मुंबई, ता. १८ : इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी नागपूर येथे सुरू असलेल्या 'महाज्योती' संस्थेमध्ये कोट्यवधींचा कोचिंग क्लासेस घोटाळा उघडकीस आला आहे. महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना ओबीसी व्हीजेएनटी विभागाची मात्र पुण्यातील 'ज्ञानदीप' अॅकॅडमीवर विशेष मेहेरबानी असल्याचे दिसून येते. तब्बल १५ ते १८ कोटींचे हे काम निविदा न काढताच 'ज्ञानदीप ला देण्यात आले असून या प्रकरणात विभागाच्या मंत्र्यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांच्याकडे संशयाची सुई वळली आहे.
या प्रकरणात मोठा गाजावाजा होताच संबंधित 'ज्ञानदीप' संस्थेवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे मंत्रालयातून खात्रीशीररीत्या समजते. 'महाज्योती' कडून एमपीएससी, यूपीएससीसह, जेईई आणि नीट आदी परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते.
काहीच माहिती नाही !
विभागाचे मंत्री अतुल सावे यांचे खासगी सचिव प्रशांत खेडेकर यांनी 'ज्ञानदीप'वर विशेष मेहेरबानी केल्याचे बोलले जाते. खेडेकर हे 'ज्ञानदीप' ॲकॅडमीचे महेश शिंदे यांच्या जवळचे समजले जातात. खेडेकर यांची दोन पुस्तके ॲकॅडमीनेच प्रकाशित केली आहेत. ओबीसी व्हीजेएनटी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी या विषयासंदर्भात त्यांना काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
सर्व कायदेशीर प्रक्रिया....
ज्ञानदीप अॅकॅडमीचे महेश शिंदे म्हणाले की, संस्थेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे काम मिळवले आहे. संस्था कोचिंग क्लासेसच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड करीत नाही. आमच्याबद्दल एकाही विद्यार्थ्याची तक्रार नाही. काही विशिष्ट लोक संस्थेची नाहक बदनामी करण्याच्या हेतूने प्रयत्न करीत आहेत.