प्रशिक्षण नावापुरतेच : महाज्योतीचा लेटलतिफ कारभार सुरूच ; डाटाही झाला फुर्रर
नागपूर ओबीसीतील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 'नीट' आणि 'आयआयटी'मध्ये टक्का वाढविण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून आठ महिन्यांपासून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यासाठी अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि 'टॅब' सह सहा जीबी डाटा देण्याचे ठरले होते. मात्र, अद्याप या विद्यार्थी 'टॅब'च्या प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण संपल्यावर टॅब देणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
विशेष म्हणजे, प्रशिक्षणात सहभागी असलेले विद्यार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी आहेत. त्यांची साहित्य खरेदी करणे वा टॅब घेण्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे महाज्योतीचे ऑनलाइन प्रशिक्षण नावापुरते उरले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
प्रशासन निरुत्तर -
यापूर्वी महाज्योतीचे व्यवस्थापक प्रदीप डांगे यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी तांत्रिक प्रक्रियेमुळे 'टॅब' देण्यास उशीर होत असल्याचे स्पष्ट करीत, टॅबसाठी जानेवारी महिन्यात प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगून विभागाकडून ते उशिरा मिळाल्याने उपलब्ध होऊ शकलेले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, प्रक्रिया सुरू असून त्यांना लवकरच त्याचे वाटप करण्यात येईल असेही सांगितले. मात्र, याला एक महिना झाला असतानाही अद्याप टॅब न मिळाल्याने इतरा उशीर का होतो आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे आता या प्रश्नावर प्रशासनही निरुत्तर असल्याचे दिसून येत आहे.