंमत ४ आणे
प्रकाशक : केशवराव मारुतीराव जेधे, जेधे मॅन्शन, पुणे
मुद्रक : रामचंद्र नारायण लाड, श्रीशिवाजी प्रिं. प्रेस, ५५६, सदाशिव पेठ, पुणे शहर.
श्री. केशवराव बागडे, बी. ए., एल. एल. बी यांची प्रस्तावना
सदर पुस्तकाचे लेखक श्रीयुत दिनकरराव जवळकर यांनी त्यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहावी, अशी इच्छा प्रदर्शित केली व त्यांच्यासारख्या उत्साही गृहस्थाच्या म्हणण्यास मान द्यावा असे वाटल्यावरून मी हे चार शब्द लिहित आहे. महात्मा जोतिराव फुले यांची कामगिरी राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. जसजसा काळ लोटेल, तसतसे त्यांच्या कार्याचे महत्त्व सुजाण माणसांच्या प्रत्ययास अधिकाधिक येणार आहे. महात्मा फुले यांच्या हयातीत त्यांच्या निंदकांनी वाट्टेल तशी कठोर टीका केली; त्यांच्या पवित्र कामगिरीविषयी जाणूनबुजून जनतेत गैरसमज प्रसृत केला. काही कुटाळ लोकांची मर्यादा याच्याही पुढे जाऊन त्यांना महात्मा जोतिराव फुले व त्यांच्या पत्नी पुण्यश्लोक मातोश्री सावित्रीबाई यांचा नीचपणे छळ केला व अखेर त्यांना मारेकरी घालून जगातून नाहीसे करण्याचा दुष्ट उपद्व्याप करण्यासही त्यांच्या शत्रूंनी कमी केले नाही. महात्मा जोतिराव फुले यांनी ज्या बहुजन समाजाच्या हितार्थ आपला देह झिजवला, तो निरक्षर व अज्ञान असल्यामुळे व ज्यांच्या आसुरी स्वार्थाला त्यांनी आपल्या कामगिरीने वेसण घातली, ते लोक सुशिक्षित पण स्वतःच्या स्वार्थासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून टपून बसणारे असल्यामुळे महात्मा फुले यांच्या मोठेपणावर कृष्णपटल पडले आहे. 'काल' हा निर आहे; स्वार्थी माणसे स्वतःच्या पाताळयंत्रीपणाने व सैतानी स्वार्थांधतेने असत्यावर सत्याचा, पापावर पुण्याचा, जनताद्रोहावर लोकसेवेचा व स्वार्थपरायणेवर परोपकाराचा मुलामा चढविण्याचे लाघवी प्रयत्न करून अजाण व भोळ्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून तिची दिशाभूल करू शकतात. सर्वसामान्य जनता विचारक्षम व कार्यक्षम होईपर्यंत असा कटू प्रकार अनुभवाला येत जाणार हे निर्विवाद आहे. याच कारणपरंपरेमुळे आपल्या देशात होऊन गेलेल्या ब्राह्मणेतर साधुसंतांना, राजकारणी मुत्सद्यांना, स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या "वीरश्रेष्ठांना ब्राह्मण लोकांच्या निंदेच्या, छळाच्या व प्राणघाताच्या दिव्यातून तावून सुलाखून निघावे लागले व त्यांचे अद्वितीयत्व जगाच्या निर्दशनास येऊ शकले. अशा विभूतींच्या समकालीन निंदकांना वाटेल तितका उन्मादानंद झाला असला, तरी 'कालाचे' अपत्य 'इतिहास' ह्या बाबतीत सत्याचा निर्णय केल्यावाचून बहुतेक चुकत नाहीत. विभूतीसंबंधी समकालीन निंदा, छळ व प्राणघात वगैरे दुष्टांच्या कृतींना कालाने एकदा आपल्या उदरात ठाव देऊन त्यांना आपल्या भयंकर जठराग्नीची आंच दिली की त्यातून त्या थोर पुरुषांच्या कृतीने सत्कीर्तीरूप शुद्ध व तेजस्वी सुवर्ण बाहेर पडते. महात्मा जोतिराव यांच्या चारित्र्याला सर्वभक्षी व सर्वसाक्षी कालाच्या कारभाराचा हा नियम तंतोतंत लागू पडतो. त्यांचे निंदक व छलक स्मृतीशेष होत चालले असून महात्मा जोतिराव फुले यांच्या अनुयायांची संख्या गणितश्रेणीने चालली आहे.
केशव गणेश बागडे
४२३, बुधवार पेठ, पुणे ता. २५ जुलै १९२५